आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गूढ तत्वांच्या रम्य प्रदेशात...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्वसाधारण सिनेमे व्यक्तिरेखेच्या मानसिक अवस्थेचा शोध फार तटस्थपणे घेतात, पण त्या मनोवस्थेची अनुभूती आपल्याला कुणी देत नाही. ‘कौल’ मात्र या बाबतीत मास्टरस्ट्रोक मारतो. रूढार्थाने प्रचलित बोलपट, चित्रपट, ध्वनिपट आदी आजवरच्या सर्व संकल्पनांना सुरुंग लावतो...

Believe those who are seeking the truth; and doubt those who find it.
आंद्रे गिदचं हे वाक्य, ‘मला अंतिम सत्य गवसलंय’ असा आव आणणाऱ्या व्यक्तीचा संशय घ्यायला शिकवतेच, पण यापुढे जाऊन एखाद्या वैश्विक कलाकृतीचे मला पूर्ण आकलन झाले आहे, हे धाडसानं सांगणाऱ्या वृत्तीचाही वेध घेते...

एखादा लेखक, दिग्दर्शक कथा सादरीकरणाची चौकट अक्षरशः मोडीत काढतो. मग तो ‘रन लोला रन’ असेल किंवा ‘फाइट क्लब’ किंवा असले शेकडो प्रायोगिक सिनेमे. पण तिथे मध्यवर्ती गोष्ट, कथानक कुठेतरी स्पष्ट आहे. दृश्यात्मक पातळीवर एखादा वेगळा प्रयोगशील सिनेमा पाहायला मिळाला, तरी चित्रीकरणाचे विविध प्रयोग केले जातात केवळ. तेव्हा त्या चौकटीला महत्त्व दिले जातेच. जागतिक सिनेमाचा, त्यातल्या ग्रेट कलाकृतींचा संदर्भ सांगताना, दर वेळी ‘सिटीझन केन’, ‘सायको’ पासून टोरांटिनोच्या सिनेमापर्यंत बारकावे सांगितले जातात. हे बारकावे आपल्याच नकळत आपल्यामध्ये इतके भिनतात की सिनेमा कसा असू शकतो, याच्या शक्यतांना आपणच एका मर्यादेत बंदिस्त करून टाकतो. हे संस्कार इतके रूढ आहेत की, अजूनही उत्तम समजले जाणारे सिनेमेसुद्धा मास्टर शॉट, एक्स्ट्रिम लाँग शॉट, लाँग शॉट, मिड शॉट, क्लोजअप, एक्स्ट्रिम क्लोजअप यांची सरमिसळ करण्यातच अडकून पडलेत. कॅमेरा पॅन, टील्ट करणे या संज्ञा व्याकरण होऊन परवलीच्या झाल्या आहेत. ‘ओव्हर द शोल्डर’ शॉट, शिवाय दोन व्यक्ती सिनेमात बोलूच शकत नाहीत, हे अनेक लोकांच्या मनात पक्के बसले आहे. अशा वेळी रूढार्थाने प्रचलित बोलपट, चित्रपट, ध्वनिपट यांच्या आजवरच्या सर्व संकल्पनांना ‘कौल’ सुरुंग लावतो आहे.

“And those who were seen dancing were thought to be insane by those who could not hear the music.”
तत्त्वज्ञ फ्रेडरिक नित्शेेचे हे विधान सिनेमा सुरू होण्याअगोदर पडद्यावर येते. आपल्याच मनातल्या धुंदीत बेफाम नाचणारा समोरच्यासाठी वेडाच. त्याला कुठे ऐकू येतेय, ते संगीत. सर्वसाधारण सिनेमे व्यक्तिरेखेच्या मानसिक अवस्थेचा शोध फार तटस्थपणे घेतात, पण त्या मनोवस्थेची अनुभूती आपल्याला कुणी देत नाही. ज्या संभ्रमातून पडद्यातला माणूस जातोय, तोच संभ्रम प्रेक्षकांना पडत नाही. प्रेक्षक आपल्या कुवतीप्रमाणे, बुद्धीप्रमाणे त्याबद्दल विचार करेल, पण अगदी तादात्म्य पावणार नाही. ‘कौल’ मात्र या बाबतीत मास्टरस्ट्रोक मारतो. यातली प्रमुख व्यक्तिरेखा आपल्याहून काही वेगळं पाहात नसते. किंबहुना, त्याच्याहून वेगळं आपण काही पाहात नसतो. म्हणजे, मी जर अंधाऱ्या रात्री एका तळ्याकडे जात असेन, किर्र अंधारात काहीतरी चाचपडत असेन तर मला प्रत्यक्ष काही दिसणारच नाही. दिसेल ते सर्व अंधुक... डोळ्यांना ताण देऊन देऊन दिसणारं अर्धवट दृश्य... या बाबतीत ‘कौल’ काय करतो, तर तोच ताण पडद्यावर कसा संक्रमित करता येईल, ते पाहतो. सिनेमाच्या नामावलीपासून ब्लर (धुसर) दिसणारी अक्षरं उताणे पडलेल्या अवस्थेत पाहायला मिळतात. सिनेमाला तुम्ही अनुभूती मानत नसाल तर इथे तुमची चिडचिड होईल, हे नक्की.

पडद्यावरच्या व्यक्तिरेखेची मानसिक अवस्था इथे प्रत्येक प्रेक्षक अनुभवू शकतो. सिनेमातल्या घटनेमागची संकेतावस्था सगळ्यांसाठी वेगळी असल्याने, प्रत्येक प्रेक्षक त्याच्यापरीने चाचपडत राहतो. सगळ्याच प्रसंगाचे आकलन होत नाही. बऱ्याच गोष्टी गूढ आहेत, धूसर आहे, स्वप्नांसारख्या. काहीतरी प्रत्यय येतो, अनुभव येतो, पण पोहोचत कुठेच नाही. हे कुठेच न पोहोचणं भारी असतं. तुम्ही जर खानोलकरांच्या कादंबऱ्या, जीएंच्या दृष्टांतकथा, जे. कृष्णमूर्तींचं काळाच्या शेवटाचं (एण्ड ऑफ टाइम) तत्त्वज्ञान वा ग्रेसच्या कवितेशी परिचित असाल, तर हे असं भरकटणं किती भारी आहे, हे कळेल. जीएंच्या कथेसारखाच ‘कौल’देखील आपल्याला गूढ तत्त्वज्ञानाच्या प्रदेशात नेतो. मानवी मनाचे प्रश्न, बुद्धी, त्याच्या मर्यादा, कल्पना, सत्य-असत्याचा खेळ, मोक्ष, नेती यावर ‘कौल’मधला म्हातारा भाष्य करतो. जीएंच्या दृष्टांतकथा जीवघेण्या असतात. एकेक कथा म्हणजे डोकेदुखी. ज्याला पेलते, तो वाचतो. ‘कौल’चा दिग्दर्शक आदिश केळुस्करने पहिल्याच प्रयत्नात या डोके फिरवणाऱ्या प्रश्नांशी आपले नाते सांगितले आहे. अर्थात, आदिशवर या कुणाचाच प्रभाव नाही. त्याची स्वतंत्र शैली त्याने विकसित केलीय. त्याचे प्रश्न वेगळे आणि त्याची गूढ दुनिया ही वेगळी.

आदिशने ‘कौल’आधी काही शॉर्ट फिल्म्स तयार केल्या आहेत. त्या सर्वांचा गाभा हा कथानक फुगवणारा नसून मानसशास्त्रीय गुंतागुंत दाखवणारा आहे. मानवी मनाच्या अवस्थांचा वेध घेणारा आहे. ही अवस्था जशी प्रेमाची आहे, तशीच हिंसेचीदेखील आहे. ‘कौल’देखील नुसतं गोष्ट सांगण्याला महत्त्व न देता, पारंपरिक निवेदनशैली फेटाळत ‘Experience is the new entertainment’ असं सांगू पाहतो. आदिशची यामागची भूमिका काय आहे, हे जाणून घेण्यासाठी त्यासोबत चर्चा केली. तो म्हणतो की - ‘साधारणतः एखादी व्यक्ती वर्षातून पाच-सहा सिनेमे सिनेमा हॉलमध्ये जाऊन बघते. त्यात दोन तास म्हणजे, अगदीच नगण्य आहेत. पण जो प्रेक्षक मला त्याच्या आयुष्यातले हे दोन तास देतोय, त्याला असं जग उलगडून दाखवायचं आहे, जे इतर सिनेमात अनुभवायला मिळणार नाही. मला सिनेमाच्या माध्यमातून पडद्याच्या आतला अनुभव प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा आहे. सिनेमातलं कॅरेक्टर ज्या मन:स्थितीतून जातंय, ती मन:स्थिती मला प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची आहे. तो अनुभव एखाद्याला झेपणार नाही, या भीतीने कॉम्प्रोमाइज करून जर प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला नाही, तर मी तुम्हाला कोतं ठरवतोय, असं होईल. प्रेक्षकांची बौद्धिक पातळी कमी ठरवून त्यांच्या पैशाचा आणि वेळेचा अपव्यय करतोय, असं होईल.’

सिनेमा हे दृक‌्श्राव्य माध्यम असतानाही परंपरेने चालत आलेल्या ‘बोलपट’ संकल्पनेत अडकलेला सिनेमा आदिश बाहेर काढू पाहात आहे. नाटक, हिंदी सिनेमातल्या डायलॉगबाजीच्या वाचाळ संस्कृतीत ध्वनीचं महत्त्व मागे पडल्याची त्याला खंत आहे. ‘कौल’साठी केलेल्या साऊंड डिझाइनचं महत्त्व तो सांगतो, ‘आईच्या गर्भात असताना अगोदर ध्वनी ऐकू येतो, दृश्य तर बाहेर आल्यानंतर दिसते. आपले कान हे डोळ्यांपेक्षा जास्त क्रिएटिव्ह आहेत. डोळ्यांना जे दिसतं तेच खरं मानतात. कानांना अंदाज बांधावा लागतो. सिनेमागृह ही मोठी गुहा असल्याने त्यात प्रतिसृष्टी निर्माण करण्यासाठी ध्वनी दुय्यम ठेवून अनुभव कसा पोहोचवणार?’

चांगल्या साहित्यकृतीच्या बाबतीत असं म्हणतात की, गोष्ट सांगणारा जितका महत्त्वाचा, ऐकणाराही तितकाच महत्त्वाचा असतो. त्यामुळे कोणत्याही कलाकृतींचा अर्थ लावणे, आस्वादकाच्या क्षमतेवर अवलंबून असते. ही क्षमता प्रत्येकाची वेगळी असल्याने ‘कौल’ व्यक्तिसापेक्ष वेगळा अनुभव देणारा ठरतो. आदिशला या बाबतीत प्रेक्षकांचा अॅक्टिव्ह सहभाग अपेक्षित आहे. तो म्हणतो, प्रेक्षकाला मी फिल्ममेकिंगचा साचा मोडीत काढत सांगतो, की ‘अर्धी फिल्म ही मी तयार केली आहे आणि अर्धी ही तुमच्या डोक्यात असते. तुमच्या मागच्या आयुष्यात, मागच्या काही दिवसांत, आठवड्यांत जे काही अनुभवलंय, त्या अनुषंगाने फिल्म ही इंटरप्रिंट होईल.’

‘कौल’चा प्रत्येक व्यक्ती वेगवेगळा अर्थ लावत आहे. काहींना त्यातलं प्रमुख पात्र हे स्किजोफ्रेनियाने ग्रस्त वाटतंय, तर काहींना तो अध्यात्माकडे असलेला प्रवास जाणवतोय. काही अभासकांच्या मते, ‘कौल’ तत्त्वज्ञानाच्या प्रदेशात नेत असल्याने, त्यांना ती तत्त्वकथा वाटतेय, काहींना प्रतीककथा. ‘कौल’ला अपेक्षेप्रमाणे अगदी टोकाच्या प्रतिक्रियादेखील मिळत आहेत. काहींच्या मते, हा सिनेमा अगदीच निर्बुद्ध, जाणीवपूर्वक क्लिष्ट, प्रचंड कंटाळवाणा आहे. मला स्वतःला ‘कौल’ ल्युसिड ड्रीमचा अनुभव देणारा होता. ‘ल्युसिड ड्रीम’ म्हणजे, अशी स्वप्ने ज्यात आपण स्वप्न पाहात असतो, ही जाणीव असते. स्वप्नात घडणाऱ्या घटनांवर आपल्याला नियंत्रण करता येते. अशा स्वप्नांचीसुद्धा एक खासियत अशी की, बऱ्याच प्रतिमांचा बिलकुल उलगडा होत नाही. एकदम कसोशीने त्यात अॅक्टिव्ह असूनसुद्धा समोर दिसणाऱ्या घटना अनाकलनीय असतात. तरी आपण प्रयत्न करणे सोडत नाही, उलट स्वप्नातून जाग आल्यावर परत झोपून, त्याच ठिकाणी जायला धडपडतो. ‘कौल’ माझ्यासाठी असंच एक स्वप्न आहे. बऱ्याच प्रतिमा गूढ... जे आठवतंय तेही काहीतरी मोघम, पण प्रचंड आकर्षित करणारं आहे. बुद्धीला कळत नसला तरी हा सिनेमा अनेकांच्या मनाला स्वतःसोबत फरफटत नेतोय... गवसतो... तितकाच हातातून निसटतो... प्रचंड अस्वस्थता, अखंड घालमेल मागे ठेवत!

सिनेमाला मिळणाऱ्या ‘एक्स्ट्रिम’ प्रतिक्रियांमुळे सिनेमाचं प्रयोजन यशस्वी झाल्याचं आदिश मानतो. त्यातही व्यावसायिकतेने भंजाळलेल्या वातावरणात बॉक्स ऑफिसवर ‘कौल’ टिकाव धरू शकत नाही, याची जाणीवही त्याला आहे. पण मला यात खंत अशी वाटते की, महाराष्ट्रातला कानाकोपऱ्यातला प्रेक्षक मोठ्या पडद्यावर त्याच्या सिनेमाचा अनुभव घेऊ शकत नाही. एक्सिबिटर्सचा प्रायोगिक सिनेमांवरचा अविश्वास, रिलीजमध्ये चालणारी लॉबिंग या सर्वांशी झगडून त्याने मुंबई-पुण्यासोबत इतर शहरात ‘कौल’ प्रदर्शित केला. पण दुसऱ्या आठवड्यात कदाचित तो जास्त सिनेमागृहात पाहायला मिळणार नाही. त्यातल्या पावसात नंतर कदाचित कुणी भिजू शकणार नाही...

जीतेंद्र घाटगे
jitendraghatge54@gmail.com
बातम्या आणखी आहेत...