आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jyotsna Patil Article About Marathi Bhasha Din, Divya Marathi

भाषाप्रेमी मैत्रीण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करताना मला तिरुअनंतपुरमला भेटलेल्या एका महिलेची हमखास आठवण येते.

12 नोव्हेंबर 2005 रोजी मी व माझी नणंद तिरुअनंतपुरमला एका रेस्टॉरंटमध्ये गप्पा मारत जेवत होतो. तेवढ्यात एक स्त्री आमच्याजवळ आली आणि मला म्हणाली, ‘एक्सक्यूज मी, तुम्ही महाराष्ट्रीयन का?’ मी ‘हो’ म्हणताच तिने लागलीच दुसरा प्रश्न विचारला, ‘कुठून आलात?’ आम्ही आमची सविस्तर माहिती सांगितली तेव्हा ती म्हणाली, ‘मराठी शब्द कानावर पडले की खूप छान वाटते. मला मराठी बोलणारे भेटताच माझे बालपण परत मिळाल्यासारखे वाटत असते.’ तिच्या त्या भावना जाणून मी तिला बोलते केले. ‘तुम्ही तर तेलगू बोलता, मग तुम्हाला मराठी कसे बोलता येते?’ माझ्या या प्रश्नावर त्या स्त्रीने माझ्यासमोर तिचे बालपणच साकार केले. ती म्हणाली, ‘मॅडम, मी मूळची तामिळनाडूची. येथे केरळमध्ये नोकरी करते. माझं शिक्षण पुण्याला झालं. त्यामुळे मला मराठी छान बोलता येतं. तसेच खांडेकर, फडके, जी. ए. कुलकर्णी यांची पुस्तकेही वाचली आहेत. मला मराठी साहित्य वाचायला आवडते.

मराठी भाषा ऐकली की मला वाटते मी पुण्यातच आहे. माझा नवरा म्हणतो, मराठी भाषा बोलणारे भेटले की तू तुझ्या नवर्‍यालाही विसरून जातेस. अर्थात हे तो मल्याळममध्ये बोलतो.’ त्या स्त्रीला आमच्याशी खूप गप्पा कराव्याशा वाटत होत्या. जणू काही खूप दिवसांचा उपाशी माणूस असावा आणि त्याला जेवायला दिल्यावर काय खाऊ नि किती खाऊ, असे व्हावे; त्याचप्रमाणे त्या स्त्रीची आमच्याशी गप्पा करताना अवस्था झाली होती. तिने तिच्या मुलीला रेस्टॉरंटमध्ये जेवायला आणले होते. मी तिला म्हणाले, ‘तुम्हाला जेवायचे नाही का?’ तर ती म्हणाली, ‘आज मला हाफ डे असल्यामुळे मुलीचा हट्ट होता रेस्तराँमध्ये जेवण्याचा, म्हणून तिला जेवायला घेऊन आले. माझा स्वयंपाक झालेला आहे, मी घरी गेल्यावर जेवीन. तुम्ही जेवण चालू ठेवा.’ आमचे व तिच्या मुलीचे जेवण होईपर्यंत तिने मनसोक्तपणे मराठीतून गप्पा केल्या. एखादी सासुरवाशीण माहेरी आली असता तिला सर्वांशी किती बोलू न किती नाही असे होते, त्याप्रमाणे ती आमच्याशी बोलत होती. तिची मुलगी कधी आमच्याकडे तर कधी आईच्या तोंडाकडे आश्चर्ययुक्त नजरेने पाहात होती. ती मुलीला मधूनच मल्याळममध्ये सूचनाही देत होती. तिला पाच-सहा भाषा अवगत होत्या.

जेव्हा आम्ही निघताना तिचा निरोप घ्यायला लागलो तेव्हा ती म्हणाली, ‘मी इथे जवळच राहते. तुम्ही माझ्या घरी आलात तर मला खूप आनंद होईल.’ परंतु मी तिला सांगितले, ‘भविष्यात कधी केरळला येण्याचा योग आला तर तुमच्या घरी नक्की येणार.’ तिचा निरोप घेऊन आम्ही पुढील प्रवासाला निघालो.

स्थानिक भाषा संपल्या अशी आज सर्वत्र ओरड होत असते; परंतु कुठलीही भाषा असो, ज्याला जी भाषा अवगत असते ती भाषा त्या व्यक्तीला आवडत असते. विविध भाषा बोलणार्‍या व्यक्तींना भाषेत भेदाभेद करायला आवडत नाही. भाषा ही एक-दुसर्‍याशी संवाद साधण्याचे माध्यम आहे, हेच ठाऊक असते.

बालपण महाराष्ट्रात, माहेर तामिळनाडूचे, सासर आंध्र प्रदेशातले, तर कर्मभूमी केरळ असणार्‍या त्या स्त्रीला मी कधीच विसरू शकत नाही. भारतीय म्हणजे काय याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मला भेटलेली ही भारतीय स्त्री होय.

jdpatil25@gmail.com