आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चविष्ट-खमंग भरल्या भाज्यांच्या या पाककृती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कापून-चिरून फोडणीला टाकलेल्या भाज्या नेहमीच खाण्यात येतात. मात्र झणझणीत मसाला भरून केलेल्या भाज्यांची चव लहानथोरांच्या जिभेवर रेंगाळतेच...
अशा काही चविष्ट-खमंग भरल्या भाज्यांच्या या पाककृती.
भरली कारली
साहित्य : कारली २५० ग्राम, २ मध्यम कांदे, हिरवी मिरची २-३, धने पूड १ चमचा, जिरे फोडणीसाठी, आमचूर २ चमचे, गूळ िलंबाएवढा, हळद १/४ चमचा, तिखट १/२ चमचा, बडीशोप १/२ चमचा, गरम मसाला १/२ चमचा, लसणीच्या चार-पाच पाकळ्या, मीठ चवीप्रमाणे, तेल फोडणीसाठी, खोबरे कीस व कोथिंबीर
कृती : सर्वप्रथम कारल्याला एक लांब काप देऊन त्यातील बिया काढून पोकळ करून घ्यावे. त्याच्या आत मीठ लावून १५ मिनिटे ठेवावे. नंतर पिळून धुवावे. कांदा, हिरवी मिरची, बडीशोप, अामचूर, लसूण एकत्र वाटून घ्यावे. नंतर कल्हईच्या पातेल्यात तेल घालून जिरे घालून वाटून ठेवलेला मसाला घालून परतावा. नंतर तिखट, हळद, धनेपूड घालून परतावं. गूळ, मीठ, गरम मसाला घालून सर्व सारण सारखे करावे. गार झाल्यावर कारल्यात भरावे. नंतर कढईत जास्त तेल घालून फोडणी करावी व त्यात भरलेली कारली घालून वाफ आणावी. झाकणावर पाणी घालून मंदाग्नीवर शिजवावे. भाजीत पाणी घालू नये. खाली उतरून खोबरे, कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

भरली वांगी
साहित्य : वांगी ५०० ग्राम, मेतकूट २ चमचे, तिखट अर्धा चमचा, मीठ चवीप्रमाणे, गोडा मसाला १/२ चमचा, खोबरे कीस २ चमचे, गूळ १ चमचा, दाण्याचा कूट ३ चमचे, जिरे फोडणीसाठी, तेल २ चमचे, धने पूड १/२ चमचा, हळद १/४ टी स्पून, तिखट १/२ चमचा, कोथिंबीर
कृती : कोवळी वांगी आणून देठ काढून त्या बाजूने अर्धा भाग आणि उलट बाजूने अर्धा भाग अशी चिरावीत. पाण्यात चिमूटभर मीठ टाकून वांगी त्यात टाकावीत म्हणजे काळी पडणार नाहीत. नंतर तिखट, मीठ, गोडा मसाला, दाण्याचे कूट, खोबऱ्याचा कीस व गूळ कालवून ते मिश्रण वांग्यात भरावे. पातेल्यात तेल घालून जिरे, हिंग, हळद, तिखट, धने पूड घालून परतावे. त्यात वांगी घालून परतावी. झाकण ठेवून झाकणावर पाणी ठेवावे व मंदाग्नीवर शिजवावे. खाली उतरल्यावर कोथिंबीर घालावी.
भरलेले टोमॅटो
साहित्य : कमी पिकलेले टोमॅटो अर्धा किलो, मध्यम आकारचे कांदे २, मसुराची डाळ १ वाटी, हिरव्या मिरच्या आवडीप्रमाणे, तेल अर्धी वाटी, बटाटे मध्यम आकाराचे ४, कणिक पाव वाटी, मीठ चवीप्रमाणे, साखर आवडत असल्यात चवीपुरती
कृती : टोमॅटोची वरची चकती काढून टाकावी व त्याला थोडे मीठ लावून उलटे ठेवावे. मसुराची डाळ शिजवून घ्यावी, बटाटे उकडून घ्यावेत. कांदे बारीक चिरावेत व तेलावर परतून घ्यावेत. मिरचीचे बारीक तुकडे करून घ्यावेत अगर वाटून घ्यावी. बटाट्याची साले काढून चुरून घ्यावेत आणि मसुरीच्या डाळीत मिसळून तिखट, मीठ, कांदा हे सर्व घालून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण गार झाल्यानंतर टोमॅटोत भरून कणिक भिजवून त्याच्या तोंडाला लावावी. कढईत तेल घालून तापल्यावर कणिक लावलेली बाजू आधी तळून घ्यावी व नंतर उलटवून झाकण घालून मऊ होईपर्यंत शिजवून खाली उतरावे.
भरली पडवळे
साहित्य : कोवळे ताजे पडवळ दोन फूट लांबीचे, बेसन १ वाटी, दाण्याचे कूट पाव वाटी, नारळाचा चव अर्धी वाटी, हिरव्या मिरच्यांचा ठेचा आवडीप्रमाणे, मीठ चवीप्रमाणे, कोथिंबीर, आंबट ताक अगर चिंचेचा कोळ, २ चमचे मेथीची पूड तळून, पाव चमचा कच्चा मसाला, फोडणीचे साहित्य
कृती : पडवळ धुऊन त्याचे चार इंच लांब तुकडे करावेत. बेसन तेलावर किंचित लालसर भाजून घ्यावे. त्यात वरील मसाला, थोडी साखर, हळद घालून सारणासारखे करावे. त्यात थोडे आंबट ताक अगर चिंचेचा थोडा कोळ घालून सारण ओलसर करून घ्यावे. पडवळातील बिया काढून टाकाव्यात व त्यात वरील सारण भरावे. कढईत जास्त तेल घालून फोडणी करावी व त्यात ती भरलेली पडवळे टाकावीत. हलवून वाफ आणावी. त्यावर झाकण ठेवून मंद आचेवर शिजवून घ्यावे. मधूनमधून पाण्याचा हबका मारावा. ही भाजी फार चविष्ट लागते.
भरली भेंडी
साहित्य : कोवळी भेंडी अर्धा किलो, बेसन अर्धी वाटी, शेंगदाण्याचे कूट पाव वाटी, ओल्या नारळाचा चव पाव वाटी, हिरव्या मिरचीचा ठेचा आवडीप्रमाणे, मीठ चवीप्रमाणे, तिखट अर्धा चमचा, हळद १/४ चमचा, साखर चवीप्रमाणे, धने पूड १/२ चमचा, चिंच २ चमचे, तेल, कोथिंबीर
कृती : भेंडी स्वच्छ धुऊन पुसून घ्याव्यात. त्याचे बोटाएवढे तुकडे करून मध्ये चिरावेत. बेसन तेलावर भाजून घ्यावे, त्यात दाण्याचे कूट, नारळाचा चव, मिरचीचा ठेचा, मीठ, तिखट, चिंचेचा कोळ, साखर, हळद, धणेपूड घालून सर्व एकत्र कालवावे. सारखे केल्यानंतर ते भेेंडीत भरावे. कढईत तेलाची थोडी जास्त फोडणी करावी, त्यात भेंड्या घालून हलवून झाकून मंदाग्नीवर ठेवावे. मधून मधून पाण्याचा हबका मारावा. चांगली वाफ आणावी. भेेंड्या मऊ झाल्यावर खाली उतरून कोथिंबीर घालून वाढावी.
बातम्या आणखी आहेत...