आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलीवुडपुढचे धर्मसंकट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्म केवळ प्रेम शिकवतो, धर्म अहिंसेला प्रोत्साहन आणि हिंसेला नकार देतो. धर्म म्हणजेच शांती आणि धर्म म्हणजेच जीवन... ही सारी वचनं बाबा राम रहीमने खोटी ठरवली. पण हे वास्तव कधी धर्मांध संघटना, तर कधी परंपरावादी सेन्सॉर बोर्ड यांच्यामुळे  पडद्यावर येणं अवघड होत चालले आहे. 

काही वर्षांपूर्वी गाजलेल्या ‘पीके’ सिनेमात बोमन इराणी यांनी  टीव्ही चॅनेलच्या मुख्य संपादकाची भूमिका साकारली होती. त्यात ‘No news on religion and god’ ही भूमिका असल्याने कुठलीही धार्मिक बातमी टीव्हीवर दाखवायची नाही, हे त्यांनी ठरवलेले असतेे. आपल्या सहकाऱ्याला यामागचे कारण देताना, स्वतःच्या पार्श्वभागाकडे बोट दाखवत ते  सांगतात की ‘इथे जखमेच्या तीन खुणा आहे. काही वर्षांपूर्वी तुमच्या आवडत्या गुरूच्या विरोधात, एक बातमी दाखवली होती. तेव्हा त्यांच्या भक्तांनी माझ्या मागे त्रिशूल घुसवून दिला. त्या दिवसापासून मी निर्णय घेतलाय की, या देशात राहायचे असेल तर धर्माशी पंगा घेऊ नका!’ बोमन इराणींचा हा संवाद दुर्दैवाने केवळ पत्रकारितेतच नाही, तर सिनेमात आपल्या देशाची वास्तव बाजू मांडू न शकणाऱ्या कलाकारांचीदेखील कैफियत मांडतो. धर्म, श्रद्धा, आस्था याबाबत स्वतःची भूमिका घेऊन काही अपवाद वगळता कुठलाच सिनेकर्ता समोर का येऊ शकत नाही, याचेही या प्रश्नाला भिडताना आश्चर्य वाटत राहते.

बाबा राम रहीम गुरमीत सिंग याला कोर्टाने दोषी जाहीर केल्यानंतर झालेल्या ‘डेरा’ समर्थकांनी केलेल्या हिंसाचाराची भीषणता चक्रावून टाकणारी आहे. गुरमीत सिंगचे धार्मिक प्रचार-प्रसार राबवणारे सिनेमे बेधडकपणे कुणाच्याही विरोधाला न जुमानता थाटात प्रदर्शित केले जात होते. आता मिळालेली शिक्षा २० वर्षे भोगल्यानंतरही स्वतःचं उदात्तीकरण करणारे सिनेमे परत ते धूमधडाक्यात काढू शकतात, याबद्दल माझ्या मनात किंचितदेखील शंका नाही. मात्र पंचकुलामध्ये झालेल्या हिंसाचाराची कारणे शोधणारा, त्याचे संयमित पद्धतीने विश्लेषण करणारा आणि आपल्यातले खरे रूप दाखवून जमिनीवर आणणारा एकसुद्धा प्रयत्न भारतीय सिनेमात होऊ शकत नाही,ही वस्तुस्थिती आहे. सर्व धर्मात असणाऱ्या वाईट प्रवृत्तींवर व्यंगात्मकपणे नेमके बोट ठेवणाऱ्या आमिर खानच्या ‘पीके’ने पंजाब, हरियाणात रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. मात्र गुरमीत सिंगच्या समर्थकांनी केलेल्या हिंसाचाराचे भयानक स्वरूप पाहता पडद्यावरचा ‘पीके’ पृथ्वी सोडून परग्रहावर निघून गेला, ते बरच झालं, असे म्हणावे लागेल.

प्रेक्षकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील, असे कुठलेही प्रसंग सिनेमात असले, की सेन्सॉरकडून त्यांना कात्री लावली जाते. अर्थात, हे करताना जनतेचा प्रक्षोभ टाळणे हा हेतू असला तरी कुठल्या प्रसंगाने कुणाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, याची यादी हास्यास्पद होत चाललीये. तद्दन व्यावसायिक चित्रपट कधी कधी हीरोईक थाटात वाईट प्रवृत्तीचा बीमोड करतात. चार घटका भावनिक मैथुन असणाऱ्या सिनेमातील या घटना कितीही अतिशयोक्तीपूर्ण वाटत असल्या, तरी पडद्यावर का होईना, अशा प्रवृत्तींशी सामना केला जाऊ शकतो, ही सुखावणारी बाब असते. मात्र तुम्ही प्रत्यक्षात काय सिनेमातदेखील याविरोधात एक चकार शब्द काढू शकत नाही, ही वस्तुस्थिती आधी मान्य करायला हवी.
मात्र, याविरोधात काही सिनेमे क्षीण का होईना आवाज उठवत आहेत. पण त्यांची होणारी गळचेपी आपल्याच भविष्यावर प्रश्न उभे करणारी आहे. वाराणसीत होत असलेल्या मंदिरांच्या व्यापारीकरणावर, तिथल्या दांभिक प्रवृत्तींवर खोचकपणे प्रहार करणारा ‘मोहल्ला अस्सी’(२०१५) अशाच भावना दुखवल्या जातील, या कारणामुळे बॅन करण्यात आला. 

सर्व धर्मीय दांभिक ठेकेदारांना धारेवर धरणारा आणि प्रत्यक्ष देवालाच कोर्टात खेचणाऱ्या ‘ओह माय गॉड’ ला काही संघटनेच्या विरोधाला सामोरे जावे लागले. केरळात घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित सिनेमा ‘सिन्स’(२००५) मध्ये रोमन कॅथलिक चर्चच्या धर्मगुरुचे एका तरुणीशी असलेल्या संबंधाचे चित्रण करण्यात आले होते. अनैतिक संबंध आणि त्यातून धर्मगुरुने केलेला खून यावर आक्षेप घेतल्याने ‘सिन्स’ दक्षिण भारतात प्रदर्शित होऊ शकला नाही. ‘सिंघम रिटर्न्स’ मध्ये तथाकथित बाबाने संपूर्ण यंत्रणेला गुलाम बनवून टाकल्याने नेता, मंत्री, पोलीस हे त्या बाबांच्या पायाशी लोटांगण घालताना दिसतात. 

सिनेमाच्या ट्रेलरमध्ये हिंदू साधूला ‘व्हिलन’ दाखवण्यात आल्याने एका सीनमध्ये अजय देवगण त्या बाबाला मारण्याची भाषा करतो. ही दृश्ये आणि ‘मैं तेरा दो कौड़ी का प्रवचन सुनने नहीं आया हूँ’ असे संवाद हिंदूंचा अपमान करणारे वाटल्याने ‘हिंदू जनजागृती समिती’ने यावर आक्षेप घेतला होता. काही गटांकडून विरोध असल्याने रोष ओढवून घेण्यापेक्षा त्यातल्या बऱ्याच दृश्यांना प्रत्यक्ष सिनेमात कात्री लावण्यात आली. धर्माच्या ठेकेदारांना आपण सिनेमातसुद्धा धडा शिकवू शकत नाही, हे वास्तव यातून अधोरेखित झाले.अशा प्रकरणांना लपवून आपण आपलीच फसवणूक करून घेत आहोत. याबाबत ९०च्या दशकात पुण्याजवळ घडलेलं ‘वाघमारे बुवा’चं प्रकरण भोवळ आणणारं आहे. वय वर्ष १२ ते ६० पर्यंत शेकडो स्त्रिया ह्या बाबाच्या वासनाकांडात गुंतल्या गेल्या होत्या.  वेळीच समोर न आल्याने एकाच कुटुंबातल्या आई-मुलगी अशा अनेक जोड्या एकमेकांपासून लपवून ठेवल्याने त्यात अडकत गेल्या. हा किस्सा निव्वळ अंधश्रद्धेचा विषय न राहता, विवेक गहाण पडल्याने पूर्ण समाजाच्या अधःपतनाची कहाणी सांगतो. अशा कहाण्या धाडसाने कुणी समोर आणत नाही, तोवर अजूनही कानाकोपऱ्यात असे बुवा जन्माला येत असतात. 

सिनेमा किंवा माहितीपट हे केवळ घटनेचं  दस्तावेजीकरण नसते. वेळीच सावध करणारा तो एक इशारा असतो. कठड्यावर बसून संभ्रमात असणाऱ्या प्रवृत्तींना मागे खेचणारा तो हात असतो. याबाबत आनंद पटवर्धन यांचा ‘पिता, पुत्र और धर्मयुद्ध’ हा माहितीपट याचं उत्तम उदाहरण आहे. महापुरुष आणि धर्म यांचा सोयीस्कर अर्थ लावत धार्मिक-सांप्रदायिक अस्मिता आणि पुरुषी अहंगंड जेव्हा एकत्र येतात, तेव्हा होणाऱ्या परिणामांचे भीषण वास्तव पटवर्धन यांनी कॅमेऱ्यात कैद केले आहे. यातल्या पहिल्या भागात धार्मिक अस्मिता भडकवणारे राजकारण आणि हिंदू-मुस्लिम स्त्रियांना स्वतःच्याच धर्मात सामोरे जाव्या लागणाऱ्या समस्या दाखवल्या आहे. तर दुसऱ्या भागात ब्रेनवॉश करून पुरुषार्थाची हिंसक संकल्पना डोक्यात रुजल्याने प्रत्यक्ष हिंसेचे खरेखुरे चित्रीकरण आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुकाचा वर्षाव होऊनसुद्धा या माहितीपटाचे अनेक कट्टर संघटनांच्या विरोधामुळे प्रदर्शन होऊ शकले नव्हते. हे  दस्तऐवजीकरण दूरदर्शन वर प्रसारित करता यावे, म्हणून आनंद पटवर्धन यांना सुप्रीम कोर्टापर्यंत खेपा माराव्या लागल्या. नेमके याउलट हॉलीवूडमध्ये घडत असते. तिथे एकेकाळी शेकडो लहान मुलांच्या लैंगिक शोषणाला जबाबदार असणाऱ्या रोमन कॅथलिक धर्मगुरूंना उघडं पाडणाऱ्या अमेरिकन सिनेमाला ‘स्पॉटलाइट’ २०१५चा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर मिळतो.
‘पिता, पुत्र और धर्मयुद्ध’ या माहितीपटात शिवजयंती साजरी करणारे काही तरुण दाखवले आहेत. जयंतीच्या देखाव्यात त्यांनी धबधब्याखाली अंघोळ करणारी नायिका मंदाकिनी अर्धनग्न अवस्थेत दाखवली आहे. 

दिग्दर्शक जेव्हा मंडळातल्या सदस्यांना विचारतात की, या देखाव्याचा आणि शिवजयंतीचा काय संबंध? तेव्हा त्यातला एक जण सांगतो की, ‘शिवाजी महाराजांच्या काळात स्त्रियांना उघड्यावर स्नान करतानासुद्धा सुरक्षित वाटत असे, असा संदेश आम्हाला या देखाव्यातून द्यायचा आहे.’ पुरुषार्थ आणि धर्म  याच्यात गल्लत होऊन गर्तेत फसल्याने या सदस्यांचे हिडीस रूप पाहून कुणाचे टाळके ठिकाणावर नाही, आले तरच नवल! आपला पाय मागे खेचणारा हाच क्षण असतो. जावेद अख्तर यांचे सिनेमामुळे होणाऱ्या परिणामाबद्दल एक मिश्किल विधान प्रसिद्ध आहे. ‘हिंदी सिनेमे गेली अनेक वर्षे प्रेमकहाणी दाखवून प्रेम करायला शिकवत आहे. आम्ही कुठे काय शिकलो?’ सिनेमा पाहून लगेच कुणाचे मतपरिवर्तन होत नाही. तथाकथित बाबा, बुवांच्या आहारी गेलेल्यांना मागे परत आणण्यासाठी सिनेमाचं माध्यम अपुरे आहे. मात्र विवेकबुद्धी जागृत ठेवल्याने जे सीमारेषेवर लोंबकळत आहे, त्या व्यक्ती भिंतीपालिकडे जाण्याअगोदर विचार करतील, हे नक्की. माणसाला संकुचित, हिंसक बनवणारी श्रद्धा नसते, एवढे तर नक्कीच समजेल.
 
- जितेंद्र घाटगे
jitendraghatge54@gmail.com 
बातम्या आणखी आहेत...