आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिसेंबरमधली जिलबी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डिसेंबरचा शेवटचा आठवडा हा नाताळची धूम घेऊन येणारा आठवडा. मला हा आठवडा गरमागरम जिलबीची आठवण करून देत असतो.आम्ही लहान असताना डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आई आम्हाला सर्वांना सकाळी सात वाजताच गरमागरम जिलबी बनवून पोटभर खायला द्यायची. आम्ही चौघे बहीणभाऊ आणि दोन चुलतभाऊ. जिलबी खाताना कोण जास्त जिलब्या खाऊन दाखवतो अशी पैज लावायचो. पैज लावण्याच्या नादात आणि जिलबी खाताना एखाद्या वेळेस शाळेत पोहोचायला उशीर व्हायचा. प्रार्थना सुरू असायची आणि आम्ही मात्र गेटबाहेर प्रार्थना ऐकत उभे असायचो. आता कोणती शिक्षा होईल या चिंतेत आम्ही एकमेकाला दोष देत बसायचो. तुझ्यामुळेच प्रार्थना चुकली असे एकमेकांवर आरोप करीत असतानाच आमचे पीटीचे शिक्षक हातात छडी घेऊन आमच्यासमोर उभे ठाकायचे. आईच्या हातच्या गरमागरम कुरकुरीत गोड जिलबीची चव मस्तपैकी रेंगाळत असतानाच पीटीच्या शिक्षकांची जळजळीत नजर आणि छडीचा मार झेलताना मेल्याहून मेल्यासारखे व्हायचे. कारण पीटीचे शिक्षक दुसरेतिसरे कुणी नसून आमचे वडीलच असायचे. आईच्या हातच्या गोड जिलबीने आम्हाला मोहात पाडावे आणि त्या मोहाची किंमत वडिलांच्या हातच्या छडीने हात लाल करून व्हावी. आई तीन दिवस ताकात मैदा व बेसन भिजवून नंतर एका गांधी टोपीला छिद्र पाडून त्यात ते पीठ भरायची. तेलात गोलगोल वर्तुळ काढणारी आई जणू काही वर्तुळ कसे काढावे हेच मूकपणे शिकवतेय असं वाटायचं. ती गरम तेलात जिलबी तळायची तेव्हा तिचा चेहरा घामाने लालबुंद व्हायचा. घट्ट पाकातली गोड जिलबी आम्हा भावंडांसाठी. त्यातच सकाळी एखादे म्हातारे आजोबा वडिलांना भेटायला आले तर त्यांच्या कवळीचा विचार करून मोठे छिद्र असलेली टोपी घेऊन जाड आकारातली जिलबी काढून त्या आजोबांना देताना त्यांच्या चेह-यावर जे समाधान दिसायचे ते कल्पनातीत असायचे.
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आमच्या घरी जणू काही जिलबीचे दुकानच थाटलेले असायचे. त्या काळात आमच्या घरची जिलबी गल्लीतील सर्व शेजा-यांकडे तर पोचायचीच, पण त्याचबरोबर आमच्या मित्रमैत्रिणींनाही आणि घरी येणा-यांनाही जिलबीचा आस्वाद घेता यायचा. आईच्या हातची जिलबी खाऊन अनेक आत्मे तृप्त झालेत. आम्ही भावंडं तर इतके तृप्त झालोत की लग्नानंतर सासरी आल्यानंतर जिलबी खावीशीच वाटली नाही. जिलबी म्हणताच आठवतो तो आईचा घामाघूम झालेला लालबुंद चेहरा. थंडीच्या दिवसांतही चुलीची ऊब सुखद वाटण्याऐवजी आईला मात्र ती दाहकतेचे चटकेच देत असायची. आमच्या आनंदासाठी ते सहन करणा-या आईला आज जिलबी पाहताच डोळ्यात पाणी येते. कारण मधल्या मामाच्या घरी आई गेली असता रात्रीच्या जेवणात जिलबी होती. जिलबी खात असतानाच माझे मोठे मामा हे जग सोडून गेल्याची दु:खद वार्ता येऊन थडकली. माझी आई सर्व भावंडामध्ये मोठी. मामाची दु:खद वार्ता ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखे झाले. लहान भाऊ शेवटच्या घटका मोजत असताना आपण जिलबी खाल्ली, याचे आईला नेहमीच वाईट वाटत असते. त्यानंतर आईने जिलबीचा त्यागच केला.
ज्या जिलबीने आईने अनेकांचे आत्मे तृप्त केलेत त्याच जिलबीने आईला दु:खाचा झटका द्यावा याला काय म्हणावे! दैवाची क्रूर चेष्टा तर नव्हे! आज कुठल्याही समारंभात आईसोबत पंगतीत बसताना जिलबी घेऊन येणारा वाढपी जवळ येताच माझ्या काळजात धस्स होते आणि मी आईच्या चेह-याकडे पाहण्याचे टाळते.
या विश्वातल्या कोणत्या गोष्टीशी माणसाचे कसे नाते जुळेल हे
सांगणे मानवी आकलनापलीकडचे होय हेच खरे.