आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मार बोडीनं शाळा शिकायर छे'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही वर्षांपूर्वी ग्रामीण समाज मुलींच्या शिक्षणाबाबत फारसा जागरूक नव्हता. त्यामुळे त्यांना शाळेत पाठवलं तरी महाविद्यालयात पाठवण्याबाबत अनास्थाच होती. परंतु अलीकडच्या काळात संपूर्ण जगातला स्त्रियांच्या प्रगतीचा आलेख, कायद्याचं संरक्षण आणि सर्वच क्षेत्रांतली तिची झेप हे तळागाळापर्यंत पोहोचलं आहे. त्यामुळेच तिला शिकवायला आणि वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरीला पाठवायला पालक आता मनापासून तयार असतात.

मी महाविद्यालयात रुजू झाले तेव्हा युवक महोत्सवासाठी, वादविवाद स्पर्धेसाठी, साहित्य संमेलनासाठी मुलींना घेऊन जाणार म्हटल्यावर अनेक विरोधी सूर उमटले. कारण मुलींना घरापासून लांब आणि कुठे कधी पाठवलेच नव्हते. मग पालकांना आणि इतरांना समजावून मी विद्यार्थिनींना बाहेर घेऊन जाऊ लागले. त्यामुळे मुलींच्या कलागुणांना वाव मिळतो आणि त्यांचा विकास होतो, हे थोड्या दिवसांतच पालकांच्या लक्षात आलं. विरोध तर मावळलाच, उलट महाविद्यालय आणि शिक्षक यांच्याबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला. आपल्या मुलींना प्रगतीच्या मार्गानं घेऊन जाणारे शिक्षक गावाच्या आणि समाजाच्या प्रगतीसाठीच मुलींना सामावून घेत आहेत, याचीही जाणीव त्यांना झाली. शिक्षक आणि पालक यांचं कायमचंच विश्वासाचं नातं तयार झालं.

हळूहळू महाविद्यालयात येणाऱ्या मुलांबरोबरच मुलींची संख्याही वाढत गेली. आज दोनशे ते तीनशे मुली महाविद्यालयात नियमित येतात. हे ग्रामीण जीवनातल्या बदलाचं लक्षण आहे. या बदलत्या काळात मिळणाऱ्या संधीचं सोनं करणाऱ्या मुली कौतुकास पात्र आहेत. कारण सामाजिक बंधनं, घरकाम, लहान भावंडांची जबाबदारी, पाणी भरणं आणि शेतीची कामं या सर्वांतून त्या अभ्यासासाठी वेळ काढून अव्वल येतात. बदलाच्या काळाची पावलं ओळखून आता मुलींचं लग्न होईपर्यंतच शिक्षणाला अर्थ, अशी मानसिकता असणारा ग्रामीण समाज मुलींना शिकवू लागला आहे.

जूनमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू असताना एके दिवशी एक ७०-७५ वर्षांचे तरतरीत गृहस्थ समोर येऊन हसतमुखानं उभे राहिले. त्यांच्यासोबत कोवळ्या वयाची एक मुलगी डोक्यावरून पार छातीपर्यंत पदर ओढून (घुंघट घेऊन) उभी होती. ते उत्साहानं म्हणाले, ‘मार बोडीनं शाळा शिकायर छे.’ मी क्षणभर न कळून त्यांच्याकडे पाहिलं. त्यांनी प्रवेश अर्ज दिला. चौकशी केल्यावर समजलं की, नुकतंच लग्न झालेली ती त्यांची सून आहे. परंपरा आणि नवता यांचा मिलाफ करणारा तो समजूतदार गृहस्थ पाहून मला आनंद वाटला.

एकदा वार्षिक परीक्षा सुरू होत्या. पेपर सुरू होऊन वीस-पंचवीस मिनिटंच झाली असतील, एक मुलगी उठली आणि वर्गाबाहेर निघाली. तिला कारण विचारलं तर म्हणाली, ‘माजं बाळ है तठी. त्याले दूध पाजणं है.’ मी परवानगी दिली. तिची आई १४ दिवसांचं बाळ घेऊन बसली होती. शिक्षणासाठी तिची आणि तिच्या कुटुंबाची असलेली तळमळ मनाला स्पर्शून गेली. नुकत्याच झालेल्या परीक्षांच्या वेळी परिसरात एक सहा आसनी रिक्षा उभी होती. त्यात बांधलेल्या झोक्यात एक मध्यम वयाची बाई बाळाला झोका देत उभी होती. एकदा एक नऊ महिने भरलेली मुलगी पुस्तक बदलायला आली, तर अंगणवाडीत शिकवणारी शशिकला बीए पास झाल्यावर माझ्याजवळ येऊन म्हणाली, आमच्या गावातली ग्रॅज्युएट होणारी मी पहिलीच बरं का! तिच्या चेहऱ्यावरून आणि देहबोलीवरून आनंद ओसंडून वाहात होता. ती चार गाड्या बदलून आणि पाच किलोमीटर चालत इथपर्यंत येते, हेसुद्धा तिनं सांगितलं. या सर्व मुलींची परिस्थिती आणि अडचणी पाहून मन व्याकूळ होतं. पण त्यावर मात करून त्या शिकून स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करतात, हे पाहून आनंद वाटतो. जवळपास पन्नास वर्षांपासून ग्रामीण भागात शाळा आहेत. त्यात मुली लिहिण्या-वाचण्यापुरतं सुरुवातीपासूनच शिकत आहेत. पण मुख्य प्रवाहात येण्यासाठीची त्यांची धडपड आणि संघर्ष यांना आत्ता यश येऊ लागलंय. शेकडो विद्यार्थिनी माझ्यासमोर शिकून गेल्या असल्या तरी या परिसरातली पहिली वकील विशाखा रामचंद्र पठाडे हे नाव आत्ता पुढे येतं आहे. तसंच तडवी समाजातली पहिलीच पोलिस झालेली नजमा शाहमद तडवी, अॅनिमेशनच्या क्षेत्रात काम करणारी पाटील, ग्रंथालय साहाय्यक म्हणून काम करणारी पायघन, कंडक्टर झालेली अनुराधा प्रेमराज निकम, शिक्षिका झालेली विद्या कोलते अशा बोटावर मोजण्याइतक्याच मुली आज नोकरी करत असल्या तरी शिकणाऱ्या शेकडो मुलींना आणि पालकांना त्या प्रेरणा देत आहेत, हे नक्की.

समाजामध्ये विविध पातळ्यांवर होणारे बदल हे संयमानं आणि शांततेनं स्वीकारले जाणं, हाही शिक्षणानं दिलेल्या परिवर्तनाचा महत्त्वाचा परिणामच म्हणावा लागेल. गावातल्या मुलीसुद्धा आता सर्व प्रकारचे फॅशनेबल कपडे घालतात. अर्थात त्यांना ते घालू दिले जातात. त्यामुळे आता मुलींचं दिसणं कपडे घालणं, यापेक्षा तिचं वर्तन, शिक्षण आणि दृष्टिकोन यांना महत्त्व दिलं पाहिजे, याची जाणीव होताना दिसते आहे. त्याचप्रमाणं लग्नानंतर अनेकदा मुलींचे प्रश्न निर्माण होतात. तडजोडी करण्याच्या प्रयत्नानंतरही घटस्फोट होतात. पण पू‌र्वीप्रमाणे त्यांना सर्वस्वी दोषी ठरवलं जात नाही. तर सबंध घर आणि भोवताल त्या मुलीशी समजुतीनं वागतो. हेही एक सकारात्मक परिवर्तनाचं महत्त्वाचं पाऊल आहे. मुलींनी नव आत्मभान घेऊन उभं राहणं, ही या युगाची गरज आहे. म्हणूनच ती आता आपल्या आकांक्षांना गरुडाचे पंख लावून यशाचं आभाळ कवेत घेण्यासाठी निघाली आहे. पारंपरिक दृष्टिकोन, दुय्यमतेचा न्यूनगंड, नात्यांचा धाक आणि सामाजिक दडपण यातलं काहीच तिच्या इच्छाशक्तीला, आधुनिक व्यापक दृष्टीला आणि आत्मविश्वासाला दडपू शकत नाही. कारण या समाजाला उन्नत करणं हेच तिचं ध्येय आहे.तिला शिकायचं असेल तर घरकाम करत आणि सर्व जबाबदाऱ्या पेलत पुढं जावं लागेल, याची तिला जाणीव आहे. तिच्या स्वप्नांचा, ध्येयाचा, आनंदाचा आणि यशाचा झोका आता उंचच उंच जात राहणार आहे.

प्रा. ज्योती स्वामी, सोयगाव
jyoti25.swami@gmail.com
बातम्या आणखी आहेत...