आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लता के साथ साथ... लता के संग संग!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय सिनेमा ‘साऊंड'च्या माध्यमातून बोलू लागला, त्याला ८६ वर्ष पूर्ण झाली आहे. त्यातील ७५ वर्ष लता नावाचा कल्पवृक्ष अढळ स्थान पटकावून आहे. त्यांची प्रेरणा घेऊन पुढच्या तीन पिढ्या या चैतन्यदायी वटवृक्षाखाली मोठं होत गेल्या. आणि इथेच खरा पेच आहे. कुठलेही रोपटे स्वतःची वेगळी ओळखअसून सुद्धा ‘कल्पलते' पुढे खुजेच राहिले.  लताच्या अमृतमहोत्सवी कारकीर्दीचा सन्मान करताना हा देखील एक पैलू लक्ष वेधून घेणारा आहे...

 

‘अमर अकबर अँथनी'मधल्या ‘हमको तुमसे हो गया है प्यार, क्या करे' या गाण्यात एक गंमत आहे. मुकेश-किशोर-रफी यांनी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन पात्र रंगवलेल्या तीन नायकांना आपापला आवाज दिला आहे. तर तिन्ही नायिकांसाठी मात्र एकट्या लता मंगेशकर यांनी पार्श्वगायन केलं आहे. यात गायिका म्हणून त्यांचं मोठेपण अधोरेखित होत आहेच, परंतु अशाप्रकारे धर्म, प्रांतावादाच्या पलीकडे जाऊन सगळ्यांनाच एकत्र बांधून ठेवणाऱ्या गोष्टी ज्या देशाला मिळतात तो देश नशीबवान असतो, नव्हे तो आहेच. कंठमाधुर्य अन् अलौकिक स्वरसाधनेच्या बळावर त्यांना मिळालेलं यश अविश्वसनीय आहे. त्यामुळे अशा व्यक्तीचं कौतुक करण्यासाठी कुठल्याही भाषेतील शब्द तोडके पडावे.


एखाद्या राजवाड्यातील उच्चभ्रू अन् रसिक श्रोत्यांच्या मैफलीत अडकून पडलेल्या शास्त्रीय गायकीला केवळ एक ठराविक वर्गापुरते मर्यादित न ठेवता कष्टकऱ्यांच्या झोपडीत झिरपू देणाऱ्या आवाजाची चिकित्सा करू नये, किंबहुना तशी ती केलीच जाऊ शकत नाही. भारतीय सिनेमा ‘साऊंड'च्या माध्यमातून बोलू लागला, त्याला ८६ वर्ष पूर्ण झाली आहे. त्यातील ७५ वर्ष लता नावाचा कल्पवृक्ष अढळ स्थान पटकावून आहे. त्यांची प्रेरणा घेऊन पुढच्या तीन पिढ्या या चैतन्यदायी वटवृक्षाखाली मोठं होत गेल्या. आणि इथेच खरा पेच आहे. कुठलेही रोपटे स्वतःची वेगळी ओळख असून सुद्धा ‘कल्पलते' पुढे खुजेच राहिले...


१९४०च्या दशकात शमशाद बेगम, अमीरबाई कर्नाटकी यांची गाणी कान पक्के नसणाऱ्या श्रोत्यास अपील होऊ शकतील, याची शक्यता कमी होती. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याच वर्षी ‘के. एल. सैगल' यांचे निधन झाले, तर फाळणी नंतर लगेचच सुप्रसिद्ध गायिका नूरजहाँ यांनी पाकिस्तानात जाण्याचा मार्ग निवडला. ‘गायक-नायक' परंपरा संपुष्टात येण्याच्या मार्गावर होती. अशा पोकळीत भारतीयांना ‘आपला' म्हणता येईल असा आवाज हवा होता. नायकाचे आकर्षक असणे आणि गायकाचा आवाज श्रवणीय असणे, हे समीकरण ‘प्लेबॅक सिंगिंग'(पार्श्वगायन) या प्रकाराने जुळवून आणले होते. त्याच काळात पडद्याआड लपणाऱ्या भारतीय स्त्रीला आत्मविश्वासाने बोलकं करणारा लताचा आवाज हा भारतीय स्त्रीचा आवाज बनू पाहत होता. स्त्रीचा आवाज केवळ ‘गोड'च असायला हवा, या समजाने लता नावाची चांदणी आल्यावर इतर तारका निखळण्यास सुरुवात झाली होती...


‘पंखांचं काय झालं 
याबाबत 
मी कधीच काहीएक बोलत नाही
एवीतेवी ते काल्पनिकच
मी सांगत आलेय फक्त 
उखडल्या गेलेल्या हातांविषयी 
सतत'

 

कविता महाजन यांच्या या ओळीतील काल्पनिक असलेले पंख लता मंगेशकर यांना लाभले तर खरं, पण तेच पंख आपणासदेखील असावे, या हव्यासाने नक्कल करत बसलेल्या पुढच्या पिढ्या आपले असलेले हात गमावून बसल्या. एखादी नवीन व्यक्ती त्याच क्षेत्रातील दुसऱ्या कुणा मोठ्या व्यक्तीची आठवण करून देते, तेव्हा ती नवीन व्यक्ती आपली वेगळी ओळख टिकवून ठेवण्याची शक्यता फार कमी असते. ‘तू लतासारखी गाते' हे शब्द ऐकण्यात धन्यता मानणारी पिढी आपण सगळ्यांनी पाहिली. पण गोड गळ्याची सवय लागलेल्या भारतीयांना लताहून वेगळ्या प्रकारचा स्त्रीचा आवाज असू शकतो, हे पचवायला एकविसावे शतक उजाडावे लागले. लताच्या आवाजात किशोरवयीन मुलीचा नाजूकपणा होता. त्यामुळे त्या आवाजासोबत तुलना हे प्रत्येक भारतीय स्त्रीचा गळा गोड आहे की नाही, हे मोजण्याचं प्रमाण होऊन बसले.


लता मंगेशकर सूरसाधनेला अनन्यसाधारण महत्व देतात. आपल्याला मिळालेली ही दैवी देणगी असल्याचे, ते कायम म्हणत असतात. त्यामुळे गाणी म्हणताना पायातील चप्पल काढून ठेवणे, स्टेजवर उभे राहून गाणी म्हणताना शरीराची आवश्यक हालचाल न करणे, या या सवयी त्यांच्यात मुरलेल्या होत्या. तत्कालीन काळ आणि पार्श्वगायनाची पद्धत यामुळे ती पद्धत बरोबर असली, तरी ‘स्त्री गायन' या प्रकाराकडे पाहण्याची भारतीयांची एकूण दृष्टी मर्यादित होत होती, हे सत्य आहे. तरीही त्यांचे एकूण राहणीमान अशा प्रकारचे होते की ‘शुद्ध', ‘सुसंस्कृत', ‘दैवी' आधुनिक ‘मीरा'चा आवाज कसा असावा, याचा वस्तुपाठ नकळतपणे श्रोत्यांमध्ये भिनत गेला होता.


कॅब्रे आणि डान्स नंबर गाणी गायला लता मंगेशकर यांनी अनेकदा नकार दिला, तेव्हा आवाजातल्या उन्मादकतेमुळे आशा भोसले यांना ते मिळाले. सुप्रसिद्ध बांग्लादेशी गायिका ‘रुना लैला' यांनी हिंदी संगीतसृष्टीत गायला सुरुवात केली तेव्हा, त्यांना भारतीय श्रोत्यांनी आधीच ठरवलेल्या चौकटीत न बसता आल्याने लवकर पायउतार व्हावे लागले. लता मंगेशकर यांच्या आवाजाशी कमालीचे साम्य असल्याने सुमन कल्याणपूर यांना ‘गरिबांची लता' म्हणून हिणवले गेले. ‘ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे' हे गाणं सुमन यांचं नसून लताने गायलं असल्याचा संभ्रम कित्येक वर्षे लोकांमध्ये होता. गीता दत्तपासून हेमलतापर्यंत अनेक गायिका, लता-आशा सारख्या विस्तीर्ण गायन सीमेत न बसल्याने झाकोळल्या गेल्या. पार्श्वगायनापेक्षा प्रत्यक्ष परफॉर्म करून व्यक्त व्हायला ज्यांना आवडायचं, अशा उषा उथुप यांना आपण स्वीकारलेल्या, गोड गळ्याच्या चौकटीमुळे पूर्णपणे न्याय देऊ शकलो नाही.


खरंतर प्रत्येक पिढीची नॉस्टॉजियाला चिटकून राहण्याची सवय असते. हिंदी सिनेमात ५० आणि ६०च्या दशकातला सुवर्णकाळ मान्य करून देखील, मला स्वतःला ९०ची दशकातील संगीतसुद्धा तितकेच महत्वाचे वाटते. याचे प्रमुख कारण म्हणजे, लताच्या छायेखालून निघून वेगळी ओळख करणाऱ्या अलका याज्ञिक, कविता कृष्णमूर्ती, साधना सरगम, अनुराधा पौडवाल यांनी ९०चं दशक निर्विवादपणे गाजवलं. प्रेक्षकांनीसुद्धा त्यांना भरभरून प्रेम दिलं. त्यामुळे यांची आणि यापुढे येणाऱ्या गायिकांची तुलना लताच्या लोकप्रियतेसोबत होणे, अशक्य आहे. पण मधल्या काळात लता मंगेशकर नावाच्या समुद्राला भीत कित्येक नद्या त्या समुद्रात विलीन होत गुडूप झाल्या. वेगळी वाट धुंडाळायला निघालेले असंख्य छोटे-मोठे झरे मूकपणे लुप्त झाले. ते पाहता ९०च्या दशकातील स्त्री गायिकांचं यश कौतुकास्पद आहे. एकेकाळी संगीतकार ‘सी.रामचंद्र' यांच्यासोबत लता मंगेशकर यांचे वितुष्ट झाले तेव्हा काही काळ त्यांना इंडस्ट्रीतून नवीन कामे मिळेनाशी झाली. केवळ लोकप्रियता हा निकष बघायचा झाल्यास तब्बल २५ वर्ष संगीत देणाऱ्या नदीम-श्रवण या जोडगाळीने मात्र लताच्या नावाशिवाय अफाट यश कमावले. संपूर्ण कारकिर्दीत फक्त दोन गाणी लताने या संगीतकारांसाठी गायली आहे!


लता मंगेशकर यांची प्रेरणा तर सदैव आहेच, पण त्यापुढे जाऊन स्वतःच्या वेगळ्या आवाजाला न्यूनगंडाशिवाय प्रस्तुत करणाऱ्या नव्या पिढीत कमालीचा आत्मविश्वास आहे. शिल्पा राव, नीती मोहन, नेहा बासीन, जोनिता गांधी, जसलीन कौर यांच्यात लता-आशा इतकी अफाट रेंज नसेल, पण स्वतःचा कमावलेला एक तुकडा आहे, ज्यात ते सहजपणे वावरतात. फक्त सुमधूर अन नाजूकच नाही, तर भारतीय स्त्रीचे प्रतिनिधित्व करणारे अनेक आवाज प्रांतवार अस्तित्वात असतात, जे प्रेक्षक आणि श्रोता हळूहळू स्वीकारायला लागला आहे. काही वर्षांपूर्वी जेष्ठ गायिका ‘उषा उथुप' यांना सर्वोत्कृष्ट गायिकेसाठीचा फिल्मफेअर पुरस्कार ‘रेखा भारद्वाज' यांच्यासोबत विभागून मिळाला. ७० वर्षांच्या उषाजी जेव्हा स्टेजवर आल्या, तेव्हा त्यांनी साश्रु नयनांनी सांगितले की ‘इथे माझ्या सोबत बसलेले प्रत्येक जण पाच-सहा पुरस्कारांचे मानकरी आहेत. ४५ वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत असून, हा मात्र माझा पहिलाच फिल्मफेअर पुरस्कार आहे.' कांजीवरम साडीत स्टेजवर गाताना नाचणाऱ्या उषा उथुप यांना आपणास भारदस्त अन् पहाडी आवाजामुळे सर्वदूर स्वीकारण्यास खूप उशीर केला, गेल्याची खंत त्यांच्या अश्रूंच्या प्रत्येक थेंबात होती.


पूर्वी तर लहान मुलांच्या पात्रांना देखील गाण्यामध्ये लताचा आवाज दिला जायचा. गेल्या वर्षी आलेल्या ‘दंगल' मध्ये ‘बापू सेहत के लिये' या गाण्यात  सरवार आणि सरताज खान या चिमुरड्यांचा अस्सल हरियनावी आवाज देण्यात आला. ‘हायवे' सिनेमात मुक्त आकाशात स्वतःला शोधायला निघालेल्या आलिया भट ला ‘नुरान सिस्टर्स' चा रांगडा आवाज देण्यात आलाय. हिंदी सिनेमाच्या प्रगतीस हानिकरक असणारे ‘लीप सिंकिंग’ पार्श्वगायन सोडून स्वतः कॅमेऱ्यासमोर येऊन व्यक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. स्वतःला निःसंकोचपणे प्रेझेंट करताना उतारवयात आपण व्यसन करतो, याचा अजिबात गंड न बाळगणाऱ्या बेगम अख्तर, यांनी पुन्हा जन्म घेऊन मैफलीत गात बसावे इतके सर्वसमावेशक वातावरण तयार झाले आहे. आकाशात राहून सर्वांना शीतल छाया देणाऱ्या चंद्राकडे पाहता पाहता अनेक तारका डोळ्यांना दिसल्या नाही, हे मान्य करायला फार उशीर झाला असे वाटते, लता मंगेशकर यांचे स्थान तर अढळ आहेच, पण उशिरा का होईना नव्या, स्वयंप्रकाशित तारकांमुळे स्वरांचे आकाश उजळून निघाले हेही कमी नाही...


- जीतेंद्र घाटगे
jitendraghatge54@gmail.com

बातम्या आणखी आहेत...