आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरवंटाचं फुलपाखरू होताना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाळा असो वा महाविद्यालय; विद्यार्थ्यातील कलागुणांची पारख करून त्याला योग्य वाट दाखवण्याचे कसब शिक्षकांना जमलेच पाहिजे. आपल्यात काय आहे, याची जाणीवच नसलेल्या या हिऱ्यांवर थोडं लक्ष केंद्रित करून पैलू पाडले तर त्यांचे भविष्य निश्चितच झळाळून निघेल.

मु लांची मनं घडवताना त्यांना अनेक गोष्टी जाणीवपूर्वक सांगाव्या आणि शिकवाव्या लागतात. विद्यार्थी महाविद्यालयात येतात, तेव्हा महाविद्यालयाविषयी त्यांच्या मनात अनेक प्रकारच्या कल्पना असतात. पण प्रत्यक्षातली माहिती फार

थोडी असते. त्यामुळं आधी विषयांची माहिती, शिक्षण कशासाठी, उच्च शिक्षणातल्या संधी, क्षमता, व्यक्तिमत्त्वाचा विकास अशा अनेक पातळ्यांवर काम करावं लागतं. त्यांना माहिती सांगत व विश्वास देत त्यांच्या मनाची मशागत करत एका एका विषयाची पेरणी करावी लागते. शेतकरी जसा आपल्या पिकाची ठरावीक काळात खूप काळजी घेतो, तसं शिक्षकालाही विद्यार्थ्याला सुरुवातीच्या काळात अधिक समजून घ्यावं लागतं.

‘सरसकट सगळे विद्यार्थी एकाच माळेचे मणी असतात,’ असा विचार करून त्यांच्याकडं पाहणं म्हणजे त्यांच्यावर अन्याय तर आहेच; पण गुणी आणि बुद्धिमान मुलांचं कायमचं नुकसानही आहे. त्यामुळं त्या प्रत्येकात ‘वेगळेपण’ काय आहे? कोणाचा कल कशात आहे? हे शोधतच राहावं लागतं आणि त्यांना प्रोत्साहन देत राहावं लागतं.

वर्गात मुलं फार मोकळेपणाने बोलत नाहीत, पण इतर उपक्रम राबवताना ती खुलतात. त्यांच्या मनात दडलेल्या कला बाहेर येऊ लागतात, तेव्हा कुठे त्यांचा थांग लागतो. क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, राष्ट्रीय सेवा योजनेचे उपक्रम, फिल्म क्लब, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा या सर्वांच्या माध्यमातून मुलांना व्यक्त व्हायला वाव मिळतो आणि आम्हाला मुलांना समजून घ्यायला संधी मिळते. यातून ते शिक्षक आणि विद्यार्थ्याचं अतिशय विश्वासाचं नातं तयार होत जातं. काही वर्षांपूर्वी आम्ही महाविद्यालयात युवक महोत्सवासाठी विद्यार्थ्यांची निवड करत होतो. अतुल आणि संतोष हे दोघं सर्व कला प्रकाराची चाचणी देऊ लागले होते. आणि प्रत्येकच गोष्ट आम्ही उत्तम करू शकतो, हे आम्हाला पटवून देत होते. त्यांचं गाण्याचं, नृत्याचं, अभिनयाचं सादरीकरण बरं होतं; पण त्यावर खूप मेहनत घ्यावी लागेल, हे आम्हाला कळत होतं. पण त्यांचा आत्मविश्वास इतका प्रचंड होता की, आम्ही लोकगीतासाठी, लोकनृत्यासाठी तर त्यांची निवड केलीच; पण इतर वैयक्तिक पातळीवर सादर करायच्या (सोगे) कला प्रकारातही त्यांनी भाग घेतला. अतिशय कमी वेळात तयारी केली आणि उत्तम सादरीकरण केलं. ज्या आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी युवक महोत्सवात भाग घेतला, त्याच आत्मविश्वासाच्या बळावर ते प्राध्यापक व बँक कर्मचारी म्हणून काम करताहेत.

मागच्या वर्षी मुलांसाठी सूत्रसंचालन कार्यशाळा घेतली. अनेक मुलांमधून अनेक परीक्षा घेऊन दोन मुलं आणि दोन मुलींची निवड केली. स्नेहसंमेलनाच्या सहा-सात तास चालणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं सूत्रसंचालन त्यांना करायचं होतं. वेळ कमी होता, त्यामुळं अतिशय चुणचुणीत मुलांची निवड केली होती. निवड जाहीर केल्यानंतर प्राजक्ता रोकडे आणि पूजा इंगळे या दोन मुली माझ्या समोर येऊन उभ्या राहिल्या. त्याही चटपटीत होत्या, पण सादरीकरण करताना त्यांना थोडे कमी गुण होते. त्यांनी संधी द्यायची विनंती केली. तेव्हा मी पुन्हा एकदा सादरीकरण करायला सांगितलं. त्यांनी बरंच चांगलं सादरीकरण केलं. तेव्हा त्यांना संधी द्यायचं निश्चित झालं. मला वाटलं, त्यांचं सादरीकरण बऱ्यापैकी होईल, पण ते आत्मविश्वासाचं असेल. प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी त्यांचा पेहराव, त्यांचं संहिता लेखन, स्वच्छ स्पष्ट बोलणं, त्यांचा आत्मविश्वास आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची उत्स्फूर्तता हे पाहून मी चकित झाले. त्यांना पुन्हा संधी देताना मला हे ठाऊक नव्हतं. पण ही संधी दिली नसती तर? पण शिक्षकाला विद्यार्थ्यात गुणांची वीज असते, त्याची ठिणगी ओळखता आली पाहिजे.

ईश्वर हा एक अतिशय धडपडा, विनम्र आणि होतकरू मुलगा होता. तो कुठलाही कार्यक्रम असला की धडपडायचा. आपल्याला काय येतं, हे त्याला कळायचं नाही. पण आपण काहीतरी केलं पाहिजे, हे जाणवत राहायचं. त्याचं पहिलं वर्ष असंच गेलं. पण दुसऱ्या वर्षी राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक म्हणून काम करताना त्याला त्याचा सूर सापडला. त्याची धडपड थांबली आणि तो स्वयंसेवक म्हणून स्वत:ला तयार करण्यात रमून गेला. तिसऱ्या वर्षी तो राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा प्रतिनिधी तर झालाच; त्यासोबत तो महाविद्यालयाचा सचिव झाला. मुलांना पहिल्याच टप्प्यात फार पटकन मोकळेपणानं व्यक्त होता येत नाही. थोडा वेळ द्यावाच लागतो. सुरवंटाचं फुलपाखरू होताना, त्याच्या कोषातून बाहेर पडण्यासाठी त्यालाच धडपडावं लागतं. आपले पंख पसरून ध्येय आणि आकांक्षांच्या आभाळात, उंच भरारी घेण्याचं काम त्यांनाच करायचं असतं. हे जरी खरं असलं तरी हेही तितकंच खरं आहे की, त्यांच्याकडे असे अदम्य इच्छाशक्तीचे पंख असल्याची जाणीव केवळ शिक्षकच करून देऊ शकतात.
jyoti25.swami@gmail.com
बातम्या आणखी आहेत...