आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देण्यातला आनंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुण्याला माझा मुलगा व मुलगी शिकत असताना आम्ही त्यांना भेटायला गेलो की निरोप घेताना त्यांच्या मित्रमैत्रिणींना खाऊसाठी पैसे दिले, की त्यांना संकोच वाटायचा; नंतर मात्र त्यांनाही सवय झाली. माझ्या मुलाला व मुलीला वाटायचे, आई सर्वांना पैसे का देते? त्यांना नेहमी प्रश्न पडायचा. एरवी एक एक रुपया वाचवणारी आई अशी आठशे, हजार रुपये कशी काय देत असते. पण मुलांना हे कुठे ठाऊक होते की, मी रूमवर राहात असताना वडिलांनी सांगितले होते की, “वीस रुपये नेहमीच बाजूला ठेव नि ते वीस रुपये सोडून तुझ्याकडचे पैसे संपलेत की मग माझ्याकडे मागायचे.” खरे तर वडलांनी ते वीस रुपये मला बाहेर काही खावेसे वाटले तर त्यासाठी खर्च करायला दिले होते; पण घरची आर्थिक परिस्थिती ठाऊक असल्यामुळे मी ते वीस रुपये तसेच जपून ठेवत असे. कॉलेज जीवनात हॉटेलमध्ये जाऊन चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा प्रत्येकालाच होत असते, तशी ती मलाही व्हायची; पण समोर वडिलांचे कष्ट दिसायचे नि इच्छा होऊनही वडिलांनी दिलेले वीस रुपये खर्च करण्याची हिंमत झाली नाही. प्रत्येक शनिवारी घरी गेले की रविवारी निघताना पैसे देताना वडील म्हणायचे, ‘वीस रुपये बाजूला ठेवशील.’ मी म्हणायची, ‘मागचे वीस रुपये तसेच आहेत.’ ते आश्चर्याने म्हणायचे, ‘काय! तुला खर्च करायला दिलेत ते पैसे, फक्त वीस रुपये बाजूला काढून मला तुझ्याकडे शिल्लक असलेली रक्कम सांगत जा.’ कॉलेज संपेपर्यंत वीस रुपयाची नोट पर्समध्ये तशीच चिपकून राहिली, पण एकदा मात्र मी साठ रुपये खर्च केले नि त्याचा आनंद मला आजही तितकाच होतो जितका त्या दिवशी झाला. माझ्या मोठ्या भाच्याला सवयीनुसार पैसे दिले, तेव्हा तो मला म्हणाला, ‘मामी, मी आता नोकरीला लागलो, आता कशाला पैसे देता?’ आणि पैसे घेत म्हणतो, ‘मामी खरं सांगू, लाख रुपये जरी महिन्याला कमावत असलो तरी तुम्ही दिलेल्या शंभरच्या नोटेची मजा काही वेगळीच आहे.’ मागच्या आठवड्यात पुण्याला गेल्यावर अकरावीत शिकत असलेल्या भाच्याला जेवणासाठी घरी बोलावले, दुसऱ्या दिवशी होस्टेलवर जाताना त्याला आइसक्रीम खाण्यासाठी शंभर रुपये देताच तो म्हणाला, ‘मामी, प्रत्येक वेळेस का पैसे देता?’ घराबाहेर राहताना स्टेशनरी व इतर खर्च भागवताना मुलांना पै पैचा हिशोब ठेवावा लागतो, तेव्हा असे कुणी दिलेले पैसे खूप कामी येत असतात, हे मी अनुभवाने जाणून होते. मला हा अनुभव मिळाला तो माझ्या दिलीप मामामुळे.
 
१९८७ मध्ये बारावीत असताना मी सटाण्याला मैत्रिणींसोबत राहात होते. आमचे कॉलेज सटाण्यापासून तीन-चार किमीवर असल्यामुळे आम्ही सर्व मैत्रिणींनी बसचा पास काढलेला होता. एके दिवशी बसची वाट पाहात असताना पुण्याकडून आलेली बस स्थानकात शिरली आणि त्या बसमध्ये खिडकीजवळ बसलेल्या व्यक्तीकडे माझे लक्ष जाताच मी ओरडले, ‘मामा!’ योगायोगाने त्या दिवशी मामाची नि माझी धावती भेट झाली. मामाशी गप्पा मारत असतानाच कंडक्टरने बेल वाजवली आणि गाडी सुरू झाली. तितक्यात मामाने वरच्या खिशात हात घातला आणि हातात जेवढे पैसे आले तेवढे घाईघाईत खिडकीतून बाहेर हात काढून दिले. मामाने त्या दिवशी मला साठ रुपये दिले होते, ते पाहून माझ्या मैत्रिणींना आश्चर्याचा धक्का बसला. माझी एक मैत्रीण मला म्हणाली, ‘ज्योत्स्ना, तुझ्या मामाने किती पटकन पैसे काढून दिले. माझे मामा ठाण्याला असतात, चांगले कमिशनर आहेत, पैसे ठेवायला बँका कमी पडतात. तरीदेखील आम्हाला ते दिवाळीत किंवा उन्हाळ्याच्या सुटीतही बोलवत नाहीत आणि एवढे पैसे असून कधी एक रुपयादेखील आम्हाला दिला नाही.’ मैत्रिणीला माझ्या मामाच्या या कृतीचे खूपच नवल वाटले. आम्ही त्या दिवशी तिघींनी आइसक्रीम खाल्ले आणि बरेच दिवस कॉलेजला जाताना चॉकलेट विकत घेऊन मी व मैत्रिणींनी मिळून खाल्ली. चॉकलेट खाताना मामाची हमखास आठवण यायची आणि आजही कुणाला खाऊसाठी पैसे देताना मामाची ती खिशात हात घालून लगबगीने खिडकीतून पैसे देतानाची मूर्ती आठवते. आज माझ्या मामांना या गोष्टीची आठवणही नसेल; कारण सुटीत मामाकडे गेल्यावर मामा नेहमीच खाऊ खाण्यासाठी पैसे द्यायचे. त्यामुळे त्या दिवसाची कृतीही सहज होती, पण माझ्या दृष्टीने मात्र मामाची ही कृती फारच मोलाची होती आणि त्यांच्या या कृतीने मला दुसऱ्याला देत राहण्याचे बाळकडू दिले. धन्यवाद मामा.
 
 jdpatil25@gmail.com
बातम्या आणखी आहेत...