आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रमशक्तीचा योग्य उपयोग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्त्रियांच्या कल्याणासाठी (?) कागदावर अनेक योजना आखल्या जातात, पण त्या योजना राबविण्यासाठी जागा मिळविणे हे मोठेच संकट असते. उपजीविकेच्या/रोजगाराच्या ठिकाणी असणारे बांधकाम, कामाच्या जागेचा आराखडा, तिथे करावयाच्या सोयी यांकडे स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टिकोनातून पाहिले जाते का? काम करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या जागेच्या बाबतीत स्त्रिया आणि पुरुष यांत नक्कीच फरक केला जातो. बहुसंख्य स्त्रिया अनौपचारिक/असंघटित क्षेत्रांमध्ये काम करून आपली गुजराण करतात. त्यांना कामासाठी जागेची टंचाई भासते. जागेचे आरक्षण करताना महिला विक्रेत्यांसाठी बाजारात आणि महिला नाका कामगारांसाठी नाक्यावर जागा आरक्षित करणे, कचरा वेचणाऱ्या स्त्रियांसाठी वेगळ्या जागा ठेवणेही आवश्यक आहे.

शहरातील पुनर्वसन व पुनःस्थापनाच्या नियोजनशून्य प्रकल्पांमुळेही स्त्रियांच्या उपजीविकेवर फार परिणाम होतो. कारण या प्रकल्पांची आखणी करत असताना झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या स्त्रियांच्या रोजगाराचा विचार केलेला नसतो. घराजवळ धुणी, भांडी, स्वयंपाक, मुले सांभाळणे, मुलांना शाळेत पोहोचवणे, विक्रेती म्हणून काम करणे अशी विविध कामे करणारी ही श्रमशक्ती पुनर्वसनासाठी फार मोठी किंमत मोजते. कारण नव्या ठिकाणी असा रोजगार शोधणे आणि मिळवणे त्यांना कठीण होऊन बसते.

एकीकडे देशात कुशल कामगारांची उणीव आहे, असे म्हटले जाते; पण उपलब्ध मनुष्यबळाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जाते. स्त्रियांना रोजगारासाठी मदत म्हणून आजही शिलाई मशीन व घरघंटीचेच वाटप केले जाते. औपचारिक क्षेत्रांमध्ये नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या संख्येत वाढ व्हावी यासाठी त्यांना विशिष्ट कौशल्यांचे प्रशिक्षण देणे व त्यासाठी जागा उपलब्ध करून देणेही आवश्यक आहे. आज वस्तीजवळ समाजमंदिरे बांधली जातात, पण कालांतराने त्यांचे जुगाराच्या अड्ड्यात रूपांतर होते. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत इमारती बांधताना काही सदनिका समाजकार्यासाठी राखून ठेवल्या जातात; पण त्याही इतरच कामासाठी वापरल्या जातात. स्मार्ट शहरे निर्माण करताना भविष्यकालीन गरजा ओळखून स्त्रियांच्या श्रमशक्तीचा योग्य उपयोग करून घेतला तरच त्या शहरांचाही चिरकालीन विकास होईल.

(स्त्री मुक्ती संघटनेच्या संस्थापक सदस्य)
(smsmum@gmail.com)
बातम्या आणखी आहेत...