Home | Magazine | Rasik | Jitendra Ghatge Writes About Sardar Sarovar

संघर्षाची नदी

जितेंद्र घाटगे | Update - Oct 01, 2017, 12:11 AM IST

योगायोगच हा एका बाजूला सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांचा साधा उल्लेखही न करता पंतप्रधानांनी सरदार सरोवर धरणाचे

 • Jitendra Ghatge Writes About Sardar Sarovar
  योगायोगच हा एका बाजूला सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांचा साधा उल्लेखही न करता पंतप्रधानांनी सरदार सरोवर धरणाचे लोकार्पण करावे आणि दुसऱ्या बाजूला विकासाच्या नावाखाली चाललेल्या विनाशाचे रूप दाखवणारा ‘नदी वाहते’ प्रदर्शित व्हावा...

  गे ल्या आठवड्यात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. नर्मदा नदीवर बांधण्यात आलेल्या सरदार सरोवर धरणाचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. एकीकडे विकासाचा भव्य यज्ञ धडाक्यात सुरू असताना दुसऱ्या किनाऱ्यावर त्या यज्ञात दिल्या जाणाऱ्या आहुती जीव सोडण्याआधी शेवटची लढाई लढत होत्या. अनेक वर्षे नेटाने चालू असलेल्या ‘नर्मदा बचाओ आंदोलना’च्या प्रमुख नेत्या मेधा पाटकर सहकाऱ्यांसोबत सत्याग्रहास बसल्या होत्या. पुनर्वसन न होऊ शकलेले विस्थापित हातपाय सडेपर्यंत पाण्यात स्वतःला बुडवून घेत गाव न सोडण्यावर ठाम होते. १९२ गावे, तिथली भाषा, त्यांची संस्कृती सगळेच नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे ते जिवाच्या आकांताने जगाला सांगत होते. दुसरीकडे, दिग्दर्शक संदीप सावंत यांचा ‘नदी वाहते' सिनेमा प्रदर्शित झाला होता. तळकोकणातील ‘अंती' नदी आणि नदीकाठची गावे वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका समूहाची ही संघर्षकथा दोन परस्परविरोधी घटनांमागच्या अंतःप्रेरणा आणि त्याचे परिणाम तपासून पाहण्यास भाग पाडत होती.

  सिनेमाचे मूल्यांकन कुठल्या निकषांवर करण्यात यावे यात पूर्वीपासून मतभेद आहेत. ‘कलेसाठी जीवन की जीवनासाठी कला' मतभेदाइतकेच जुने. तसेच ‘प्युरिस्ट' होऊन निव्वळ कलेचा आस्वाद घ्यावा की, कलाकृतीच्या अनुषंगाने अपरिहार्यपणे समोर येणाऱ्या प्रत्यक्ष जीवनातील प्रश्नांना सामोरे जावे हा वाद कधीही न संपणारा आहे. तरीही काही कलाकृती अशा असतात की, ज्या या सर्व निकषांच्या पार जाऊन दोन्ही प्रकारच्या रसिकांना अंतर्बाह्य हलवून सोडतात. संदीप सावंत दिग्दर्शित ‘नदी वाहते' हा चित्रपट अशाच मोजक्या कलाकृतींपैकी एक ठरावा.
  नदीशेजारी ज्यांची जमीन आहे ती विकत घेऊन त्या पाण्याचा वापर काही व्यवसायिक, राजकारणी लोकांच्या स्वार्थासाठी केला जाणार आहे हे गुरुजी, भाऊ, अनघा, तिची आई अन् त्यांचे इतर सहकारी यांना हळूहळू लक्षात यायला लागते. अशा वेळी ‘अंती'ला जिवंत ठेवायचे असेल तर तिच्या पाण्याचा वापर वाढवणे, अॅग्रो टुरिझम, शेती आणि पूरक व्यवसाय यातून रोजगारनिर्मिती करणे हे गरजेचे असल्याचे गुरुजी आणि इतर सहकाऱ्यांच्या पक्के लक्षात येते. नदीच्या वेगाला आवर घालण्यासाठी तिचा योग्य विनिमय करण्यासाठी नदीच्या पात्रात छोटे बंधारे बांधण्याची गरज असते. मात्र, गावच्या विकासाचे कारण देऊन नदीला बांध घालून तिथे रिसॉर्ट आणि पर्यटन केंद्र बांधण्याचा काही व्यावसायिक अन् राजकारण्यांचा डाव असतो. यातून पाण्याचे राजकारण, तरुणांचे शहराकडे स्थलांतर, शेतीविषयी अनास्था हे प्रश्न समोर येतात. मात्र, ३७ गावांमधून वाहणारी ‘अंती'नदी नेमकी कुणाची या वादात न पडता स्वतःला प्रवाही करणाऱ्या गटाची हा सिनेमा तितकीच प्रवाही गोष्ट सांगतो.
  संदीप सावंत यांनी बारीकसारीक तपशिलासह गावातले प्रश्न उपस्थित केल्याने भारतात आजवर बांधलेली धरणे, आंदोलन आणि त्याचे बरेवाईट परिणाम डोळ्यासमोरून गेल्याशिवाय राहत नाहीत. सरदार सरोवर प्रकल्पाच्या जोडीनेच उत्तर बिहारमधील कोसीचा बंधारा बांधण्यासाठी आपली जमीन देऊन विस्थापित झालेल्या हजारो शेतकऱ्यांचे योग्य पुनर्वसन अजूनही झालेले नाही. ‘कोसी' नदीवर सरकारने अयोग्य पद्धतीने बांधलेल्या छोट्या(?) बंधाऱ्यांमुळे लाखो शेतकरी वर्षानुवर्षे कायमस्वरूपी पुराने वेढलेले असतात. बातमी धरणाच्या उद््घाटनाची होऊ शकते, मुंबईच्या पावसाची होऊ शकते; परंतु वर्षानुवर्षे पुरात अडकलेल्यांची बातमी प्रसारित होत नाही. दरडोई उत्पन्न किंवा जीडीपी यासारख्या परंपरागत आर्थिक निर्देशांच्या संज्ञा वापरून आपण आपली ‘प्रगती' मोजत राहतो. त्यातही चलाखीने आकड्यांची फिरवाफिरवी करून देश कधी नव्हे ते प्रगतिपथावर असल्याचा खोटा देखावाही उभा करत राहतो. भाक्रा नांगल धरणाच्या उद््घाटनप्रसंगी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी, ‘धरणं ही आधुनिक भारताची मंदिरं आहेत' असे प्रतिपादन केले. पण थोड्याच दिवसांत याची दुसरी बाजू समोर आली अन् प्रसिद्ध अमेरिकन वकील आणि तत्त्ववेत्ता रॉबर्ट इंगरसोल याच्या पुढील विधानाचा प्रत्यय आला.

  "In nature, there are neither rewards nor punishments. There are consequences.’ आपण एकीकडे ‘विनाशकारी विकास योजनांचा' लाभ उचलत असताना दुसऱ्या टोकाला याचे consequences(परिणाम) भोगणारा एक वर्ग आहे. भारतात अनेक ‘भारत’ अन् महासत्तेची स्वप्ने पाहणारा अनेक लोकांचा ‘इंडिया’ सोबत राहतो. मेणबत्ती पेटवण्यापासून ते धरणग्रस्तांच्या न्याय मिळवून देण्यासाठी स्वतःला दिवसेंदिवस पाण्यात बुडवून घेणारे आंदोलक इथे आहेत. पण ज्यांच्या गावाची नोंद ‘इंडिया’च्या नकाशात आणि ‘जिवंत असण्याची' नोंद जनगणनेत केली जात नाही असे अनेक जीव सरकारवर नव्हे, तर जीवनदायिनी नदीच्या भरवशावर आपले आयुष्य व्यतीत करत असतात. प्रत्येकाचा ज्याच्या त्याच्या ‘अंती' नदीसाठीचा संघर्ष कुणीही दखल घेतल्याशिवाय चालू असतो. नद्यांच्या खोऱ्याचं पाणी अडवून विकसित केलेली पर्यटनस्थळे, लवासा प्रकल्प, सुब्रतो रॉय यांचा ‘अँबी व्हॅली' प्रकल्प या सर्वांना आपण ‘चमडी बचाव' लोकं जितक्या सहजपणे स्वीकारतो तितक्याच नेटाने सद्सदविवेकबुद्धी जागृत ठेवून यांना विरोध करणारा एक वर्गही पुढे येत असतो. असाच भूलथापांना बळी न पडणारा नदीच्या सोबतीने स्वतः व्यवसाय सुरू करू शकतो अशी जिद्द बाळगणारा तरुण वर्ग ‘नदी वाहते' मध्ये पाहायला मिळतो. ‘नर्मदा बचाओ आंदोलन'साठी आयुष्य वाहून नेणाऱ्या मेधा पाटकर, नदी प्रदूषणाने कॅन्सरग्रस्त होऊनसुद्धा ३० वर्षे ‘चलियार’ नदीच्या प्रदूषणविरोधी आंदोलनाचं काम करणारे के. ए. रहमान, म्हदई नदीसाठी लढणारे राजेंद्र केरकर या सर्वांनी दिलेल्या योगदानासारखे सिनेमातील ‘अंती'काठच्या तरुणांचे योगदान व्यापक नसते, पण क्षीणही नसते.

  सिनेमात गुरुजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नदीवर कष्टाने बांधलेल्या बंधाऱ्याला काही गावकरी तोडून टाकतात. तो पुन्हा बांधण्यासाठी हे पुन्हा सरसावतात तेव्हा गावातील राजकारणी अप्पांविरोधात काहीबाही बोलतो. चिडलेली अनघा दगड बंधाऱ्यातला एक दगड काढून अप्पावर भिरकावण्याच्या तयारीत असते. तिची आई मात्र अनघाचा हात घट्ट धरून तिला अडवते. अनघा शांतपणे तो दगड पुन्हा बंधाऱ्यात अडकवते. ‘अंकुर'पासून ‘फँड्री'पर्यंत सिनेमाच्या शेवटाला अन्यायी व्यवस्थेविरोधात भिरकावलेला दगड इथे मात्र बंधाऱ्यात अडकलेला दिसतो. इथे अपेक्षित असलेली विचारांची लढाई ते योग्य मार्गाने लढताहेत याची जणू साक्षच देत असतो! हा लढा स्थानिक असेल, पण नर्मदेच्या खोऱ्यात अहिंसक पद्धतीने चालवलेल्या आदिवासी सहकाऱ्यांच्या लढाईसोबत नाते सांगणारा ठरतो.

  ‘पर्यावरण विरुद्ध मोठे विकास प्रकल्प', ‘राजकारण विरुद्ध निसर्गसंवर्धनाचे दीर्घकालीन लाभ' हा लढा निरंतर चालू राहणार आहेच, पण याउपर जाऊन शाश्वत विकास कशाला म्हणावे, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची निकड "नदी वाहते' निर्माण करतो. एरवी नदी थांबली की तिथला समाजदेखील डबकं बनतो. मृत पावत चाललेल्या नद्यांमध्ये ‘श्वास' फुंकत तिला वाहतं ठेवणारा मराठी सिनेमा ‘नदी वाहते' तेच तर सांगतो. प्रवास चालू ठेवायलाच हवा... नदीचा... संघर्षाचा... आणि आपलासुद्धा!
  - जितेंद्र घाटगे, jitendraghatge54@gmail.com
 • Jitendra Ghatge Writes About Sardar Sarovar
 • Jitendra Ghatge Writes About Sardar Sarovar

Trending