आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'रंगमळा' पाहून अंधार हडबडला...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गावोगावी सारखीच बोंब. विजेची, पाण्याची, रस्त्यांची आणि महत्त्वाचे म्हणजे विचारांचीही. त्यामुळे एका विचाराने माणसं एकत्र येणे हा चमत्कारच. 
अशा वेळी गावाच्या शिवेवरच्या रेषा पुसून उजेडाशी नातं सांगायला नाटक हातात कंदील धरून उभं होतं. ‘रंगमळा’ उजळवत होतं... 

मळा म्हन्ल्यावर त्याचा कोन्ही ना कोन्ही मालक असतोच. पन कसलं त्याची जमीन, या धोरणानुसार, जो कला सादर करून, आपले प्रश्न मांडेल, तो या मळ्याचा मालक, सभासद. मीही त्यातलाच एक कसनारा...
जशी वडिलोपार्जित जमीन वाट्याला यावी, तशी ही नाट्यकला गावातील जत्रेतून ‘रंगमळ्या’च्या वाट्याला आलेली. उसन्या नाट्यसंहिता घेऊन लागवड केली, तर हायब्रीड उगवायचं! आपण आपले जगणेच संहितेत पेरले तर?
सासरी जाच असणाऱ्या सासुरवाशिणीला घडी-घडी माहेरी येता येत नाही. ती फक्त सणावारालाच येते. या पावसाला नक्कीच काही तरी जाच असणार! नसता आमचा मराठवाडा आणि इथली माणसं म्हणजे निखळ माहेरच, की हो!
 
दुष्काळ हा इथं निसर्गाची सगळ्यात मोठी देण. प्रतिकूल परिस्थिती माणूस घडवते, याचे मोठ्ठे उदाहरण म्हणजे, ‘तुकाराम’. पावसाचं पाणी विहिरीच्या तळाशी लपून बसलेलं. तहानेनं व्याकुळलेले पीक गयावया करत, शेतकरी बापाच्या तोंडाकडे पाहत असलेलं. उपसा करावा, तर वीज रुसलेली. मायबाप सरकाराच्या मेहरबानीनं चोवीस-चोवीस तास वीज, जालन्याच्या कंपन्यांमध्ये इमान-ईतबारे रोषनाई करत असलेली.
कधीमधी रात्री-अपरात्री, या विजेला गावची आठवण यायची. मग अंधार कोळत बसलेली माणसं कंदील घेऊन रान गाठायची. साप, विंचू आपले सोबतीच आहेत, म्हणून विश्वासानं पाऊल टाकत ‘आकडा’ टाकायला वायर पांगवायची. पण लपाछिपी खेळत आलेली वीज तोपर्यंत निघून जायची. हातात तुटकं वायर नी कंदील उरायचा. सुकलेल्या पिकात अंधार चेकाळायचा...
 
मग राजकुमार तांगडे या अवलियाने लेखणी हातात घेतली. आकड्याची वायर पेनाने गुंडाळली, संभाजी तांगडेने कंदील हातात घेतला, रानवाटा धुंडाळणारा गजू आला. मंदिरावरील भोंग्यात टाळ वाजवत  तुकाराम शोधणारा, अशोक देवकर आला. चिंचोलीच्या मधुकर बिडवेने काखेत पेटी (हार्मोनियम) धरली. आणखी चार-चौघांनी फेटे बांधले. इवल्याशा कंदिलाच्या उजेडाने ‘आकडा’ टाकून अंधार कापायाला सुरुवात झाली...
 
गावोगावी सारखीच बोंब. विजेची, पाण्याची, रस्त्यांची आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे विचारांची! एका विचाराने माणसे एकत्रित येणे, म्हणजे चमत्कारच! एकत्रित यायचे ते राजकारणात, तेही जाती-पातीच्या खांद्यावर हात ठेवून. काही जण एकत्र यायचे, ते क्रिकेट खेळायला. नुसत्या जन्माच्या येरझाऱ्या बाकी काही नाही. जे या सगळ्यात कुठेच नाही, ते मंदिरात टाळ कुटायचे किंवा मशिदीत अजान देऊन अल्लाशी संवाद साधायचे. पण या एकत्रित येण्याने प्रश्न सुटणे किंवा चव्हाट्यावर येणे, असे काहीच होत नव्हते. मात्र, शिवेवरच्या रेषा पुसून उजेडाशी नातं सांगायला नाटक हातात कंदील धरून उभं होतं.  नाटकाचे बोट धरून सगळे चालू लागले. एका स्पर्धेत ‘आकडा’ नाटकाचा प्रयोग सुरू झाला. कुठलीही तांत्रिक बाजू माहीत नाही. फक्त हातात कंदील! रंगमंचावर जवळजवळ अंधार. पूर्ण नाटकभर अंधार! या अंधाराने परीक्षकांच्या मेंदूला झिणझिण्या आल्या. हे नाटकच नाही म्हणत, त्यांनी या नाटकाला स्पर्धेतूनच बाद केलं. कंदिलात होती नव्हती, ती वातही विझून गेली. पण त्यातला एक परीक्षक शांत बसून होता. तो काहीच बोलला नाही. बहुतेक त्याला या कंदिल घेऊन निघालेल्या पोरांचं म्हणणं कळलं होतं. काही दिवसानंतर या नाटकाचा प्रयोग थेट मुंबईतील पृथ्वी थेटरात कुणी तरी लावला. कळले की, हा प्रयोग त्या शांत बसलेल्या संवेदनशील परीक्षकाने लावला होता. नाव होतं, नंदू माधव. या प्रयोगानं बळ आलं. अंधार हडबडला. कंदिलाची वात थोडी मोठी झाली. लोक गावोगावी ‘आकडा’चे प्रयोग लावू लागले. त्यांना हे नाटक आपल्या जगण्याचा आरसा दाखवणारं वाटू लागलं. एका बहाद्दरानं उत्साहाच्या भरात आपल्या लग्नातच हे नाटक ठेवलं. मग लग्न मंडपातही कंदील चेतवून विजेचं गाणं गायलं गेलं. बघता बघता जालन्याचे आमदार अर्जुनभाऊ खोतकर यांनी हे नाटक पाहिलं आणि विधिमंडळाच्या अधिवेशनात त्यांनी ‘रंगमळा’ या नाटकाचे उदाहरण देऊन विजेचा प्रश्न उपस्थित केला. 
 
समूहाच्या सांस्कृतिक आविष्कारातली ताकद टीमच्या लक्षात आली आणि हळूहळू ‘रंगमळा’ विस्तारू लागला. जांब गावात सुरू झालेली ही सांस्कृतिक चळवळ आता भोवतालच्या धडपड्या, काही तरी वेगळं करू पाहणाऱ्यांना आपल्यात सामावून घेऊ लागली. जालन्यामधला तरुण विनोद जैतमहाल, पुण्याचे छायाचित्रकार संदेश भंडारे अशी विचारांशी नाते सांगणारी बरीच  माणसं जोडली गेली. दिग्दर्शक अतुल पेठे यांनी माहिती-अधिकारावरचे ‘दलपतसिंग येती गावा’ हे नाटक ‘रंगमळा’ टीमसोबत केले. अभिनेत्री वीणा जामकर मळ्याची भागीदार झाली. काही प्रयोग करून हे नाटक थांबले. आता पुढे काय, हा प्रश्न फणा काढून उभा राहिला. कायम नावीन्याच्या शोधात असलेले राजकुमार आणि संभाजी तांगडे हे दोन अस्वस्थ आत्मे आपल्या आतल्या डोहात कंदील घेऊन बुडी मारू लागले. काही तरी धूसर दिसत होतं, पण स्पष्ट मात्र होत नव्हतं. शोध जारी होता. 
 
‘शिव जलसा’ ची एक संकल्पना मी वडाळ्याच्या हॉस्टेलवर ऐकली, जलसाएेवजी याचे नाटक व्हावे म्हणून  आग्रह धरला, पण तो माझ्याच अंगलट आला. नाटक लिहिण्याची जबाबदारी माझ्यावरच आली. वर्ष उलटलं, काही केल्या एक ओळ लिहून होईना. शिवाजी नावाची तलवार चालवणारा कुणीच गावेना. याच दरम्यान मी ‘आकडा’ पाहिले होते. राजकुमार - संभाशी ओळखही वाढली होती. एकेदिवशी ही दोघं स्वतःचाच पाठलाग करत मुंबईला आले. सांताक्रूझला आमची भेट झाली आणि माझी सुटका झाली. शब्दांचा अचूक भालाफेक करणारा लेखक आयताच माझ्या जाळ्यात गावला होता, मग वडाळ्याच्या आंबेडकर हॉस्टेलवर पेटीच्या भात्यानं ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला!’ची मूळ संकल्पना ऐकवली. पेटीचा भाता हाकत होते, संभाजी भगत. डोहात धूसर दिसणारे आता स्पष्ट दिसू लागले. शिवाजीवर निस्सीम प्रेम करणाऱ्या मावळ्यांनी विचाराच्या समुद्रात उड्या घेतल्या. मळ्यात तालमी सुरू झाल्या.  कंदील घेऊन उजेड शोधणाऱ्या हातांना सूर्य गवसला होता. आता जबाबदारी वाढली होती. हात पोळू न देता उजेड पेरायचा होता.  मीनाक्षी राठोड, मी, प्रवीण डाळिंबकर, अश्विनी भालेकर, राजू सावंत, गणेश शिंदे, गजू तांगडे, अशोक, नारायण वाघमारे, अनिल वाघमारे, वसुंधरा. पुढे पुढे वैष्णवी आणि प्रदीप सरवदे. अाशुतोष आणि संतोष वाघमारे, विशाल पारदे.(संगीत साथ) ढोलकीवाले संदीप लोखंडे मामा. ‘रंगमळ्या’च्या वडाला लागलेल्या या पारंब्या आता जमिनीतही रुजू लागल्या. दोन वर्षे अथक मेहनत आणि अनेक हातांच्या सहकार्याने शिवाजी अंडरग्राऊंड रंगमंचावर आले आणि सर्वार्थाने सुपरहिट झाले. 
 
नंदू माधव, संभाजी भगत यांच्याबरोबरच महाराष्ट्रातील तमाम परिवर्तनवादी चळवळींचे ‘रंंगमळ्या’शी कायमचे नाते जोडले गेले. नाटकाला अनेक पुरस्कार मिळाले. तसे ते राजकुमार आणि संभालाही मिळाले. नवरदेव पारावर नटून बसावा, तसे नुसते एका पुरस्कारानेही नटून बसलेले मुंबई-पुण्यात बरेच आहेत. सिने-नाट्य इंडस्ट्री आपल्याला बँड वाजवत घेऊन जाईल, असे त्यांना वाटते. पण या दोघांनी हे नटणेच झुगारले.  इंडस्ट्री नावाच्या भुलभुलैयालाच हूल दिली. आपण सेलिब्रिटी होण्यासाठी कंदील हातात घेतला नव्हता, तर आपल्याला आपलं म्हणणं मांडायचं होतं. ते आपण कुठूनही मांडू शकतो. त्यासाठी पुणे-मुंबईतच बस्तान बसवायची काय गरज?  मग या काचेत सजणाऱ्या पुरस्कारांच्या ट्रॉफी गावात कापसाच्या गंजीच्या बाजूने माळवदावर जाऊन बसल्या.
‘शिवाजी’च्या विचारांचा गाडा ओढणं सुरूच होतं. शहरांतून, खेड्यापाड्यांतून, वाड्यावाड्यांतून. पायाच्या भिंगरीचा वेग इतका वाढला होता की, एका वर्षात दोनशे प्रयोग कधी झाले कळलेच नाही. कुठे नाटक सामाजिक सलोख्यासाठी ठेवले जाऊ लागले, तर कुठे ईदनिमित्ताने बुरखा घालून येणाऱ्या महिलांच्यासाठी. माणसाला माणसांपासून तोडणारे धर्मभेदाचे इमले ढासळताना दिसू लागले. अचानक एकेदिवशी नाटकाच्या गाडीला अपघात झाला. नाटकातला ‘आनंद’ हरपला. ‘रंगमळा’चं कुटुंब हादरलं. ‘पेरले तेच उगवते’ या उक्तीप्रमाणे  महाराष्ट्रभरातून हजारो माणसं मदतीला धावून आली. त्यांनी आमच्या ढासळलेल्या मनाच्या भिंती एक एक विट लावून उभ्या केल्या. यात सगळ्यात पुढे होते ते कॉ. धनाजी गुरव आणि अप्पा एकनाथ कदम. लाइट करणारा सौरभ शेठ आनंदच्या मैत्रीला जागला. नाटकाचे निर्माता भगवान मेदनकर ‘रंगमळा’ सोबत हिमतीने उभे राहिले. सिलसिला पुन्हा सुरू झाला.
 
शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला! नाटकानं ५ वर्षे, ५६३ प्रयोग पूर्ण केलेत. अजूनही प्रयोग होत आहेत. पण शिवाजी तळागळापर्यंत पोहोचलाय, असं वाटत नाही. ‘आकडा’ करूनही १५ वर्षे लोटली, पण आजही वीज गाव शिव ओलांडताना दबक्या पावलांनीच येते.  ही वीजेची गोष्ट शहराला सांगायला गेलो, तेव्हा कळाले की, शहरालाच आता  लोडशेडिंगने घेरलेय! त्यालाच आता कंदिलाची गरज भासू लागलीय. ‘आकडा’ टाकण्यासाठी चेतवलेला कंदिल कधी एवढा सर्वव्यापी झाला कळलंच नाही.
घुसळण सुरूच आहे. बेंदाडी घुसळली, तर चिखल वर येतो. दही घुसळलं तर लोणी. आपण काय घुसळायचे, हे ज्याचे त्याने ठरवायचे. आम्ही तर विचार घुसळतो. सभोवताली जे टोचतं-बोचतं, ते या घुसळणीत टाकत जातो. ते कधी ना कधी नाटक रूपाने बाहेर येईलच! 
विजेच्या शोधासाठी चेतवलेले कंदील हातोहात पसरलेत. आकडा तर अजून टाकता आला नाही. पण या वाढलेल्या कंदिलांच्या उजेडाने अंधार पळतोय! याचं समाधान आहे...
 
लेखकाचा संपर्क : ९९६०९५९७८५ 
kw3810@gmail.com
बातम्या आणखी आहेत...