आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आढावा: बोल, के लब आझाद है तेरे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘स्वातंत्र्य, समानता आणि सृजनासाठी वचनबद्ध’ या सूत्रानुसार औरंगाबाद येथे अवघ्या दोन-तीन महिन्यांपूर्वी अखिल भारतीय प्रगतिशील लेखक संघाच्या कार्याला प्रारंभ होऊन रविवार २८ ऑगस्ट रोजी प्रगतिशील लेखक संघाचे तिसरे राज्य अधिवेशन संपन्न झाले. यामुळे कुणी भुवया उंचावल्या, कुणी नाके मुरडली, तर कुणी पुरोगामी, परिवर्तनवादी असताना प्रगतिशीलतेची गरजच काय? असे विचारले... तर कुणाला या ‘संघा’ची सुरुवात आत्ताच कशी? असाही प्रश्न पडला.

एकोणिसाव्या शतकात भांडवलदारी व्यवस्थेत जगाची शोषक आणि शोषित अशा दोन वर्गांत विभागणी झालेली होती. सध्याही तशीच आहे. या शोषित, पीडित, गुलाम वा सर्वहारा वर्गाचे चित्रण त्या काळी साहित्यात येत नव्हते. याविषयी मार्क्सने विचार मांडले. त्यानंतर जागतिक स्तरावर अशा विचारांना चालना मिळत गेली. तेव्हा मुन्शी प्रेमचंद म्हणाले होते, ‘साहित्य ही राजकारणाच्या समोर चालणारी मशाल आहे.’ या पार्श्वभूमीवर १९३२मध्ये स्वातंत्र्यप्रेमी, क्रांतिकारी उर्दू नवलेखकांनी ‘अंगारे’ हा कथासंग्रह प्रसिद्ध केला. यामध्ये सज्जाद जहीर, अहमद अली, रशीद जहाँ महम्मूदज्जफर यांचा समावेश होता. परंतु ब्रिटिशांकडून हा संग्रह जप्त केला गेला. लेखकांमध्ये अस्वस्थता अधिकच वाढली. पुढे १९३५मध्ये एकीकडे अख्तर हुसैन रायपुरी यांचा ‘साहित्य आणि जीवन’ हा लेख प्रसिद्ध झाला. या लेखावर आणि त्यातील “क्या तुम लेखक बनना चाहते हो? तो अपने देश के दुःखों और पीडाओं की कथापर दृष्टि डालों, और इसके बाद यदि तुम्हारा दिल खून नहीं हो जाता, तो अपने कलम को फेंक दो। उस कलम की उपयोगिता केवल यह है, कि तुम्हारे चेतन-शून्य हृदय की अपवित्रता को उदघाटित करता रहे।” या विचारांवर तेव्हा खूप चर्चा झाली.

दुसरीकडे सज्जाद जहीर यांनी लंडन येथे शिक्षण घेताना भारतीय लेखकांना एक घोषणापत्र पाठवले. त्यामध्ये त्यांनी भारतीय संस्कृतीतील अंधविश्वास आणि धार्मिकतेला विरोध केला. तीमधील उदात्तता, मानवता व सौंदर्य तत्त्वाचा स्वीकार केला. ते भारतात (अलाहाबाद) परतल्यावर त्यांनी प्रो. एजाज हुसैन, रघुपती सहाय फिराक, एहतिशाम हुसैन, डॉ. अशरफ, अहमद अली यांच्याशी चर्चा केली. या संदर्भाने जानेवारी १९३६मध्ये ‘हिंदुस्थानी अकादमी’चे वार्षिक संमेलन संपन्न झाले. नंतर क्रांतिकारी उर्दू नवलेखक सज्जाद जहीर यांनी सच्चिदानंद सिन्हा, डॉ. अब्दुल हक, गंगानाथ झा, जोश मलीहाबादी, प्रेमचंद, रशीद जहाँ, अब्दुरसत्तार सिद्दीकी यांना आपल्या घरी बोलावून प्रगतिशील लेखक संघाच्या जाहीरनाम्यावर चर्चा केली. तद‌्नंतर फेब्रुवारी १९३६मध्ये अलीगढ येथे एक जलसा आयोजित केला गेला. हळूहळू या संघाच्या शाखा वाढत होत्या, पण हिंदी साहित्यिकांमध्ये प्रेमचंद वगळता अनास्था होती. ९ व १० एप्रिल १९३६ रोजी लखनौ येथे मुन्शी प्रेमचंद यांच्या अध्यक्षतेखाली प्रगतिशील लेखक संघाचे पहिले अधिवेशन झाले. यामध्ये उर्दू लेखकांचा सहभाग होता. प्रेमचंद यांचे भाषणही उर्दू भाषेतच होते. पुढे हे भाषण जेव्हा हिंदी भाषेत अनुवादित झाले, तेथून पुढे खऱ्या अर्थाने याविषयी चर्चा सुरू झाली. प्रेमचंदजींच्या विचारांमध्ये “लेखक स्वभाव से प्रगतिशील होता है, और जो ऐसा नहीं होता, वह लेखक नहीं होता।” हे विधान लेखकांसाठी आत्मचिंतन करणारे ठरले. यानंतर पुढे अमृतसर, अलाहाबाद, कलकत्ता, फरिदाबाद, दिल्ली, मुंबई, भिवंडी येथे अधिवेशन व संमेलने झाली. आणि प्रगतिशील लेखक संघाचे कार्य विस्तारत गेले.

महाराष्ट्र व मराठी भाषिक आणि प्रगतिशील लेखक संघाच्या दृष्टीने १९४५ हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे आहे. या वर्षी मुंबई येथे संघाचे चौथे अधिवेशन झाले. तत्पूर्वीच चाळीसच्या दशकात महाराष्ट्रात समाजवादी विचारांनी जोर धरला होता. १९४२च्या आसपास मुंबईमध्ये ख्वाजा अहमद अब्बास यांच्या घरी हिंदी, मराठी, गुजराती, कन्नड आणि मल्याळम भाषिक साहित्यिकांच्या चर्चा होत असत. यामध्ये मामा वरेरकर, वाकुलेश, नरेंद्र शर्मा, नरेंद्र सिन्हा, अख्तरुल ईमान, महेंद्र नाथ, मजाज लखनवी, कृष्ण चंदर, जोश मलिहाबादी, सागर निजामी यांचा समावेश होता. अशा प्रकारच्या आंतरभाषीय चर्चा देशात इतरत्र होत नव्हत्या. त्यामुळे अ.भा.प्र.ले. संघाचे पुढील अधिवेशन मुंबई येथे घेण्याचे निश्चित केले. विशेष बाब म्हणजे, या अधिवेशनाच्या अध्यक्षपदासाठी जोश मलिहाबादी (उर्दू), पंडित राहुल सांस्कृत्यायन (हिंदी), सत्येन मजुमदार (बंगाली), श्रीपाद अमृत डांगे (मराठी) आणि पेचाइया (तेलुगू) यांच्या नावांची चर्चा झाली आणि एस. ए. डांगे यांचे नाव निश्चित झाले. डांग्यांचे अध्यक्षीय भाषण मराठी भाषा व साहित्याच्या विकासासंदर्भात मोलाचे ठरले. यानंतर पाचवे अधिवेशन भिवंडी येथे (१९४९) संपन्न झाले. यानंतर अलीकडच्या काळात राज्य शाखेचीही सुरुवात झाली. २००७मध्ये नागपूर (अध्यक्ष- वसंत आबाजी डहाके) येथे पहिले व २०११मध्ये नाशिक (अध्यक्ष- उत्तम कांबळे) येथे दुसरे राज्य अधिवेशन संपन्न झाले.

अधिवेशन का? संमेलन का नाही?
आ पल्याकडे प्रामुख्याने साहित्य संमेलने होतात. या संमेलनांचे स्वरूप उत्सवी अधिक असते. अशी उत्सवप्रियता आणि औपचारिकता यामध्ये येऊ नये, अशी प्रेमचंद यांची भूमिका होती. “हमारा संघ लेखकों का संगठन होते हुए भी केवल साहित्य संमेलन न बन जाए, बल्कि गतिमान और सजीव संस्था बनें, जिसका जनता से सीधा और स्थायी संपर्क हो, हमारा साहित्य लोगों में जान फुंकें, आंदोलित कर सके। हमारे साहित्य में उच्च चिंतन हो, समता और स्वाधिनता का भाव हो, जो हम में गति, संघर्ष और बेचैनी पैदा करें, सुलाए नहीं, क्योंकि अब और ज्यादा सोना मृत्यू का लक्षण है। हम तो समाज का झंडा लेकर चलनेवाले सिपाही है।”

मुन्शी प्रेमचंद यांचे विचार, लेखक संघाचा उद्देश, ‘वर्तमान स्थिती व साहित्य आणि संविधानपूरक समाज’ हे तिसऱ्या अधिवेशनाचे सूत्र होते. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिका वाचनाने अधिवेशनाचे उद‌्घाटन करण्यात आले. एक चळवळ अनेक विचारांना जन्म देते. सद्यःस्थितीत प्रतिगामी विचार डोके वर काढत असल्याने सर्वांमध्येच असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर वैचारिक कृतिशील मंथनासाठी औरंगाबाद येथे अधिवेशनाचे आयोजन केले गेले. अधिवेशनाचे उद््घाटक वसंत आबाजी डहाके यांनी वर्तमानातील विचारांच्या मुस्कटदाबीचा समाचार घेतला. ते म्हणाले, आपला देश लोकशाहीप्रधान आहे. लोकशाहीमध्ये विविध विचार असतात, असायला हवेत. कुणाचे काही चुकत असेल, तर त्याविरुद्ध लेखकांनी आवाज उठवला पाहिजे. सध्या कोणत्याही गोष्टींवर बंदी लादली जात आहे. त्यामुळे बोलण्याची भीती निर्माण झाली आहे. या भीतीच्या विरोधात लिहिणे, हे लेखकांचे कर्तव्य आहे. प्रज्ञावंतांना खरा माणूस आणि खोटा माणूस ओळखता आला पाहिजे. प्रगतिशील लेखकांचे हे काम आहे. सध्या जे काही चालले आहे, ते पाहिल्यानंतर आपल्याला बुद्धी आहे का? की ‘बुद्धियुक्त मंदपणा’ दाखवला जात आहे? असा प्रश्न करून श्रोत्यांना डहाकेंनी निःशब्द केले.

अधिवेशनाचे अध्यक्ष नाटककार संजय पवार यांनी प्रामुख्याने राजकीय अंगाने भाष्य केले. वर्तमान काळ लेखकांची, कलावंतांची अभिव्यक्ती दाबणारा काळ आहे. वेगवेगळ्या संस्था वा सरकार लेखकांना थांबवण्याचे काम करत आहेत. मात्र जे दाबण्याचे, दडपशाहीचे काम करतात, ते भित्रे असतात. दहीहंडी, भोंगे यावर न्यायालयाचे तत्काळ निर्णय येतात; परंतु प्रलंबित खटल्यांचे काय? असा प्रश्न पडतो. सद्यःस्थितीत जगात मूलतत्त्ववाद्यांचा जोर वाढत आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाला विरोध करणारा उतावीळ वर्ग वाढला आहे. सध्याचा काळ हा माध्यमक्रांतीचा काळ आहे. त्यामुळे माध्यमांवर विचारमंथन होण्याची गरज आहे. अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष डॉ. अविनाश डोळस यांनी औरंगाबाद शहरातील लेखक-कलावंतांच्या प्रगतिशील विचारांचा वारसा या प्रसंगी उलगडला.

दुसऱ्या सत्रात ‘वर्तमान स्थिती: लेखन आणि लेखक’ या विषयावरील परिसंवादात प्रा. जयदेव डोळे यांनी ‘धर्म, जात आणि लेखकीय पक्षपात’ याविषयी स्पष्ट भूमिका मांडली. आपल्याकडे जातीनुसार वाचक ठरत आहेत. ज्या जातीचा लेखक त्या जातीचा वाचक, असे चित्र आहे. याकरिता लेखकाचे आडनाव वगळून लिहिण्याचा पर्याय स्वीकारला तर चालेल का? मात्र प्रकाशकांना लेखकाचे आडनाव पर्यायाने, जात हवी असते. कोणत्याही व्यक्तीवर जात, धर्म व संस्कृतीचे संस्कार होतात; परंतु लेखकांनी आपल्या लेखनातून लोकशाही समाजवाद रुजवण्याचा प्रयत्न करायला हवा. हाच धागा पकडून डॉ. विश्वाधार देशमुख यांचे ‘समकाळ आणि लेखकाचे भान’ याविषयी विचार चिंतनशील ठरले. वर्तमान स्थितीत लेखकाचे भान काय असते, वा असावे, तर तो प्रथम माणूस म्हणून समृद्ध व्हावा. त्या माध्यमातून त्याचे मत-भूमिका आणि नंतर भान तयार होते. परंतु आपल्याकडे मत तयार करण्याची प्रक्रिया अडथळ्याची आहे. कोणीही नवीन मत मांडले की, त्याला गप्प बसवले जाते. घर-शाळा-महाविद्यालये-विद्यापीठे आणि एकूणच समाज पातळीवर नवागतांच्या अभिव्यक्तीची नसबंदी केली जाते, त्याला स्वतंत्र मत तयार करू दिले जात नाही. परिणामी, नंतरच्या काळात तो भूमिका घेऊ शकत नाही. या परंपरेमुळे मराठी लेखक हे भूमिका घ्यायला प्रचंड घाबरतात. कारण भूमिका घेतली की, ‘आजीवन सोय’ होत नाही.

विचारवंत डॉ. राम पुनियानी यांनी ‘बढती असहिष्णुता और लेखक’ या संदर्भाने भारतीय राष्ट्रवादाचे मुस्लिम राष्ट्रवाद, हिंदू राष्ट्रवाद व भारतीय राष्ट्रवाद असे तीन स्तर मांडले. यापैकी मुस्लिम राष्ट्रवाद हा १८५७च्या उठावानंतर अस्तित्वात आला, तर हिंदू राष्ट्रवाद हा १९२५ नंतरच्या काळात प्रचलित झाला. या हिंदू राष्ट्रवादालाच सांस्कृतिक राष्ट्रवाद संबोधले गेले, परंतु हे राज्यघटनेशी विसंगत आहे. मात्र, तिसरा भारतीय राष्ट्रवाद हा सर्वसमावेशक व राज्यघटनेशी सुसंगत आहे. हे राष्ट्र सर्वांचे आहे, ही भावना यामध्ये असून ज्याला आपण ‘भारतीय कला’ म्हणतो, त्या कलांना सर्व जाती-धर्माच्या लोकांनी समृद्ध केलेले आहे. देशाच्या भवितव्यासाठी हाच राष्ट्रवाद टिकवणे, वृद्धिंगत करणे गरजेचे आहे.

या सत्राचा समारोप करताना प्राचार्य रा. रं. बोराडे यांनी मराठी लेखक, वाचक व प्रकाशकांचा समाचार घेतला. मराठी लेखक हे सभोवतालच्या समस्येशी भिडत नाहीत. त्यांच्या ते स्वभावात नाही. सभोवताली बालिकांवर बलात्कार, महिलांवर अत्याचार होत आहेत. याविषयीचे चित्र मराठी साहित्यात दिसत नाही. दिसले तर वाचक दाद देत नाहीत. आणि मोजके अपवाद वगळले तर मराठी प्रकाशकांनाही ते नको असते. त्यापेक्षा ते धंदेवाईक, व्यावसायिक पुस्तकांकडे प्रकाशकांचा कल वाढला आहे, ही बाब ललित वाङ‌्मयाच्या दृष्टीने चिंतेची आहे.

अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी ज्येष्ठ अनुवादक इब्राहिम अफगाण यांनी देशातील मुस्लिम-मुस्लिमेतर, स्त्री-पुरुष, व धर्म आणि विज्ञान यातील संवाद यापुढील काळात निर्णायक ठरेल, तो वाद-संवाद साहित्यातून मांडणे हे लेखकांपुढील मोठे आव्हान असेल, असा विचार मांडला. तद‌्वतच अ. भा. म. सा. महामंडळाचे अध्यक्ष व प्रगतिशील संघाचे कार्याध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी पानसरेंच्या ‘शत्रू-मित्र विवेक’ या सिद्धान्ताविषयी केलेली चर्चा संविधानात्मक समाज उभारणीच्या दृष्टीने चिंतनीय ठरली. शेवटच्या सत्रात कवी पी. विठ्ठल व संतोष पद‌्माकर पवार यांच्या कवितेने खुल्या कवी संमेलनासाठी एक विचार ठेवला. या अधिवेशनाच्या आणि संविधानपूरक समाजाच्या निमित्ताने दोन महत्त्वपूर्ण ठराव मांडण्यात आले. त्यामध्ये सध्या शासनाकडून शंभर लोकांना एकत्रित येण्यावर बंदीचा निर्णय घेण्याचा जो विचार सुरू आहे, त्याचा निषेध करण्यात आला. तसेच सर्व शहरांमधील महत्त्वाच्या चौकात संविधान उद्देशिका उभारण्यात यावी व या चौकाला संविधान चौक संबोधण्यात यावे, असे नमूद करण्यात आले.

dr.kailas.ambhure@gmail.com
(लेखक डॉ. बा. आं. म. विद्यापीठ, औरंगाबाद येथील मराठी विभागात कार्यरत आहेत.)
बातम्या आणखी आहेत...