आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रंथ परिचय: होरपळीचा अस्वस्थ करणारा दाह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुष्काळ माणसांना असहाय्य बनवतो. एका क्षणात सामाजिक-सांस्कृतिक मूल्यव्यवस्था उद्ध्वस्त करतो. चिवटपणे जगू पाहणाऱ्या माणसांचं मन आणि शरीर सोलवटून काढतो. अशा अवस्थेत जगणे तळही गाठते आणि क्वचित उंचीही... त्याचंच दर्शन रेखा बैजल
यांच्या कथांमध्ये उमटतं...
अनेक दशकांपासून मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गाचे चक्र बिघडले आहे. ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, हे त्याचेच परिणाम आहेत. कृषिप्रधान असलेल्या आपल्या देशात ७० टक्के लोकसंख्या ग्रामीण भागाची रहिवासी आहे. शेती हाच मुख्य व्यवसाय असल्याने पावसाच्या कमी प्रमाणाचे अात्यंतिक तीव्र परिणाम ग्रामीण कुटुंबावर झाले आहेत. ग्रामीण कुटुंबाची वाताहत झाली आहे. शेती जवळजवळ उद््ध्वस्त झाली आहे. जनावरे पाण्याअभावी, चाऱ्याअभावी तडफडत आहेत. हे सर्व हताशपणे बघण्याखेरीज हाती काही नाही, अशी सध्याची अवस्था आहे.
संवेदनशील लेखकांना ही अवस्था आणि त्यातून जन्माला येणारे विषय अस्वस्थ करतात. दुष्काळात होरपळणाऱ्यांच्या व्यथा वाचकांपर्यंत पोहोचवण्याची त्यांना निकड वाटते. रेखा बैजल यांचा ‘दुष्काळ’ हा कथासंग्रह याच विषयाच्या संदर्भात आहे. शहरी वातावरणात राहात असल्या तरी लेखिका शेतकरी कुटुंबीय पार्श्वभूमीच्या आहेत. शेतकऱ्यांची अस्वस्थता आणि आत्महत्या याच्याशी त्यांचा जवळून परिचय आहे. ही सहअनुभूती प्रत्येक कथेत येते आणि वाचकाला त्यांच्या संवेदनशीलतेची साक्ष पटते.
या कथासंग्रहात एकूण १३ कथा आहेत. पाण्याअभावी होणारी वाताहत, आणि अन्नधान्याच्या तुटवड्यामुळे कौटुंबिक उद््ध्वस्तता या कथांमधून प्रकाशमान होते. दुष्काळाचा थेट परिणाम ग्रामीण जीवनावर झाला आहे. कामकाजाचे स्वरूप बदलले आहे. शेती दुय्यम दर्जाची ठरते आहे. इतकी की, त्यापेक्षा सफाई कामगार म्हणून जगणे शेतकऱ्यांच्या मुलांनी पत्करले आहे. एकत्र कुटुंबपद्धतीला तडे गेल्यानेही ग्रामीण जीवन विस्कळित झाले आहे. असा सर्व आशय या कथांमधून व्यक्त होतो.
‘दुस्काळ’ या पहिल्याच कथेत चाऱ्याच्या टंचाईमुळे पोटच्या मुलांसारखी वाढवलेली गुरे खाटकाला विकावी लागतात किंवा त्यांना मोकाट सोडून द्यावे लागते. या प्रसंगी घरातील पती-पत्नीची होणारी घालमेल ही कथा व्यक्त करते. अन्नधान्य पुरेसे नसल्याने जिथे माणसांनाच पुरेसे खायला मिळत नाही तिथे गुरांना काय देणार? हा सवाल वाचकांच्या मनाला घरे पाडतो. पाण्याअभावी स्त्रियांची होणारी मैलो न्् मैल वणवण ‘पाणी रे पाणी’, ‘हताश’, ‘स्वप्न’, ‘ओले आभाळ-कोरडे डोळे’ या कथांमध्ये येते. वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या या कथा केवळ पाण्यामुळे माणसाला माणुसकी सोडून द्यावी लागते, हे भयावह वास्तव मांडतात. ‘बाप’, ‘पळवाट’, ‘पदर’ या कथा अन्नधान्याच्या टंचाईशी जोडल्या आहेत. पोरांच्या पोटात चार घास जावेत, म्हणून शहराकडे निघालेली पंचफुला अपंग पतीला मागे ठेवते, तेव्हा ती जगण्याची अपरिहार्यता मांडते. शिक्षणक्षेत्रात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात येणाऱ्या ‘नातं’ या कथेत प्राध्यापकपदाच्या डोनेशनसाठी घरची शेती विकतो. मात्र ही भुई माय आहे… त्या ‘मायेचे’ आपल्यावर ऋण आहेत. त्या ऋणातून तो स्वत:ची सुटका करून घेऊ शकत नाही. ‘ऋण’ या कथेत शिक्षणासाठी डोनेशन दिल्याने कर्ज घेतलेल्या देवकाळेंच्या दादाला अंतिमत: आत्महत्या करावी लागते.
‘ऋण’ याच कथेत भ्रष्टाचारावर उपायही सुचवलेला आहे. अशोक शहरातली नॉन ग्रॅण्ट नोकरी सोडून आपल्यात खेड्यात शाळेत छोटीशी नोकरी पत्करतो, त्याची पत्नी प्रौढ साक्षरतेचे काम सुरू करते. ‘पाषाण’ ही कथा डोंबारी कुटुंबाची आहे. परंपरागत उदरनिर्वाहाची साधनं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होतात, त्या वेळी सहन करावी लागणारी होरपळ या कथेत प्रभावीपणे येते.
या कथा ‘लघुकथाच’ आहेत. थेंबभर पाण्यानं आभाळाचं दु:ख पेलण्याचा प्रयत्न करावा, असं काहीसं आहे. पण शब्दांच्या ओंजळीत जगड्व्याळ दु:ख कसं मावू शकणार? पण या दु:खांची ओळख या कथांमधून होते. या कथांचं वैशिष्ट्य आहे, त्यांच्यातील संवाद. प्रमाण भाषेत निवेदन करता करता संवाद असे की, संवादातून कथानक वेगानं पुढे जातं. भावना अधिक सुस्पष्ट व्हाव्यात. नाट्यमयता यावी. अशा वेळी कथेतले संवाद अभिव्यक्तींचे बलस्थान ठरतात. कारण, संवादातून विशिष्ट बोलीमुळे, शब्दप्रयोगामुळे प्रादेशिकता ठळकपणे व्यक्त होते. तशा अर्थाने, या कथा केवळ स्त्रीप्रधान नाहीत. यात संपूर्ण ग्रामीण विश्वाचे स्त्री-पुरुष, मुलं इतकंच काय पण जनावरांचंही चित्रण आलं आहे. प्रत्येक घटक कथेचा, अनुभवाचा विषय आहे. रेखा बैजलांच्या आजवरच्या लिखाणाचं हे वैशिष्ट्य नमूद करावं वाटतं की, त्यांनी केवळ स्त्रीवादी लिखाण केले नाही. मात्र एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की, ग्रामीण जीवन आता तद्दन ग्रामीण राहिलेले नाही. मोबाइल, इंटरनेट खेडोपाडी पोहोचले आहेत. शेतीचे धडेही नेटवरून मिळत आहेत. पण याची दखल लेखिकेने घेतलेली नाही. कदाचित त्यांचे कथाविषय ठरलेले, मराठवाड्यातले खेडे मागासलेले असावे, हे त्याचे उत्तर असू शकेल. खरं तर ‘जलपर्व’सारखी कादंबरी लिहून पाणीटंचाईवर उपाय सुचवणारी लेखिका प्रत्यक्षात सतत तीन वर्षांच्या दुष्काळाला तोंड देणाऱ्या मराठवाड्याची दुरवस्था बघते, कुटुंबाची दाही दिशांना होणारी पांगापांग बघते, तेव्हा ती सहवेदना वाचकांपर्यंत मन हेलावून टाकणाऱ्या कथेद्वारे पोहोचवून त्यांना अंतर्मुख करते. ‘दुष्काळ’मधल्या कथा याचीच साक्ष देतात.

दुष्काळ
लेखिका : रेखा बैजल, प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन
पृष्ठे : १३२, किंमत : रु.१५०/-
डॉ. ज्योती धर्माधिकारी
jyotijayantk@gmail.com