आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचारतंत्राला 'जोकर'चे आव्‍हान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रचारतंत्रात वाईट असे काही नाही, पण सरकारी प्रचारतंत्राचा भाग होण्याऐवजी ‘स्वच्छ भारत अभियाना’तली नोकरशाहीतली भ्रष्टाचारी मानसिकता उघड करण्याचं धाडस तामिळ भाषेतला ‘जोकर’ दाखवतो आणि राष्ट्रीय पुरस्कारही मिळवतो.

सन २०१६. तामिळनाडूमधील एक छोटे खेडेगाव. या गावात लहान-मोठे सर्वच उघड्यावर शौचास बसतात. सार्वजनिक नळातून गढूळ पाणी भरून घेण्यासाठी रांगा लागतात. गल्लीतल्या कोपऱ्यात काही जण दारू पिऊन झिंगत पडतात, तर त्याच गल्लीत मुलं उघड्यावर शिक्षण घेताना दिसतात. एकीकडे वाळू माफिया दिवसाढवळ्या नदीतून सर्रास उपसा करत आहे, तर गावातल्या काही बाया टीव्हीवर सिरियल पाहण्यात दंग आहेत. हॉस्पिटलमध्ये आजारी माणसावर काही धर्मगुरू ‘हॅलेलुईया हॅलेलुईया’ असा जप करत त्यांना बरे करण्याचा प्रयत्न करत आहे. ‘उघड्यावर शौच मुक्त भारत’ या प्रकल्पाअंतर्गत एका शौचालयाचे उदघाटन करण्यासाठी भारताचे राष्ट्रपती तिथे आले आहेत. गावात बांधलेल्या एकमेव टॉयलेट शेजारी तिथल्या गरीब जोडप्यासोबत राष्ट्रपती फोटो काढतात. भाषणात एकीकडे ते स्त्री सबलीकरण आणि त्यांच्या आरोग्याचे महत्व पटवून देत आहेत, त्याच वेळी गावात एका ठिकाणी सरकारने बांधलेल्या अर्धवट टॉयलेटमुळे अपघात झालेली गर्भवती बाई शासन यंत्रणेच्या दुटप्पी भूमिकेमुळे उपचाराअभावी पोलिसांसमोर पडून आहे. अक्षम्य बेपर्वाईचं हे दृश्य पाहून स्वतःची चीड आल्याशिवाय राहत नाही. एकीकडे ‘डिजिटल इंडिया’कडे वाटचाल करणारा अन् माहिती तंत्रज्ञानाचा उदोउदो करणारा सुखवस्तू वर्ग आपण पाहत असताना भारताचं, भलतेच चित्र २०१६चा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘जोकर’ हा तामिळ सिनेमा आपल्यासमोर ठेवतो.
 
‘जोकर’ची एवढी प्रकर्षाने आठवण होण्याचे कारण म्हणजे गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनाचे निमित्त साधून ज्या आठवड्यात तो प्रदर्शित झाला, त्यानंतर एक वर्षाने ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ देखील त्याच तारखेला प्रदर्शित झाला. योगायोग असा की, दोन्ही सिनेमे ‘शौचालय’ बांधण्याच्या गोष्टीभोवती फिरत राहतात. असं असलं तरी एका भारतात किती विविध भारत नांदतात, याचं अंगावर येणारं तळागाळातलं चित्र ‘जोकर’ आपल्यासमोर ठेवतो.
 
स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीचा फायदा करून घेण्यासाठी अनेक निर्माते-सुपरस्टार आपले सिनेमे त्याच आठवड्यात प्रदर्शित करतात. त्यातही गेल्या काही वर्षात १५ ऑगस्टचे निमित्त साधून तात्पुरते का होईना प्रेक्षकांच्या देशप्रेमाला आवाहन करणाऱ्या सिनेमांची लाट आली आहे. मागच्या आठवड्यात आलेल्या ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ने घराघरांत शौचालय असणं, किती महत्वाचं आहे हे प्रेमकथेच्या गोड वेष्टनात सांगितलं आहे. हे दाखवत असताना, भारत सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’चा जाणीवपूर्वक प्रचारही केला आहे. अर्थात, त्यात चूक काहीच नाही. प्रोपागंडा फिल्ममध्ये असे प्रकार अनपेक्षित नसतात. परंतु नोटबंदी भारतीयांच्या भल्यासाठी होती आणि मागच्या तीन वर्षात भारत सरकारने किती शौचालय बांधले, यांचे आकडे स्वच्छतागृहाबद्दलचे गैरसमज, अंधश्रद्धा गावातल्या लोकांची मानसिकता अशा सर्व गोष्टी सामाजिक जाणिवेचं आणि एका प्रेमकथेचं आवरण चढवून आपल्याला ‘प्रेमकथा’मध्ये  पाहायला मिळतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ ऑक्टोबर २०१४ ला  गांधीजयंती निमित्त दिलेल्या भाषणात ‘स्वच्छ भारत अभियाना’ची नव्याने मुहूर्तमेढ रोवली. २०१९ पर्यंत भारत ‘उघड्यावर शौचमुक्त’ करण्याचा संकल्प सोडला. त्या निमित्ताने अनेक योजना सुरु करण्यात आल्या. त्यानुसार घरात शौचालय नसलेल्या व्यक्तीला ते बांधण्यासाठी सरकार आर्थिक मदत करते. अर्ज केल्यांनातर स्थानिक अधिकारी येऊन जागेची पाहणी करून जातात. तेव्हा मदतीची अर्धी रक्कम मिळते, आणि उर्वरित रक्कम टॉयलेट चे बांधकाम पूर्ण होत आले असतानाचे फोटोग्राफ सादर केल्यावर मिळते.
 
तामिळ भाषेतला ‘जोकर’ मात्र सरकारी प्रचारतंत्राच्या आहारी न जाता या योजनेची खरी परिस्थिती दाखवत व्यंगावर नेमके बोट ठेवतो. समाजाची आणि भ्रष्ट व्यवस्थेची कुरूप बाजू तो बेधडक आपल्यासमोर मांडतो. शासनाने मंजूर केलेली रक्कम वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून प्रत्यक्ष वापरकर्त्यापर्यंत पोचताना, कशी गळती लागत कमी होत जाते, याचे विदारक चित्र समोर आणतो. घरात शौचालय बांधल्याशिवाय आपली प्रेयसी लग्नाला तयार होत नाहीये, हे समजल्यावर जोकर ते बांधण्यासाठी यंत्रणेच्या खेपा मारतो. मात्र पैसे हातात मिळण्यासाठी ५०० रुपये भरून बँकेत अकाउंट उघडणाऱ्या व्यक्तीला केवळ शौच करण्यासाठी जे भांडे वापरले जाते, ते देऊन परत पाठवतात. ‘जोकर’ची मध्यवर्ती भूमिका ‘मन्नार’भोवती फिरते. भूतकाळात घडलेल्या काही धक्कादायक घटनांमुळे तो इतरांपेक्षा जरा जास्त विक्षिप्त वागत असतो. त्याने स्वतःला भारताचा राष्ट्रपती घोषित केले असते. जिथे अन्याय दिसेल तिथे, त्याच्या परीने तो लढण्याचा प्रयत्न करत असतो. ज्या सरकारी हॉस्पिटलमध्ये पुरेशा पोषणाशिवाय, एक महिन्यात १२ मुले दगावली आहे, दोन गर्भवती स्त्रियांनी चुकीचा अॅनेस्थेशिया मिळाल्याने जीव सोडला आहे, अशा ठिकाणी मन्नार एका पेशंटची भेट घ्यायला जातो. तिथले डॉक्टर मात्र त्याला सांगतात की, याच्या उपचाराची सोय आमच्याकडे नाही, तुम्ही याला प्रायव्हेट ‘अपोलो हॉस्पिटल’ला घेऊन जा. त्यावर ‘जोकर’ मन्नार उत्तर देतो, ‘तसं असेल तर आम्ही पुढच्या वेळी सरकार ऐवजी अपोलो हॉस्पिटल किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांनाच मत द्यायला हवं!’ सिनेमात यासारखे अनेक प्रसंग आहे जे नेमक्या विसंगतीला उघडं पाडतात. कधी आपल्याला हसवतात, अंतर्मुख करतात, तर कधी संताप निर्माण करतात. कधी सुन्नही करतात.
 
दोन घटका करमणुकीसाठी आलेल्या प्रेक्षकांना वाटू शकते की, कशाला हवे, असे उदास करणारे चित्र, मात्र असे चित्र आपल्याकडे आहे, हे स्वीकार करणे, हीच त्यांचे उत्तर शोधण्याची पहिली पायरी आहे. गावातल्या खऱ्या समस्यांना सामोरे जाताना ‘स्वदेस’मधील मोहन भार्गव म्हणतो की, ‘मैं नहीं मानता हमारा देश दुनिया का सबसे महान देश है, लेकिन ये जरूर मानता हूं की हम में काबिलियत है, इसे महान बनाने की.’ जोकरची भूमिका या विधानासोबत नाते सांगणारी आहे.
 
जोकर मन्नार आणि त्याचे दोन सहकारी मिळून भ्रष्ट व्यवस्थेशी आपल्या कुवतीनुसार झगडा देताहेत. मात्र पडद्याच्या आतला, त्याच्या भोवतालचा समाज आणि पडद्याबाहेरचा प्रेक्षक त्यावर हसण्यात मग्न आहे. ‘जोकर’च्या क्लायमॅक्स ला मन्नारचा एक सहकारी प्रेक्षकांकडे पाहून थेट प्रश्न विचारतो, ‘सर्वत्र अन्याय असूनसुद्धा तुम्ही मुर्दाडपणे जगत जातात. मात्र आमच्यातला कुणी उभा राहून याविरुद्ध लढा देतो, तेव्हा त्यालाच जोकर म्हणून हिणवतात! खऱ्या आयुष्यात तुम्ही स्वतःच सगळे जोकर नाहीत का?’ आपण असतो आपल्याच धुंदीत पण संयम ठेऊन. मारलेल्या मनाचं भूत आपल्याच अंगात दाबून ठेवतो. पाठीवरच्या वेताळाला सोडत नाही. पॅन्डोरा बॉक्स गच्च धरून बसतो. अशा वेळी कुणीतरी वेडसर ‘जोकर’ समोर येतो, अन् नको ते प्रश्न विचारतो, ज्याची उत्तरे माहित असून, कधी कुणी दिलेली नसतात. जोकर मात्र अलगद निसटतो... आपल्याला तळमळत सोडत!
 
jitendraghatge54@gmail.com
बातम्या आणखी आहेत...