आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Justis Mahadev Govind Ranade And Dr.Ambedkar Friendship

न्या.रानडे आणि डॉ.आंबेडकर: विचारांचे मैत्र!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे एकोणिसाव्या शतकातील एक थोर समाजसुधारक व द्रष्टे विचारवंत होऊन गेले. महात्मा फुले हे त्यांचे समकालीन समाजसुधारक, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विसाव्या शतकांतील क्रांतिकारी समाजसुधारक व दूरदृष्टीचे विचारवंत. स्वाभाविकपणे डॉ.आंबेडकर जसे महात्मा फुले यांचे वैचारिक अनुयायी होते, तसेच न्यायमूर्ती रानडे यांचे विचार व कार्य यासंबंधी डॉ. आंबेडकरांना सहानुभूती वाटणे स्वाभाविकच होते. डॉ. आंबेडकरांना त्यांच्या वडलांच्या कागदपत्रांमध्ये एका निवेदनाचे काही कागद दिसले. ब्रिटिश सरकारने 1892 मध्ये एक हुकूमनामा काढून महार समाजावर लष्करामध्ये घेण्यास बंदी घातलेली होती. त्याविरुद्ध दाद मागण्यासाठी एक निवेदन या कागदपत्रांमध्ये आढळले. ते निवेदन न्यायमूर्ती रानडे यांनी तयार केलेले होते, अशी आंबेडकरांना माहिती मिळाली. तेथून रानडेंबद्दल त्यांच्या मनात आदरभावना उत्पन्न होत गेली. त्या काळात राजकीय सुधारणा अगोदर की सामाजिक, हा वाद होता. राजकीय सुधारणेचे समर्थन न्यायमूर्ती तेलंग यांनी मोठ्या हिरिरीने केले. मात्र, लोकशाही व्यवस्था व राजकीय हक्क निर्माण करणे व त्याचे संरक्षण करणे, सामाजिक लोकशाहीवर अवलंबून आहे. अशी लोकशाही सामाजिक सुधारणेशिवाय निर्माण होऊ शकत नाही, असे न्यायमूर्ती रानडे यांना वाटत होते. डॉ.आंबेडकर यांनी याच विचाराचे समर्थन केले.
समाजसुधारक समाजालाच आव्हान देतो, तेव्हा त्याला कोणीही त्यागी असे संबोधत नाही. त्याच्याशी मैत्री करायला कोणी धजत नाही. तो तिरस्करणीय होतो. परंतु राजकीय नेता जेव्हा शासनाला आव्हान देतो, तेव्हा संपूर्ण समाज त्याच्या मागे उभा राहतो. आपला मुक्तिदाता म्हणून लोक त्याची स्तुती करतात. समाजसुधारक एकटा झुंजत राहतो. राजकीय नेता देशभक्त जनतेच्या पाठिंब्याने झगडत असतो. या दोघांमध्ये कोण जास्त धाडसी व कोणाचे धाडस मोठे, असा प्रश्न डॉ.आंबेडकर उपस्थित करतात. न्या.रानडे व महात्मा फुले हे समकालीन सामाजिक सुधारणेचे अग्रणी. दोघेही धर्मभोळेपणा, अंधश्रद्धा, पुरातन परंपरा व चालीरीती यांवर कडाडून टीका करणारे व दोघेही समाजाला आव्हान देणारे. दोघांचेही कार्य धाडसाचे व निर्भयपणाचे. दोघांनाही समाजाकडून एकटेपणा व कुचेष्टा सहन करावी लागली. म्हणून डॉ. आंबेडकर म्हणतात की न्या. रानडे यांची तुलना फक्त महात्मा फुले यांच्याशीच होऊ शकते. न्या. रानडे हे राजकारणी नव्हते; मात्र राजकारणावर त्यांचे बारीक लक्ष होते व ते राजकारणाचे चांगले अभ्यासकही होते, असे डॉ. आंबेडकरांना वाटे. न्या. रानडे हे बुद्धिवादी होते व ते आपले विचार, विवेक आणि अनुभव या कसोटीवर तपासून पाहत असत. न्या. रानडे हे मूलत: समाजसुधारक; परंतु त्यांनी भारताच्या राजकीय वाटचालीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. काही राजकीय नेत्यांना त्यांनी मार्गदर्शनही केलेले आहे.
डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या राजकीय विचारांचे तीन मुद्दे महत्त्वाचे म्हणून अधोरेखित केले आहेत. (1) आपले आदर्श काल्पनिक असायला नको, ते व्यावहारिक असायला पाहिजेत. (2) राजकारणामध्ये जनतेचा कल व त्यांच्या भावना महत्त्वाच्या आहेत. राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये हे महत्त्वाचे आहे.
(3) राजकीय वाटाघाटींमध्ये जे शक्य आहे, त्याचा विचार महत्त्वाचा. याचा अर्थ जे दिले त्यामध्ये समाधान मानणे, असा नाही. जे दिले ते नाकारता कामा नये, कारण समोरच्याला जास्त सवलती देण्यास भाग पाडण्यासाठी आपली शक्ती कमी पडते, याची आपल्याला जाणीव असते. डॉ. आंबेडकरांच्या मते, पहिला सिद्धांत केवळ स्वप्नाळूच नाकारू शकतो. दुसरा सिद्धांत स्वयंसिद्ध, तो नाकारणे धोक्याचे आहे. तिसर्‍या सिद्धांताबाबत मतभेद होऊ शकतात. किंबहुना याचमुळे काँग्रेसमधील सुधारणावाद्यांमध्ये मतभेद निर्माण झाले. डॉ. आंबेडकरांना न्या. रानडे यांची बाजू न्याय्य वाटते. तत्त्वांच्या बाबतीत तडजोड नको, पण एकदा तत्त्व मान्य असेल तर टप्प्याटप्प्याने सुधारणा मान्य करायला हरकत नाही. याबाबत लोकमान्य टिळक व न्या. रानडे यांच्यामध्ये एकवाक्यता होती. परंतु टिळकांना वाटे की अजून राजकीय सुधारणा पदरात पाडून घ्याव्यात. परंतु न्या. रानडे याबाबत साशंक होते. न्या. रानडे यांच्या या राजकीय सूत्राबद्दल कोणाला आक्षेप घेण्याचे कारण नाही. हे सूत्र व्यावहारिक व तर्कशुद्ध आहे. कारण टप्प्याटप्प्याने सुधारणा ही राजकीय अपरिहार्यता असते. त्यातूनच प्रगतीचा अंतिम टप्पा गाठता येतो, असे न्या. रानडे यांचे राजकीय सूत्र होते. न्या. रानडे यांच्याबाबत त्या काळात एक महत्त्वाचा आक्षेप घेतला जातो तो म्हणजे, ते देशाच्या स्वातंत्र्याला विरोध करत होते. भारताचे पारतंत्र्य हे नियतीनेच निश्चित केलेले होते, ते पारतंत्र्य भारताच्या हिताचे आहे व इंग्रजी साम्राज्यातच भारताचे हित आहे, असे न्या. रानडे यांना वाटते, असा त्या आक्षेपाचा आशय होता. परंतु त्याचा समाचार डॉ. आंबेडकर यांनी मोठ्या परखडपणाने आपल्या लेखी भाषणात घेतल्याचे दिसून येते. त्यात ते म्हणतात, हा आक्षेप न्या. रानडे यांच्या काही विधानांवरून निर्माण झालेल्या गैरसमजुतीवरून उद्भवलेला आहे. आपल्याकडे हिंदू आणि मुस्लिम राज्यकर्ते होऊन गेले, परंतु त्यांच्यामध्ये स्थानिक स्वातंत्र्याची आस्था नव्हती. तांत्रिक प्रगतीची ईर्षा नव्हती, संशोधनाचे साहस व विज्ञानाच्या प्रगतीची धडपड नव्हती. हिंदू किंवा मुस्लिम राज्यकर्त्यांमध्ये पाश्चात्त्यांप्रमाणे आपल्या समाजाची प्रगती झाली पाहिजे, याची आस नव्हती. मात्र आता या सुधारणा एक शतकापासून इंग्रजी राज्यामध्ये घडत आहेत, हे सर्व आपल्याला अनुभवाला येत आहे. सर्वांगीण प्रगतीच्या अनुषंगाने इंग्रजी राज्य हे एक वरदान आहे, असे न्या. रानडे यांना वाटले. परंतु यातून खरा संदेश घेण्याऐवजी गैरसमज निर्माण झाला. वस्तुत: या विधानातून न्या. रानडे यांना दोन संदेश द्यायचे आहेत. (1) इंग्रजी राज्यामुळे भारतीय समाजाला आपल्या सामाजिक व आर्थिक रचनेची पुनर्बांधणी करण्याची व नव्याने रचना करण्याची संधी व अनुकूलता लाभलेली आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताला कोणत्याही परकीय आक्रमणाला तोंड देण्याइतके सामर्थ्य यामुळे मिळू शकेल.
(2) इंग्रज साम्राज्यापासून बाहेर पडण्याअगोदर आपण एकात्म राष्‍ट्र आहोत व विचाराने, भावनेने व एकसमान ध्येयाने बांधलेले आहोत, याची खात्री व विश्वास वाटायला पाहिजे, नाहीतर एका गोंधळाच्या व विनाशाच्या गर्तेमध्ये अडकण्याची शक्यता निर्माण होऊ शकेल. डॉ. आंबेडकर म्हणतात,
न्या. रानडे यांचे हे भाष्य किती द्रष्टेपणाचे आहे, हे कोणालाही नाकारता येणार नाही. आपली राजकीय, सामाजिक व आर्थिक व्यवस्था सुरळीत राहणे, हे कोणत्याही समाजासाठी अपरिहार्य आहे, तेच न्या. रानडे यांनी यातून विशद केलेले आहे. अकाली होणार्‍या क्रांतीचे व परिवर्तनाचे धोके न्या. रानडे यांनी यातून दिग्दर्शित केलेले आहे. न्या. रानडे सेवेसाठी जगले, मोठेपणासाठी नाही. यातच न्या. रानडे यांचे मोठेपण सामावलेले आहे. डॉ. आंबेडकरांनी न्या. रानडे यांच्या याच विचार व कार्याचा यथोचित सन्मान केला आहे.