आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समृद्ध परंपरेचे वारसदार ( प्रा. ज्योती स्वामी)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोयगावच्या गणपती उत्सवात काही वर्षांपूर्वी प्रत्येक भागात जिवंत देखावे केले जात. वर्षानुवर्षं नाट्यकलेचा इतिहास सांगणारी ही कला नव्या पिढीकडे हस्तांतरित करणाऱ्या,
पुढच्या पिढीला परंपरेच्या धाग्यात बांधून ठेवणाऱ्या अमृतमामा चौधरींसारख्या कलावंताची ही तळमळ आजच्या विद्यार्थ्यांमुळे फलद्रूप होते आहे.
को णतेही गाव असो, शहर असो की छोटीशी मानवी वस्ती, त्याला एक संस्कृती आणि इतिहास असतो. काही एक वैशिष्ट्य असतं. त्या सर्वांचा अभिमान घेऊनच त्या त्या प्रदेशातली माणसं जगत असतात. समृद्ध परंपरांसह जगत असताना त्या उन्नत करण्यासाठीही ती धडपडत असतात. सोयगाव परिसरही त्याला अपवाद नाही.
सोयगाव हा अनेक समृद्ध परंपरा, वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आणि वैश्विक ओळख असलेला परिसर आहे. अजिंठा, घटोत्कच व रुद्रेश्वर लेणी, वसईचा किल्ला आणि वाडी किल्ला हे स्थापत्याचे उत्कृष्ट नमुने आहेत. तर भैरवनाथ मंदिर (लोण्याचा देव), धारकुंड (महादेव) ही धार्मिक स्थळं, नाट्यकलेचा समृद्ध इतिहास आणि मराठी साहित्याला समृद्ध करणारे ना. धों. महानोरांचे साहित्य अशा कितीतरी गोष्टींनी या परिसराला वैश्विक ओळख दिली आहे. १८८०नंतर पश्चिम महाराष्ट्रात जेव्हा देवल आणि किर्लोस्कर यांच्या संगीत नाटकांचे सुवर्णयुग अवतरले होते, तेव्हा सोयगावच्या भूमीत नाट्यकला रुजू लागली होती. सोयगावचे रामजी पाटील यांनी प्रोत्साहन देऊन आणि स्वत: लक्ष घालून सोयगावातल्या तरुणांकडून नाटकं बसवून घेतली आणि तीच परंपरा पिढ्यान््पिढ्या हस्तांतरित होत राहिली. ही परंपरा केवळ सोयगावपुरतीच मर्यादित राहिली असं नाही, तर सोयगावनेच मराठवाड्यात नाट्यपरंपरा रुजवली म्हटले तर फारसे वावगे ठरणार नाही. रामजी पाटलांचे सुपुत्र लोटू पाटील यांनी सोयगावला ‘नाट्यपंढरी’ म्हणून ओळख दिली. त्यांच्या काळात मुंबई-पुण्याहून कलाकार सोयगावात येत असत आणि नाटक सादर करत असत. ते पाहण्यासाठी खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्यातून अनेक प्रेक्षक येत असत. १९३८मध्ये सोयगावात भव्य नाट्यगृह बांधले गेले. म्हणजे त्या काळातही नाट्यकलेची त्यांना किती जाण होती, हे लक्षात येते. त्या काळात रामनवमीला मोठा नाट्यमहोत्सव होत असे. त्यात सर्व व्यावसायिक नाटकं होत असत. त्याला तिकीटही असे. पण हौशी कलाकारांना त्यात संधी मिळत नव्हती. मग हौशी कलाकारांचे नाटक गणपती उत्सवात होऊ लागले.
सोयगावची जुनीजाणती माणसं सांगतात की, साधारण १९१०पासून राममंदिरात गणपती बसवला जातो. सुरुवातीपासून कीर्तन व भजन होत असे. त्यातही १९१० ते १९८० अशी सलग सत्तर वर्षं ‘एक गाव एक गणपती’ हीच पद्धत इथे रूढ होती. गावात एकच गणपती असल्याने, संपूर्ण गाव एकाच ठिकाणी जमा होत असे. पहिल्या दिवशी कीर्तन, नंतर भजन, सांस्कृतिक कार्यक्रम दहा दिवस होत असत. गणपती विसर्जन पालखीतून टाळ-मृदंगाच्या गजरात, भजन म्हणत होत असे. गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण गावासाठी भंडारा असे. त्या दिवशी कुणीही शेतात जात नसे. वर्षातला तो एकमेव दिवस असा होता, ज्या दिवशी संपूर्ण गाव एकत्र जमा होत असे. अन्यथा दिवाळी असो की दसरा, शेतकरी शेतात जातातच. त्यामुळे संपूर्ण गावाला बांधून ठेवणारा, एकत्र असणारा आणि गावात एकतेची भावना रुजवणारा सण म्हणून सगळा गाव तो उत्सव आनंदाने साजरा करी. प्रत्येक पिढीतील तरुण, गणपतीतले मेळे असो, नाटक असो की जिवंत देखावे, त्यात त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असे. पण इतक्या पिढ्या जतन केलेल्या या परंपरा आता नष्ट होत आहेत. व्हॉट्सअॅप, फेसबुक, इंटरनेट यांच्यात गुरफटलेल्या आजच्या तरुणाला इथल्या परंपरांचा आणि गौरवशाली इतिहासाचा विसर पडलाय की काय, असंच कधी कधी वाटतं. दुसऱ्या पिढीतले लोटू पाटील तर तिसऱ्या पिढीतले विष्णू काळे, अमृतमामा चौधरी, सोपानमामा बोर्डे, प्रभाकर मापारी, रामराव काळे, मधुकर मापारी, विठ्ठल पठारे या कलावंतांनी नाट्यकलेचा इतिहास रचला. तसंच गणपती उत्सवाची एक वेगळी परंपरा इथे रुजवली. त्यांच्यानंतर ही परंपरा अशोक काळे, कृष्णा पठाडे, विश्वनाथ आगे, नामदेव सपकाळ, भाऊ माणकर, वसंत काळे, प्राचार्य भगवानराव देशमुख, प्रभाकर कायस्थ, मुन्ना कायस्थ यांनी जतन केली. १९७०पासून गणपती उत्सवात कुस्त्यांची दंगल होऊ लागली. ही परंपरा आजही जोपासली जाते. गावातील अशा उपक्रमांसाठी बाबुराव काळे (आप्पासाहेब) आणि विष्णू काळे यांच्यासारख्या दूरदृष्टीच्या नेत्यांनी प्रोत्साहन दिल्यानेच या परंपरा इथे रुजल्या. शंभर वर्षांपेक्षा अधिक परंपरा असलेला हा गणपती उत्सव मेळे, नाट्यमहोत्सव, कुस्त्यांची दंगल व जिवंत देखावे यांमुळे कायमच वैशिष्ट्यपूर्ण राहिला आहे. जवळजवळ २०-२५ वर्षं इथे पुराणातील, इतिहासातील कथांवर आधारित जिवंत देखावे केले जात. अलीकडच्या पिढीतले अरविंद कुलकर्णी, विष्णू मापारी, पप्पू दुसाने, शंकर काळे, संतोष खेडकर, अमोल आगे, राहुल जोहरे, लक्ष्मण तेलंग्रे, अतुल पाटील, योगेश पायघन अशा कितीतरी तरुणांनी ही परंपरा जतन करून अनेक वर्षे लोकांचे मनोरंजन केले. या परंपरा जतन करणाऱ्या चार पिढ्यांचे तरुण आमच्या महाविद्यालयाचे कलावंत विद्यार्थी होते. ज्यांना प्रा. भगवानराव देशमुख,
प्रा. डी. बी. थोरात, प्रा. ग. स. सोनवणे अशा अनेक प्राध्यापकांचं प्रोत्साहन असे. पण गेल्या काही वर्षांपासून असे जिवंत देखावे आता फारसे केले जात नाहीत, याचं वाईट वाटतं. कारण कुठलीही समृद्ध परंपरा खंडित होणं, ही त्या संस्कृतीची मोठी हानी असते.
मात्र आज युवक महोत्सवाला जाणारे विद्यार्थी एकांकिका बसवत आहेत, हे समजले आणि आनंद वाटला. त्यांचा सराव पाहायला गेले तेव्हा मुलांनीच लिहिलेली संहिता, त्यांचंच दिग्दर्शन आणि त्यांचा उत्स्फूर्त अभिनय पाहताना समाधान वाटलं. इथल्या या नाट्यपंढरीची परंपरा खंडित होत असल्याची खंत दूर झाली. लक्षात आलं की, वरवर काही गोष्टी दिसत नसल्या तरी सुप्तपणे त्या जिवंत असतातच. हे इथल्या समृद्ध परंपरेचं संचितच आहे, जे माझ्या या विद्यार्थ्यांना बळ, नवीन निर्माणाची ऊर्मी देत आहे. इथल्या समृद्ध कलेचा वारसा ही पिढी पुढे नेत आहे. वर्षानुवर्षं नाट्यकलेचा इतिहास सांगणाऱ्या, मुलांचा मेकअप करून त्यांना व्यासपीठावर उभं करून ही कला हस्तांतरित करणाऱ्या आणि नव्या पिढीला या परंपरेच्या धाग्यात बांधून ठेवणाऱ्या अमृतमामा चौधरींसारख्या कलावंताची तळमळ फलद्रूप होते आहे, हे निश्चित.
jyotiswami25@gmail.com
बातम्या आणखी आहेत...