आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jyotsna Patil Article About Positive Attitude, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिकण्यासाठीची अनुकरणीय मेहनत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका क्लासमधील नोकरी सोडून सात-आठ वर्षे झालीत तरीदेखील प्रत्येक जून महिन्यात तिची आठवण आल्याशिवाय राहत नाही. जून 2006मधील इयत्ता दहावीच्या निकालाचा दिवस. दारावरची बेल वाजली. दरवाजा उघडताच अश्विनी पेढ्यांचा पुडा हातात घेऊन उभी. तिने माझ्या पायांवर डोके टेकवताच मी तिला आशीर्वाद देऊन उठवले तर तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आणि तोंडातून शब्द बाहेर पडण्याचे नाव घेत नव्हते. यशाचा खरा आनंद काय असतो याचा अनुभव मी त्या दिवशी ख-या अर्थाने अनुभवला होता.

अश्विनीचे दहावीत उत्तीर्ण होणे हे सर्वसामान्य विद्यार्थ्यांसारखे नव्हते. ती सलग दोन वर्षे दोन विषयात दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाली होती, चार वेळा परीक्षा देऊनही. त्यामुळे ती आत्मविश्वास गमावून बसली होती. शेवटचा प्रयत्न म्हणून तिने पुन्हा ऑक्टोबरच्या परीक्षेचा फॉर्म भरला होता आणि एका क्लासमध्ये तिने प्रवेश घेतला. मी त्या क्लासमध्ये मराठी, हिंदी व समाजशास्त्र इ. विषय शिकवत होते. अश्विनी आठवड्यातून दोन दिवस क्लासला अनुपस्थित राहत होती. मी तिला कारण विचारले असता तिने सांगितले, की दोन दिवस तिला सलाइन व रक्त घेण्याकरिता दवाखान्यात राहावे लागते. तिच्या आजाराचे गांभीर्य लक्षात आल्यावर मी तिच्याकडे अधिक लक्ष देऊ लागले. तरीही ती समाजशास्त्रात अनुत्तीर्ण झाली. तिचा पाचवा प्रयत्नही असफल झाल्यावर तिने शिक्षणाच्या आशेवर पाणी सोडले होते.
एके दिवशी अचानक अश्विनी तिच्या वडिलांना घेऊन माझ्या घरी आली. अश्विनीचे वडील मला म्हणाले, मॅडम, तुम्ही तिची स्पेशल ट्यूशन घेणार असाल तर अश्विनी मार्चच्या परीक्षेसाठी फॉर्म भरण्यास उत्सुक आहे. हे उद्गार ऐकून परीक्षा अश्विनीची नसून माझीच आहे, असे मला वाटू लागले. कारण घर व नोकरी तसेच दोन विद्यार्थ्यांची ट्यूशन घेत असल्यामुळे अश्विनीचा क्लास घेणे मला शक्य नव्हते. पण अश्विनी हटूनच बसली. या आग्रहास्तव मी तिला मार्गदर्शन करण्याचे ठरवले. आज पाठ केलेल्या प्रश्नांची उत्तरे दुस-या दिवशी ती विसरून जात असे. त्यामुळे पहिले महायुद्ध व दुसरे महायुद्ध या प्रकरणांचा अभ्यास करताना युद्धाचे दृश्य तिच्या डोळ्यांसमोर उभे करून व टीव्हीतील इस्रायल व पॅलेस्टाइन यांच्यातील युद्धाच्या दृश्यांवरून महायुद्धाचे विक्राळ रूप तिला स्पष्ट करून सांगितले. तिच्या अध्ययनक्षमतेत भर पडत गेली. समाजशास्त्राचा अभ्यास घेताना सोप्या व तिला आकलन होईल त्याच पाठ्यांशावर भर देऊन ती दहावी उत्तीर्ण कशी होईल, याचाच विचार करून मी तिला शिकविले. माझ्या मार्गदर्शनानुसार अश्विनीने कष्ट घेतले आणि तिच्या त्या मेहनतीला आज फळ मिळाले होते. अश्विनी आज निकाल घेऊन घरी न जाता प्रथम माझ्याकडे आली होती आणि तिला जग जिंकल्यासारखे वाटत होते. 95 %च्या पुढे गुण मिळूनही दुस-याच्या मुलाला 95.5%गुण मिळालेत म्हणून दुर्मुखणारे पालक व पाल्य पाहिले की आनंद, सुख व दु:ख व्यक्तिसापेक्ष आहे, याची प्रकर्षाने जाणीव होते. पेठ सुरगाणा या आदिवासी भागात राहणारे अश्विनीचे वडील मोठ्या मुलीप्रमाणेच दुस-या मुलीनेही शिकावे म्हणून किती प्रयत्नशील होते, याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवणा-या पालकांनी अश्विनीच्या वडिलांचे अनुकरण करावे हीच विनंती.