आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

' स्‍वच्‍छ नाती, स्‍वच्‍छ भारत '

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वच्छतेतच देव शोधावा, असं सांगणाऱ्या महात्मा गांधींची जयंती आपण कालच साजरी केली. त्या निमित्ताने स्वच्छतेच्या एका वेगळ्या पैलूकडे लक्ष वेधणारी ही नाटुकली.
 
 
सुषमा : अरेच्चा, बारा वाजायला आलेत, आत्ता मुलांची शाळेतून येण्याची वेळ होईल, भरभर आवरावे लागेल, चला स्वयंपाकाला लागू या!
ती भाजी चिरायला घेते, तितक्यात सुरी बोटाला लागते आणि ओरडते, आई गं...
सासूबाई : काय झालं गं सूनबाई! (सुनेचा कापलेला बोट बघून) अरे देवा! हे काय केलंस गं, जरा बघून तर काम करायचे ना.
सुषमा : अहो आई, मुलं येतील म्हणून ते घरी येण्याच्या आत जेवण तयार झालं की गडबड होणार नाही, पण भलतीच गडबड होऊन बसली.
सासूबाई : (हळद शोधून सुनेच्या जखमेवर लावतात)
सुषमा : आई गं... किती आग आग होत आहे!
सासूबाई : (जखमेवर हळद लावता लावता) आता पाण्यात हात नको घालूस, जा तिकडे बैस, मी करते आज स्वयंपाक.
सुषमा : अहो आई, तुम्हांला सवय नाही आता स्वयंपाक करायची, मी करीन थोड्या वेळाने.
सासूबाई : नको, मी करते हळूहळू, एवढ्या वर्षांची सवय आहे गं, माणूस काही विसरत नाही त्याचं काम. एवढंच की, पूर्वीसारखं भरभर काम करायला जमत नाही.
सुषमा : आई, आज तुम्ही स्वयंपाक करणार तर मग तुमची स्पेशल डिश बनवा ना! मला गरमगरम खायला मिळेल.
सासूबाई : वा वा! आधी मला म्हणायची की, तुम्हांला स्वयंपाक करायला जमणार नाही आणि आता आवडती डिश पाहिजे नाही का? लबाड आहेस चांगली. आईसारखीच बनेल आहेस!
सुषमा : आई, मी तुम्हांला सांगून देते, माझ्या आईला काही बोलायचं नाही हं, नाहीतर तुमची नि माझी चांगलीच जुंपेल हं.
सासूबाई : ए, माझा तो हक्क आहे माझ्या विहिणीला बोलण्याचा, तुम्ही कोण गं आम्हांला अडवणाऱ्या.
सुषमा : अस्सं का! तुम्ही विहिणीविहिणी काहीही धुडगूस घाला पण माझ्या आईला बोललेलं मला नाही आवडणार.
सासूबाई : बरं बाई, आम्ही दोघी बघून घेऊ, मलाही वेळ नाही, तुला मसाल्याच्या पाटवड्या खाऊ घालायच्या आहेत ना!
सुषमा : अरे वा! माझ्या मैत्रिणी म्हणतात अस्सं माहेर सुरेख बाई पण मी मात्र म्हणते, अश्शी सासू सुरेख बाई!
सासूबाई : मला हरभऱ्याच्या झाडावर काही चढवू नकोस. (सासूबाई पाटवड्या करू लागतात)
घे गं सुषमा, कशा झाल्यात पाटवड्या बघ!
सुषमा : (तोंडात पाटवडी टाकत) वाह! आई काय सॉलिड टेस्टी झाल्यात पाटवड्या! तुम्ही पण खाऊन बघा ना, पण एकच खायची हं, बाकी सर्व पाटवड्या माझ्या आहेत.
(तितक्यात बाहेरून रीमा नि विनय गप्पा करीत घरात प्रवेश करतात.)
विनय : अरे वा! काय छान मसाल्याचा वास आला! सासूसुना दोघीजणी मला सोडून मस्तपैकी ताव मारत आहेत. बघितलं का रीमा, आता तूच बघ या दोघी माझे किती हाल करतात!
सुषमा : काय गं भटकभवाने आज जॉबला सुटी का?
रीमा : आम्हांला कोण सुटी देणार? ऑफिसच्या कामासाठी इकडे आले होते तितक्यात रस्त्यात दादा भेटला नि घरी घेऊन आला.
सुषमा : रीमा! व्हेरी बॅड! ऑन ड्यूटी असताना असं माहेरी येणं चांगलं नाही. आमचे पंतप्रधान स्वच्छ भारत म्हणून सगळ्यांना आवाहन करतात आणि तुम्ही लोक भारत स्वच्छ करायचा सोडून...
(रीमा तिला मध्येच थांबवत)
रीमा : ए ए वहिनी, तूच काही एकटी स्वच्छतेची भोक्ती नाहीस हं आणि माझ्या ऑफिसचा आणि स्वच्छतेचा काय गं संबंध!
विनय : सुषमा, माझ्या बहिणीइतकी स्वच्छतेची पुजारीण दुसरी कुणी नाही हं, असे भलतेसलते आरोप करू नकोस तिच्यावर.
सुषमा : अहो, रक्षाबंधनाचे दावेदार, बहिणीची बाजू घ्यायला येथे काही संसदेची खडाजंगी नाही चालू. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की, स्वच्छ भारत म्हणजे झाडू घेऊन झाडणं नव्हे तर प्रत्येक काम स्वच्छ व चोखपणे करणं होय, तेही कामचुकारपणा न करता.
रीमा : हो गं वहिनी, तू म्हणतेस ते अगदी शंभर टक्के खरंय. आम्ही’ स्वच्छ भारत’ या संकल्पनेचा खूपच संकुचित अर्थ घेतला.
विनय : रीमा, तुझ्या वहिनीला भाषण झोडायला कुणी सापडलं नव्हतं, तू आयतीच शिकार मिळालीस तिला. आता लवकर सटक येथून. नाहीतर तुझ्या नोकरीवर गदा यायची.
सासूबाई : काय रे आल्यापासून तिघे ओरडत आहात, या पाटवड्या खा आणि पोटातला अग्नी शांत करा जरा, मग नंतर घालीत बसा धुडगूस.
विनय : सुषे, तुला काही लाज वाटते की नाही! या वयात आईला काम करायला लावतेस नि स्वतः मात्र मिटक्या मारीत खात बसलीस?
सुषमा : साहेब, हे कलियुग आहे समजलं का! कलियुगात सासूने काम करायचे नि सुनेने बसून खायचे.
(सासूबाईकडे नवऱ्याची कागाळी करीत) बघितलंत आई! तुमच्या मुलाने मला पाटवड्या काही पचू दिल्या नाहीत.
सासूबाई : (हसत) अरे बेटा, दररोज तीच तर मला खाऊ घालते. एक दिवस मी तिला खाऊ घातले तर बिघडले कुठे?
विनय : माझं काही म्हणणं नाही आई, पण उद्या उलटं घडलं तर मात्र मला सांगू नकोस. तुझी बायको अशी वागते वगैरे...
सुषमा : ऐकलं का आई, हा तुमचा मुलगा म्हणजे वकील आहे वकील, मोठ्या शिताफीने आधीच स्वतःची सुटका करून घेतली. बेजबाबदार कुठला!
विनय : आई, तू हिला सांगून दे हं! खरं म्हणजे तूच हिला डोक्यावर बसवून ठेवलंयस. का गं मी कुठे बेजबाबदार वागलो...
रीमा : (मोठ्याने ओरडत) गप्प बसता का तुम्ही दोघे! मी आले माझ्याशी गप्पा करायचे सोडून तुमचं आपलं चाललं मस्तपैकी!
सुषमा : सॉरी गं रीमा, हे आमचं घरात नेहमीच चालत असतं. हे काही भांडण वगैरे नाही. पण आपण जिवंत माणसं आहोत घरात असा फील येत असतो म्हणून ही भांडणमय मस्करी नेहमीच चालू असते आम्हां तिघांमध्ये.
रीमा : खरंच गं, तुम्हां सर्वांचं नात्यांचं छानसं मेतकूट बघितलं की वाटतं, आमच्या घरी का नसतं? सगळे कसे त्रिकोणी चेहरे करून परग्रहाच्या प्राण्यांसारखे वावरतात याचं वाईट वाटतं गं!
सुषमा : तुला सांगू का एक गोष्ट, तू तुझ्या सासूसासऱ्यांना महिनाभर आमच्याकडे पाठवून दे, मग बघ काय चेंज होतो त्यांच्यात.
रीमा : वहिनी, काही उपयोग व्हायचा नाही, नुसते ठोकळे आहेत, उलट तुझं काम वाढेल.
सुषमा : रीमा, आपण प्रयत्न तर करू या. तुझ्या सासूसासऱ्यांनी त्यांच्या पलीकडे कधी जगच पाहिलं नाही, नाती म्हणजे काय असतात आणि ती कशी जपायची, हे खूप लोकांमध्ये वावरल्यावर कळतं. तू पाठव तर खरी आमच्याकडे.
रीमा : मग तर देतेच पाठवून, चल बाय.
सुषमा : अगं लगेच काय निघालीस, थांब ना!
रीमा : नको, निघते मी स्वच्छ भारतच्या अभियानावर.
सुषमा : तसं असेल तर मग जा, थांब नाही म्हणणार. (दोघीही हसतात), मनंही स्वच्छ करायची, नातीही स्वच्छ करायचीत नि जातिभेदाच्या गटारीही साफ करायच्यात तेव्हा कुठे भारत स्वच्छ होईल. स्वच्छ मनं, स्वच्छ नाती, स्वच्छ समाज आणि (सर्वजण तालासुरात म्हणतात) स्वच्छ भारत!
 
विशेष सूचना : ही नाटिका सादर करण्यापूर्वी लेखिका ज्योत्स्ना पाटील यांची परवानगी घेणे आवश्यक आहे, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
 
- ज्योत्स्ना पाटील, नाशिक jdpatil25@gmail.com
बातम्या आणखी आहेत...