आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भांडण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोव्यातील कलंगुट बीचवरील एका रिसॉर्टमध्ये आमचे काही स्नेही थांबले होते, त्यांना भेटण्यासाठी आम्ही गेलो होतो. तिथे अनेक विदेशी पर्यटक होते. आम्ही आमच्या स्नेह्यांना भेटून बाहेर पडत असताना एका रूममधून जोरजोरात भांडणाचा आवाज येत होता. भांडण अर्थातच स्त्री व पुरुष या दोघांचे चालू होते. ते नवराबायको होते की मित्र होते, हे माहीत नाही. दोघे एकमेकांना शिवीगाळ करत होते. एकमेकांवर चांगलेच भडकले होते. त्या दोघांचे भांडण मला ऐकावेसे वाटले. खरं तर यापूर्वी मी कधीही भांडण ऐकण्यासाठी उत्सुक झाले नव्हते. दुरून कुठून भांडणाचा आवाज ऐकू येताच मी घरात मोठ्या आवाजात टेपरेकॉर्डरवर गाणी ऐकणे पसंत करत असते. परिसरातील भांडण ऐकणे म्हणजे अंगावर शहारे आणणारे वाटते, तेच भांडण मला दुसऱ्या भागात व विदेशी लोकांचे असतानाही ऐकावेसे वाटावे, असे का? विदेशी लोक कसे भांडतात, अशी एक उत्सुकता. दुसरी गोष्ट म्हणजे, त्यांचे व आमचे भांडण यांची तुलना करण्याची नैसर्गिक मानवी प्रवृत्ती. यामुळेच मी भांडण ऐकण्याकरिता पाच मिनिटं त्या परिसरात रेंगाळत बसले.

विदेशींचे भांडण आणि आमच्याकडच्या नवराबायकोचे भांडण यांची तुलना करतच मी समुद्रकिनाऱ्यावर केव्हा पोहोचले ते कळलेदेखील नाही. ते विदेशी लोक किती मनसोक्तपणे भांडत होते. आम्ही भारतीय असे मनसोक्तपणे कधी भांडतो का? भारतीयांना भांडतानादेखील किती मर्यादा पाळाव्या लागतात, विवेक पाळावा लागतो. लोक काय म्हणतील! हा परवलीचा शब्द भारतीयांच्या मानगुटीवर नेहमीच बसलेला असतो. त्यामुळे भारतीयांचे भांडण हे आतल्या आत धुमसणारे असते, तर विदेशींचे भांडण मात्र प्रचंड स्फोटाप्रमाणे भासले. जे काही व्हायचे ते त्या स्फोटातच भस्मसात करून टाकायचे. या उलट भारतीयांचे भांडण समुद्राप्रमाणे आतल्या आत उफाळणारे होय. विदेशी भांडणाची स्फोटात राख होऊन इतरत्र विखुरली गेली, तिचे नामोनिशाणही राहिले नाही. परंतु भारतीयांची भांडणे समुद्राप्रमाणेच आतल्या आत खदखदत राहून ज्वलंत ज्वालामुखीसारखी.

विदेशी लोकांना भांडतानाही स्त्री-पुरुष समानतेचा हक्क आहे, या उलट भारतीयांना भांडायलाही असा भेदाभेद हवा असतो. भारतीय पुरुष चूक मान्य करण्यास कधीच तयार नसतो. त्याचे शस्त्र असते ‘खानदान.’ भारतीय पुरुषांना चूक मान्य करण्यात कमीपणा वाटतो आणि हा कमीपणा ते ‘खानदान’ या शब्दात लपवत असतात. भारतीय पुरुषाने स्त्रीच्या खानदानाचा उद्धार केला की, स्त्री गप्प बसते. त्यामुळे तो खानदानाचे हत्यार वापरून भांडणाला पूर्णविराम देत असतो.
ज्योत्स्ना पाटील, नाशिक
बातम्या आणखी आहेत...