भांडी घासणे, कपडे धुणे, शिवणकाम, स्वयंपाक, केरवारा, धान्य दळणे ही कामे स्त्रिया घरात करतात तेव्हा ती कमी दर्जाची मानली जातात; पण याच कामाचे व्यवसायात रूपांतर झाले की ते व्यवसाय पुरुषांच्या हातात जातात. एखाद्या अनौपचारिक क्षेत्रात बायका मोठ्या प्रमाणावर काम करीत असल्या तरी त्यात यंत्रे आणि तंत्रज्ञान आले की प्रथम स्त्रिया त्या व्यवसायातून बाहेर फेकल्या जातात. प्रशिक्षण आणि भांडवलाचा अभाव, कामाच्या वेळेचे गणित आणि काम घरापासून दूर असणे यामुळे वस्तीतील फार कमी स्त्रिया
आपल्या कामाचे व्यवसायात रूपांतर करतात. मग स्त्रिया बाहेरून घरी काम आणतात किंवा सीझनल काम करतात, म्हणजे दिवाळीत पणत्या, रांगोळी, रक्षाबंधनाला
राखी, पाडवा, दस-याला झेंडूचे हार अशा वेगवेगळ्या सणांना लागणा-या गोष्टी तयार करतात किंवा विकतात.
शहरी गरीब स्त्रियांना कुठेही काम करताना त्यांच्या घरातली साफसफाई, भांडी, कपडे, स्वयंपाक हे करावे लागतेच. याशिवाय पाणी आणि संडास या दोन्हीसाठी रांग लागावी लागते. रेशनसाठी रांग आणि रॉकेलसाठी वणवण हेही त्यात येते. वस्तीपासून शाळा नेहमीच लांब असतात, त्यामुळे स्वतःच्या मुलांना त्यांनाच शाळेत पोहोचवावे लागते. त्यामुळे स्त्रिया शक्यतो घराजवळ मोलकरणीचे काम किंवा लवचिक वेळा असलेल्या कामांना प्राधान्य देतात. तरीही ज्यांना पोटासाठी वेळी-अवेळी घराबाहेर पडावे लागते, अशा स्त्रिया घरात कोणी सासू, जाऊ असे इतर बाईमाणूस नसले तर मुलीला शाळा सोडून घरी बसवतात आणि ती वयात आली की तिचे लग्न करून टाकतात.
वस्तीतील स्त्रिया जेव्हा चार किंवा आठ तासांसाठी घराबाहेर पडतात तेव्हा त्यांना परिसरात फारच कमी सार्वजनिक सेवा उपलब्ध असतात. किंबहुना नियोजन करताना त्यांच्या प्रश्नांचा, सुविधांचा विचारच फारसा केला जात नाही. वस्तीमध्ये पुरेशी शौचालये नसतात, पाळणाघरे नसतात, मोफत आरोग्य केंद्रे/सेवा सकाळीच असतात (जेव्हा त्यांना कामावर जायचे असते), पाणी संध्याकाळच्या वेळी येते, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सामाजिक सुरक्षेचा अभाव.