आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jyotsna Patil Article About Mother And Daughter Relation

मैत्री शिकवणारी आई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन घरांची जेव्हा एकच सामाईक भिंत असते तेव्हा त्या घरातील गृहिणी या एकतर पक्क्या मैत्रिणी असतात किंवा पक्क्या वैरिणी तरी असतात. अशाच ब्राह्मणगावसारख्या खेड्यातील एकच सामाईक भिंत असलेल्या घरातील दोन गृहिणी या पक्क्या मैत्रिणी. या दोघींची बरीचशी कामेही एकत्रच होत असत. धान्य निवडणे असो की भाजी निवडणे. शनिवार-रविवार म्हणजे या दोघींचे चक्क स्वातंत्र्य उपभोगण्याचे दिवस. कारण दोघींचे नवरे शनिवारची सकाळची शाळा आटोपून जे पसार व्हायचे ते रविवारी रात्री उशिराच उगवायचे. त्यामुळे या दोघींच्या घरी शनिवार-रविवारी एकच चूल पेटायची. दोघी एकत्र स्वयंपाक करायच्या. दररोज वरणभात भाजीपोळी/भाकरी असा साग्रसंगीत स्वयंपाक करून दोघींना कंटाळा यायचा म्हणून या दोघी शनिवार-रविवारी दुपारचा जेवणाचा बेत करायच्या गरम गरम मसालेदार खिचडी आणि शिरा असा. मला वाटते दररोजच्या रूटीनचा कंटाळा या बेताने घालवून त्या दोघी पुन्हा आपापल्या नवर्‍यांच्या वेगवेगळ्या तर्‍हा सांभाळायला पाच दिवस तयार राहायच्या. एखाद्या शनिवार-रविवारी जर एखादीचा नवरा बाहेरगावी गेला नाही तर मात्र या दोघींचा आठवडा फारच त्रासदायक जायचा. कारण हे दोन दिवस त्यांना थोडीफार विश्रांती व मनसोक्त गप्पा करण्यासाठी आणि आम्हा मुलांबरोबर वेळ घालवण्यासाठी मिळायचे. या दोघींच्या गप्पा ऐकणे हा माझा आवडता छंद होता. त्यांच्या गप्पांमध्ये सर्व प्रकारचे विषय असत. दोघींनी सकाळच्या रेडिओवरच्या बातम्या ऐकलेल्या असत व इतर कार्यक्रमही. त्यामुळे त्या देशातील घडामोडी, चित्रपट, गाणी, गायक, बाबा आमटे, शरद जोशी, फुलनदेवी अशा विषयांवर बोलत असत. या दोघींंचा दिवसभरातला सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे नवरा व मुलांना शाळेत पाठवून दिल्यानंतर, दुपारच्या उन्हात, घराच्या मागच्या अंगणात पाट मांडून खुल्या आकाशाखाली, समोर सदा हिरवंगार असणार्‍या शेताच्या सोबतीने करायची धुणीभांडी. दोन्ही बादल्यांतल्या पाण्याच्या डुचमळणार्‍या आवाजाचे संगीत नि वेगवेगळ्या भांड्यांच्या वाद्यांवर चालणारे भांडी धुण्याचे काम सगळ्यात आनंददायी. त्यांचे हे काम संपल्यानंतर बादलीतल्या पाण्याचा अंगणात सडा टाकायचा आणि त्या मृद्गंधाने मोहित होऊन दोघीजणी तेथेच बाहेर गप्पा करीत बसायच्या. त्यांच्या गप्पा चालू असतानाच सर्व गाव हुंदडून आलेली या दोघींची एक खास मैत्रीण यायची. ही मैत्रीण म्हणजे सुईदोर्‍या विकणारी वैदू जमातीतील एक स्त्री. सर्व गाव भटकून शेवटचा मुक्काम या दोघींजवळ ठोकायची, मग एकीने तिला भाजी द्यायची आणि दुसरीने भाकरी/पोळी. तिला भाजीभाकरी देणार्‍या या दोघी मला जगातल्या सगळ्यात श्रीमंत स्त्रिया वाटत असत. श्रीमंती पैशात नसते तर ती असते माणसाच्या संवेदनशीलतेत, हा संस्कार या दोघी मैत्रिणींनी आम्हा मुलांवर केला.
आज शहरातल्या आधुनिक स्त्रियांची मैत्री पाहताना मला या दोघी आठवतात. त्यांची मैत्री काल, आज आणि उद्याही तितकीच घट्ट होती, आहे आणि राहील यात शंकाच नाही. याउलट आजच्या उच्चशिक्षित, आधुनिक स्त्रियांची मैत्री पाहताना काहीतरी निसटल्यासारखे वाटते. काळानुसार मैत्रीचे संदर्भदेखील बदलत गेले.
या दोघी म्हणजे माझी आई शालिनी पाटील आणि सरोजिनी खैरनार होत. त्यांनी जीवनातील सुखदु:खं वाटून घेतली. त्यामुळेच त्यांना जगण्याचं बळ मिळत गेलं. मैत्री म्हणजे काय हे या दोघींना नेमके कळले होते. मैत्री म्हणजे विश्वास, निरपेक्ष प्रेम, तू नि मीच्या पलीकडचं जग. या दोघींनी संकटकाळी एकमेकींना सावरण्याचे काम नेहमीच केले. मैत्री म्हणजे समुपदेशन व मार्गदर्शन करणारे बिना फीचे केंद्र होय, हेच त्या दोघींच्या मैत्रीतून जाणवले. त्या दोघींच्या मैत्रीला माझा सलाम.