आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुजकुट विनोदी फुगे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमागृहात रमतगमत २०० रुपयाचे पॉपकॉर्न खाणारा प्रेक्षक, मला हल्ली एका आलिशान गाडीत सफर करणारा रंगेल इसम वाटतो. एखाद्या सिग्नलवर कुणी ‘हिजडा’ गाडीजवळ आला, तर तुच्छतेने काच खाली करून घेतो. आणि हिंदी-मराठी कॉमेडी शोजमध्ये एखाद्या पुरुष पात्राने स्त्रीचे कपडे घालून अंगविक्षेप करून नाच केला, की त्याला टाळ्या वाजवत पोट धरून हसतो.
 
ही गाडी कुठे न्यायची अन् त्या खिडकीतून नेमकं काय पाहायचं, हे तो प्रेक्षक सोयीस्करपणे ठरवत आहे. अशाच खो खो हसणाऱ्या प्रेक्षकांची आठवण झाली, ते नुकत्याच आलेल्या ‘फुगे’ चित्रपटामुळे. त्यातली दोन्ही मुख्य पात्रे ‘गे’ असल्याच्या गोंधळातून झालेला विनोद, स्वप्नील जोशीने एका प्रसंगात स्त्रीचे घातलेले कपडे पाहून उडणारा हास्यकल्लोळ पाहिल्यावर आम्ही प्रेक्षक म्हणून अजूनही फुसके फुगे उडवण्यातच धन्यता मानतो, हीच गोष्ट लक्षात आली.

ऐंशीच्या दशकात अमिताभ बच्चन जेव्हा ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है’ गाण्यात स्त्रीवेषात समोर आला, तेव्हा त्याला प्रेक्षकांनी उचलून धरले. समाजात तृतीयपंथीयांचे स्वतःचे स्थान अधोरेखित करण्याऐवजी फक्त हास्यनिर्मितीसाठी त्यांचा उपयोग करण्याची ती सुरुवात होती. त्या गाण्याला मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादाचाच परिणाम, की त्यानंतर आलेला प्रत्येक स्टार अभिनेता हास्यनिर्मितीसाठी कधी ना कधी स्त्रीच्या वेषभूषेत पडद्यावर येत गेला.

या व्यक्तिचित्रणाला पहिल्यांदा सुरुंग लावला, तो मणिरत्नम यांनी. १९९३च्या जातीय दंगलीत मानवी सहृदयतेचे दर्शन घडवणारे ‘धर्मनिरपेक्ष तृतीयपंथी’ पहिल्यांदा ‘बॉम्बे’ सिनेमात दिसले. हिंदू जमावाच्या टोळीच्या तावडीतून मुस्लिम मुलाला सोडवणारे इतके जिवंत पात्र यापूर्वी कधीच पडद्यावर आले नव्हते. सत्य घटनेवर आधारित एका तृतीयपंथी पात्राभोवती फिरणारा ‘तमन्ना’ या विषयावर आलेला पहिला सिनेमा होता.
 
महेश भट्ट दिग्दर्शित या सिनेमाने ‘हिजडा’ या शब्दाकडे नव्या अर्थाने पाहायला भाग पाडले. एका अभिनेत्रीच्या पोटी जन्म घेतल्याने आपली लैंगिक घुसमट कुठे व्यक्त करता नाही, म्हणून आईला ‘आई’ म्हणून हाक न मारू शकणारे पात्र ‘दरमियाँ’ कल्पना लाजमी दाखवते. पण अशी उदाहरणे विरळीच.
 
प्रेमाच्या अनेक रूपांबद्दल नेहमी बोलणारा हिंदी सिनेमा समलैंगिक प्रेमाबद्दल तितकेसे धाडसाने बोलताना दिसत नाही. कुणी त्या बाबतीत जाणीवपूर्वक प्रयत्न केलाच, तर त्याला सेन्सॉरपासून प्रेक्षकांपर्यंत अनेक प्रकारच्या विरोधाला सामोरे जावे लागते.
 
इरफान खान मुख्य भूमिकेत असलेला भारताचा पहिला समलैंगिक प्रेमावर आधारित ‘अधुरा’ सेन्सॉरच्या अवाजवी धोरणांमुळे कधीच प्रदर्शित होऊ शकला नाही. ट्रान्ससेक्शुअल संकल्पनेबद्दल भारतीय जनमानसात अनेक गैरसमज आहेत. याच विषयावर आधारलेल्या श्रीधर रंगायन दिग्दर्शित ‘गुलाबी आइना’चे सेन्सॉर बोर्डाने संमती न दिल्याने व्यावसायिक प्रदर्शन होऊ शकले नाही. 
 
अनेक चित्रपट महोत्सवात गौरवलेल्या ‘गुलाबी आइना’ला भारतीय सेन्सॉर बोर्डाने ‘अश्लील आणि घृणास्पद’ सिनेमा म्हणून नाकारले. एचआयव्ही समुपदेशक आणि पाच समलैंगिक पक्षकार यांच्यावर आधारित असलेला ‘६८ पेजेस’ वितरकांच्या उदासीनतेमुळे तसाच पडून राहिला. ‘गे’ संबंधावर आधारित भारताचा पहिला सिनेमा ‘बॉमगे’ (१९९६) बनवणारा दिग्दर्शक रियाद वाडिया या प्रकरणाने पुरता हताश झाला होता. आपला सिनेमा सेन्सॉर कधीच पास करू शकत नाही, या विचाराने त्याने तो कधी बोर्डापुढे सादर केलाच नाही! ज्यांचे सिनेमे प्रदर्शित होऊ शकले, त्यांनासुद्धा प्रेक्षकांच्या प्रचंड विरोधाला सामोरे जावे लागले. दीपा मेहताचा ‘फायर’ याचं एक बोलकं उदाहरण.

असं असलं तरी काही निर्माते, दिग्दर्शक धाडसाने पुढे येत आहेत. ‘गुलाबी आइना’चा दिग्दर्शक श्रीधर रंगायन हा प्रामुख्याने ट्रान्सेक्शुअल आणि समलैंगिक प्रेमसंबंधाच्या विषयांवर सिनेमे बनवत आला आहे. दिग्दर्शक ‘ओनीर’ याने ‘माय ब्रदर निखिल’ आणि ‘आय अॅम’ या संवेदनशील कलाकृतींद्वारे या विषयाला वाचा फोडली आहे. ‘ऋतुपर्नो घोष’ यांनी स्वतः ‘गे’ असल्याचं उघडपणे मान्य करून त्याबद्दल आपल्या सिनेमाद्वारे ‘जेंडर आयडेंटिटीपासून समलैंगिक संबंध’ याबद्दल अनेक पैलू समोर आणले आहेत. मूल दत्तक घेता यावे, म्हणून पुरुषाने केलेली लिंगबदल शस्त्रक्रिया, त्यातील भावनिक गुंतागुंत इतक्या समर्थपणे भारतात कुणीच मांडली नसेल, जेवढी ‘ऋतुपर्नो घोष’ यांच्या बंगाली सिनेमा ‘चित्रांगदा’ने मांडली. सिनेमा या बाबतीत किती मोठी भूमिका बजावू शकतो, हे सिनेमा या माध्यमाची ताकद जाणणाऱ्या प्रत्येकाला पुरेपूर माहीत आहे.
 
 गुलाबी आइना, दायरा, दरमियाँ, मेमरीज इन मार्च, चित्रांगदा, आय अॅम, अलिगढ हे त्यातलेच प्रयत्न. बॉलीवूडचा व्यावसायिक सिनेमा मात्र या विषयांवर मूग गिळून किंवा थट्टा उडवत चित्रण करत असेल तर या निकालाविरुद्ध आपण हा लढा अजून अवघड करून घेत आहोत.
 
असं म्हणतात की, सामान्य प्रेक्षक पडद्यावरच्या कलाकारांमध्ये स्वतःला पाहतो. समाजाचा एक अविभाज्य घटक असलेला गे, लेस्बियन, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर्स हा वर्ग सिनेमातल्या कुठल्या पात्रामध्ये स्वतःला पाहात असेल, याची कल्पना करवत नाही. तशी पात्रे पडद्यावर सहजपणे वावरताना न दिसण्याला सेन्सॉर बोर्ड, निर्माते, वितरक जेवढे जबाबदार आहेत, तितकेच अशा कलाकृतींना नाक मुरडणारे आपणही!

जागतिक सिनेमा या बाबतीत कधीच डोळस झालाय. भारतीय मुख्य प्रवाहातल्या सिनेमातसुद्धा अशी कॅरेक्टर्स नि:संकोचपणे दिसतील, त्या दिवसाची वाट पाहतोय. म्हणजे ‘करण अर्जुन’सारख्या सिनेमात एक भाऊ ‘गे’ असावा आणि तो तसा का आहे, याच्या कुठल्याही स्पष्टीकरणाशिवाय प्रेक्षकांनी तो स्वीकारावा. आमिर खानच्या एखाद्या व्यावसायिक सिनेमात त्याच्यासोबतची हिरोईन ही ‘लिंगबदल’ केलेली असावी आणि त्या हिरोला ती का आवडली, याचं स्पष्टीकरण त्याने देऊच नये.
 
सिनेमात त्याच्या पुढच्या आयुष्यात त्याच्या या निर्णयामुळे काय अडचणी येऊ शकतात आणि तो त्या कशा सोडवतो, याची स्पष्टीकरणेही नको. हे ऐकायला थोडं सोपं वाटत असेल; पण ही इच्छा कधी पूर्ण होऊ शकेल की नाही, हे कुणीच सांगू शकत नाही, आणि ही खरी शोकांतिका आहे. तोवर कुजकट विनोदाचे ‘फुगे’ नाही फोडले तरी पुरेसे. गाडीच्या खिडकीसमोर आलाच कुणी, तर खिडक्या उघड्या ठेवून स्वागत केले तरी पुरेसे.
 
» जागतिक सिनेमा या बाबतीत कधीच डोळस झालाय. भारतीय मुख्य प्रवाहातल्या सिनेमातसुद्धा अशी कॅरेक्टर्स नि:संकोचपणे दिसतील, त्या दिवसाची वाट पाहतोय.
 
jitendraghatge54@gmail.com 
बातम्या आणखी आहेत...