आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बाहुबली’चा अासेतु हिमालय धुमाकूळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१५-१६ वर्षांपूर्वीची गोष्ट इंटरनेट वा टोरेंट आजच्याइतके फैलावलेले नसल्याने प्रादेशिक सिनेमांची देवाणघेवाण आजच्याइतकी सहज नव्हती. तेव्हा नाशिकच्या एका सिंगल स्क्रीन सिनेमा हॉलमध्ये दुपारपासूनचे शो नवीन रिलीज होणाऱ्या हिंदी चित्रपटांचे असायचे. तर मॉर्निंग शो हा एखाद्या नेपाळी, भोजपुरी किंवा दक्षिणात्य सिनेमाचा असायचा. सिनेमाचे बाहेर जे छोटेसे पोस्टर लावलेले असायचे, ते नव्वदच्या दशकात असायचे तसे एकदम सुमार दर्जाचे. आम्ही बाराचा शो सुरू होण्याआधी थिएटरबाहेर रांगेत उभे असायचो, त्या वेळी सकाळचा शो पाहून बाहेर येणाऱ्या कुटुंबांना पाहून हिंदी सिनेमाला जाणारे प्रेक्षक हसायचे. एवढे भारी नवीन हिंदी सिनेमे सोडून कुठले भिकार चित्रपट हे पाहतात, असा एकंदरीत सगळ्यांचा सूर असायचा. पुढे कॉलेजला असताना परराज्यातल्या मुलांशी मैत्री झाली. एकमेकांमधल्या चांगल्या प्रादेशिक सिनेमांची देवाणघेवाण झाली. प्रत्येक प्रांताचे स्वतंत्र सिनेमे, त्यांच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांसह आवडायला लागले. पण एकंदरीत सगळ्याच मित्रांमध्ये आपलाच सिनेमा भारी, असा सूर असायचा. राष्ट्रभाषेतल्या नावाजलेल्या हिरोंची/सिनेमांची दक्षिणात्य मित्रांना नावंदेखील माहीत असू नयेत, हे तेव्हा धक्कादायक वाटायचे. ‘शोले’ न पाहिलेला माणूस कुणी असू शकेल, यावर विश्वासच नसायचा. पण आयुष्यात एकाही हिंदी सिनेमाच्या वाट्याला न गेलेले अनेक चित्रपटप्रेमी त्या दरम्यान पाहायला मिळाले. हेच कारण असावे की, आज बाहुबलीने कमावलेले शेकडो कोटींचे आकडे समोर येत आहे, त्याकडे केवळ बॉक्स ऑफिस कलेक्शन म्हणून बघता येत नाही. प्रादेशिक अभिमान सोडून भारतातल्या कानाकोपऱ्यांतल्या प्रेक्षकांनी साजरा केलेला, तो एक सामूहिक सोहळा आहे. भारताच्या जातिव्यवस्थेमध्ये आणि सांस्कृतिक, भाषिक वैविध्यामुळे विभागल्या गेलेल्या भारतीय सिनेसृष्टीत एक अॅनोलॉजी आहे. सिनेमाची भाषा ही युनिव्हर्सल मानली जात असली, तरी दुसऱ्या जातिधर्माबद्दल मनात आकस ठेवणारे जसे अाहेत, तसे दुसऱ्या भाषेतल्या सिनेमांकडे तुच्छतेने पाहणारे सर्वच समाजांत कमी-अधिक प्रमाणात आहेत. सगळ्या समाजात पोटजाती जशा आपली मुळे घट्ट धरून आहेत, त्याप्रमाणे सिनेमातसुद्धा क्लासेसचा, मासेसचा, पिटातल्या प्रेक्षकांचा, श्रमिकांचा, रिक्षावाल्यांचा सिनेमा, असे वर्गीकरण नकळत का होईना, झाले आहे. अशा परिस्थितीत एक प्रादेशिक दिग्दर्शक स्थानिक कलाकारांना घेऊन एक सिनेमा काढतो, आणि जुने प्रांतवाद मोडीत काढत, संपूर्ण ‘बाहुबली’कडे तेलुगूतला डब सिनेमा म्हणून न पाहता ‘भारतीय’ सिनेमा म्हणून पाहतो, ही लक्षणीय बाब आहे. भारतीय सिनेमाच्या १०० वर्षांच्या इतिहासात एखादा प्रादेशिक चित्रपट सर्व समाजात, सर्व राज्यांत अपील होण्याची कदाचित ही पहिलीच वेळ आहे. भारतीय चित्रपट म्हणजे फक्त बॉलीवूड, हा समज ‘बाहुबली’ मोठ्या दिमाखाने मोडून काढतो आहे. 
 
हिंदी सिनेमाच्या दिग्दर्शकांनी आणि प्रेक्षकांनी प्रादेशिक सिनेमांना डावलण्याचा इतिहास जुना आहे आणि भव्य पौराणिक, ऐतिहासिक चित्रपटांची परंपरा हिंदीपेक्षा तेलुगू सिनेमात जास्त ठळकपणे दिसून येणारी आहे. श्रेष्ठ भारतीय चित्रपट म्हणून ‘मुघले आझम’चे(१९६०) नाव जितक्या सहजपणे घेतले जाते, तेवढे तेलुगू क्लासिक ‘मायाबाजार’(१९५७)चे घेतले जात नाही. ‘मायाबाजार’ने (‘बाहुबली’चे लेखक के. व्ही. विजयेंद्र प्रसाद आणि दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांच्यावर ‘मायाबाजार’चा मोठा प्रभाव असल्याचे ते सांगतात.) पौराणिक सिनेमातल्या भव्य पोशाखपटाला, चमत्कारिक दृश्यांना फाटा देऊन भारतातल्या जनमानसात रुजलेल्या श्रीकृष्णाच्या एका उपकथेतला आशय समोर आणला होता. हे अगदीच स्पष्ट आहे की, ‘बाहुबली’च्या दोन्ही भागांवर लहान मुलांचे मासिक असलेल्या ‘चांदोबा’, ‘अमर चित्र कथा’ आणि त्यातल्या पौराणिक पात्रांचा पगडा आहे. एकेकाळी संपूर्ण भारतात बाराहून अधिक आवृत्तींमध्ये प्रकाशित होत असलेल्या ‘चांदोबा’ची स्थापना मूळ तेलुगू असलेल्या ‘अम्बुलीमामा’ या आवृत्तीने १९४७मध्ये झाली होती, हा योगायोग नाही. पौराणिक कथेविषयी असणारे लोभस अपील सगळ्या संस्कृतीमध्ये आणि समाजामध्ये सारखेच असल्याने एकेकाळी गुजराती, मराठी, बंगाली, ओरिया, आसामी, संस्कृत, सिंहली, तामीळ भाषेत चांदोबाचा गाजावाजा झाला. त्या अर्थाने तेलुगू आणि डब केलेल्या ‘बाहुबली’चे यश हे मायाबाजार आणि ‘चांदोबा’चे भारताच्या सिनेमा आणि बालसाहित्यातले योगदान अधोरेखित करणारे  आणि म्हणूनच व्यापकही आहे. मूळ तेलुगू स्वरूपात असलेले चांदोबा जसे सगळ्या राज्यांमध्ये वाचले गेले, तसे ‘बाहुबली’ आज संपूर्ण भारतभरात धुमाकूळ घालतो आहे.
 
भारतीय जातव्यवस्था अभिमानाची बाब नसली, तरी इथल्या सिनेमातील विविधता नक्कीच अभिमानस्पद आहे. भारत सोडून जगभरातला कुठला देश इतक्या विभिन्न प्रकारच्या संस्कृतींना सिनेमाद्वारे समोर आणत असेल, याचे उत्तर ‘नाही’ असेच आहे. असे असले तरी बेगडी भौगोलिक अभिमानामुळे प्रादेशिक सिनेमा भारताच्या एकात्मतेचे माध्यम कधीच बनू शकला नाही, हेही कटू वास्तव आहे. दक्षिणात्य सिनेमा बॉलीवूडच्या जडणघडीत ज्या मोठ्या प्रमाणात योगदान देत आहे, ते मान्य करण्यास खूप मोठा काळ जावा लागला आहे. एेंशीच्या  दशकातल्या जितेंद्रपासून आताच्या सलमान, अामिर, अक्षयपर्यंतच्या अनेकांना आपले सुपरस्टार पद टिकवण्यासाठी दाक्षिणात्य रिमेकची गरज पडत गेली, हे उल्लेखनीय आहे. काही वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन, अजय देवगन यांनी भोजपुरी सिनेमात काम केले. सध्या प्रियांका चोप्रा मराठी, पंजाबी, भोजपुरी सिनेमाच्या निर्मितीत उतरली आहे. अक्षय कुमार तामीळ ‘रोबोट २.०’ सिनेमातून रजनीकांत सोबत पदार्पण करत आहे. ‘बाहुबली’च्या हिंदी वितरणाचे हक्क, ‘सैराट’च्या रिमेकचे हक्क करण जोहरसारख्या व्यावसायिक निर्मात्याने घेऊन प्रादेशिक सिनेमाची ताकद आधीच ओळखली आहे. हा सिनेमा सांस्कृतिक देवाणघेवाणीसोबत आर्थिक बाबतीत किती मोठी झेप घेऊ शकतो, हे आसेतु हिमालय स्वीकारार्हता मिळवलेल्या ‘बाहुबली’च्या निमित्ताने ठळकपणे समोर आले आहे...
 
jitendraghatge54@gmail.com 
बातम्या आणखी आहेत...