आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमचं आमचं सेम असतं...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकीय-लष्करी तणाव भारत, पाकिस्तान आणि चीन या तीन देशांना एकमेकांच्या विरोधात उभे करतात. पण आपली संस्कृती, आपल्यावर झालेले संस्कार आणि त्या संस्कारातून उद्भवलेले प्रश्न एकच आहेत, याची जाणीव चीनमध्ये हजार कोटीची कमाई करणारा ‘दंगल’सारखा सिनेमा करून देतो.

नुकत्याच पार पडलेल्या कझाकिस्तान येथील शिखर संमेलनामध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी चीनपिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आमीर खानच्या ‘दंगल’ सिनेमाची दिलखुलासपणे प्रशंसा केली. फक्त चीनमध्ये तब्बल १००० कोटीपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या ‘दंगल’ने तिथल्या सर्वात जास्त कमाई करणाऱ्या पहिल्या २० चित्रपटांच्या यादीत स्थान पटकावले आहे. एखाद्याच्या हृदयापर्यंत जाण्याचा मार्ग पोटाद्वारे जातो, असे म्हणतात. भारतीय व्यक्तीसमोर त्याच्या देशातल्या सिनेमाची स्तुती करणे, हादेखील इथल्या लोकांची मने जिंकण्याचा हमखास पर्याय आहे. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर किंवा ‘न्युक्लियर सप्लायर ग्रुप’मध्ये भारताच्या सदस्यतेबाबत मोदींनी सौम्य भूमिका घ्यावी, यासाठी ‘दंगल’चे केलेले कौतुक ही शी चीनपिंग यांची राजनैतिक चतुराई असू शकते. पण ‘दंगल’च्या लोकप्रियतेने चीनच्या जनमानसात अढळ स्थान मिळवले आहे, ही बाब कुणीही नाकारू शकत नाही. खरं तर चित्रपटाने मिळवलेले असे व्यावसायिक यश हे गुणवत्तेचा निकष असू शकत नाही; परंतु उपखंडाच्या सीमा पार करून तिथल्या प्रेक्षकाला एखादा सिनेमा आपल्या मातीतली कहाणी वाटतो, तेव्हा दोन्ही देशांतील सामाजिक-सांस्कृतिक साम्यस्थळे आणि विविधता तपासून पाहण्याची गरज वाटते.
 
भारत आणि चीन या दोन्ही विकसनशील देशांचे आर्थिक आणि सामाजिक विकासाचे टप्पे आणि त्यातली आव्हाने यात बरीच समानता आहे. कौटुंबिक रचना आणि पालक, शिक्षकांबद्दलचा आदर हा दोन्ही देशांतल्या समाजात सारख्याच प्रमाणात आढळून येतो. पाश्चात्त्य कुटुंब पद्धतीला अंगीकारण्यास दोन्ही राष्ट्रांत आकस दिसून येतो. लोकसंख्या, धार्मिक पगडा, समाजातील महिलांचे स्थान आणि स्त्रीभ्रूण हत्या, पितृसत्ताक पद्धती या संदर्भात भारताला जी आव्हाने पेलावी लागत आहेत, त्याच दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी चीन धडपडत आहे. हेच कारण असावे की, ग्रामीण भागातल्या लोकांच्या इच्छा-आकांक्षा, संधींपासून तुटल्यामुळे येणारी अस्वस्थता, त्यातून बाहेर पडण्यासाठीचा प्रयत्न आणि या सर्वांसोबत क्रीडा प्रकाराला असणारी देशभक्तीची किनार हे सगळे अधोरेखित करणारा ‘दंगल’ भारतीय आणि चीनच्या प्रेक्षकांना सारखाच अपील झाला. भावला.
 
मुली आणि स्त्रियांचे समाजातील महत्त्व अधोरेखित करणाऱ्या कलाकृतींना तिथल्या प्रेक्षकांनी उचलून धरण्याची ही पहिली वेळ नाही. छोट्या गावातल्या मुलीने शहरात येऊन केलेल्या मोठ्या करामती दाखवणारा अॅनिमेटेड सिनेमा ‘झुटोपिया’ने गेल्या वर्षी चीनमध्ये कमाईच्या उच्चांकाचे सर्व विक्रम मोडून काढले होते. सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट पाहणाऱ्या स्त्रियांची संख्या ही पुरुषांपेक्षा अधिक होती. शिवाय चीनमध्ये पूर्वी अस्तित्वात असलेल्या फक्त एक अपत्य ठेवण्याच्या सक्तीमुळे स्त्री भ्रूण हत्या हा तिथला सर्वात ज्वलंत मुद्दा होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर ‘दंगल’ने दिलेला स्त्री सबलीकरणाचा संदेश प्रेक्षकांना जाऊन भिडला, यात आश्चर्य नाही. एखाद्या देशातील राजकीय धुमश्चक्री तिथल्या मनोरंजन उद्योगात कशी उलथापालथ घडवू शकते, याचेही उदाहरण या निमित्ताने पाहायला मिळते आहे. सद्य:स्थितीत महाराष्ट्रात प्रेक्षक ज्याप्रमाणे मराठीपेक्षा हिंदी सिनेमाला प्राधान्य देतो, तीच गत चीनमध्ये पाहायला  मिळते. चीनमध्ये दरवर्षी तयार होणाऱ्या सुमार सिनेमांना कंटाळलेला स्थानिक प्रेक्षक हॉलीवूड सिनेमाकडे कधीच वळला आहे. अशा परिस्थितीत उत्तम कोरियन सिनेमा, कोरियन डेलीसोप, आणि त्यांचे ऑनलाइन स्ट्रीमिंग यावर प्रेक्षक अवलंबून होते. मात्र चीन सरकारने दक्षिण कोरियाला विरोध म्हणून या सर्व मनोरंजनाच्या पर्यायांना बंदी घोषित केली आहे. अशा वेळी केवळ ‘दंगल’च नव्हे तर अनेक उत्तमोत्तम हिंदी सिनेमांसाठी चीन ही मोठी बाजारपेठ सिद्ध होऊ शकते. भारत-चीन युद्धाची पार्श्वभूमी असणाऱ्या सलमान खानच्या आगामी ‘ट्युबलाइट’ सिनेमात चिनी अभिनेत्री झु झु मुख्य भूमिकेत आहे. मोठ्या लोकसंख्येला बाजारपेठ म्हणून लक्ष्य करणे, हा याचा प्रमुख उद्देश असला तरी येणाऱ्या काळात चीनच्या सहयोगाने निर्मित होणारे ‘क्रॉस कल्चरल’ भारतीय चित्रपट हे या दोन बलाढ्य देशांच्या सामाजिक आणि राजकीय नात्यांना कलाटणी देणारे असतील, हे निश्चित!
 
भारताचे पाकिस्तान आणि चीनसोबत संबंध राजकीय पातळीवर कितीही तणावाचे राहिले तरीही दोन्ही समाजाचा एकमेकांविषयीचा आकस दूर करणे सिनेमाच्या माध्यमाने अगदीच अशक्य नाही. पाकिस्तानात भारतीय अभिनेते आणि सिनेमाचं प्रेम सर्वश्रुत आहे. या वर्षी पाकिस्तानने भारतीय चित्रपटाच्या तेथील प्रदर्शनाची बंदी उठवली. त्यामुळे ‘दंगल’च्या प्रदर्शनाचा मार्ग सज्ज होता. मात्र तिथल्या सेन्सॉर बोर्डाने सिनेमातल्या भारताच्या राष्ट्रगीतावर कात्री मारूनच सिनेमा प्रदर्शित करण्याची अवाजवी मागणी केली. आमीर खान तसे होऊ न देण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम राहिला. या सर्व प्रकारात पाकिस्तानसमोर असणाऱ्या प्रश्नांशी भिडणारा आणि मातीसोबत नाते सांगणारा ‘दंगल’ एका मोठ्या वर्गापासून लांब राहिल्याची खंत कायम राहील.
 
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘फिल्मिस्तान’मध्ये एक सीन आहे. भारत-पाक सीमेवरच्या एका गावामध्ये पायरेटेड सीडी विक्रेता आफताबने ‘मैने प्यार किया’चा शो टीव्हीवर लावला आहे. गावातले सर्व लोक पिक्चर पाहण्यात रंगले असताना, नेमका महत्त्वाच्या क्षणी टीव्हीचा आवाज बंद होतो. दहशतवाद्यांनी बंदी बनवलेला भारतीय सनी तिथेच असतो. सिनेमाप्रेमी सनीने ‘मैने प्यार किया’ आधी बऱ्याच वेळेस पाहिलेला असल्याने त्यातले सर्व संवाद त्याला तोंडपाठ असतात. टीव्हीवरच्या मुक्या सीनला तो स्वत:चा आवाज देऊन तेवढ्यापुरता तो सिनेमा जिवंत करतो. सीन संपतो, तेव्हा गावातले सर्व लोक उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवतात. पुढे एकदा भारत विरुद्ध पाकिस्तानचा क्रिकेट सामना रेडिओवर ऐकत असताना बाकी सर्व लोक पाकिस्तानचा जयघोष करत असतात. भारतीय ‘सनी’ एकटाच ‘सचिन-सचिन’ ओरडत नाचत असतो. त्याला तिथेच थांबवून बंदुकीच्या धाकाने जबरदस्ती चूप केले जाते. क्रिकेट सामन्याच्या वेळी एकमेकांसमोर शड्डू ठोकणारे प्रेक्षक सिनेमाच्या निमित्ताने का होईना एकत्र येतात, हे प्रत्यक्ष आयुष्यातले सत्य ‘फिल्मिस्तान’ फार प्रभावीपणे मांडतो.
 
एका पाकिस्तानी मुस्लिम मुलीला तिच्या देशात परत घेऊन जाणारा ‘बजरंगी’ हा जसा हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक बनला, तसाच दोन्ही देशांतील संबंधाची वीण घट्ट करू पाहणारा प्रयत्न ठरला. पाकिस्तानमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये बॉलीवूडच्या ‘सुलतान’चा नंबर फार वरचा आहे. रामचंद पाकिस्तानी(२००८), लाहोर(२०१०), वॉर छोड ना यार(२०१३), क्या दिल्ली, क्या लाहोर(२०१४) या हिंदी सिनेमांनी दोन्ही देशांच्या प्रेक्षकांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. हे प्रयत्न कमकुवत आणि काहींना निरर्थक वाटू शकतात, पण सदर प्रयत्न देशातल्या विभिन्न प्रवृत्तींना सिनेमागृहाच्या एकाच छताखाली आणण्यास भाग पाडतात, हे कमी नाही. सलमान खानच्या आगामी ‘ट्युबलाइट’ला समीक्षकांनी कितीही नाकं मुरडली, तरी भारत आणि पाकिस्तानात ईद साजरी करण्यासाठी तो एक सामाईक दुवा ठरेल, ही नक्कीच स्वागतार्ह बाब आहे.

jitendraghatge54@gmail.com
बातम्या आणखी आहेत...