आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संयमी क्रांती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्रकार गौरी लंकेश यांची काही दिवसांपूर्वी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्येच्या रूपानं माध्यमांवर झालेला हा हल्ला माध्यमस्वातंत्र्यावर भलेमोठे प्रश्नचिन्ह उभे करणारा आहे.
नाशिकला समीक्षक व भाषाशास्त्रज्ञ गणेश देवी यांच्या उपस्थितीत पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ मूक मोर्चा निघाला. या मोर्च्याचा शेवट नाशिकमधील कुसुमाग्रज स्मारकात झाला. त्या वेळी काहीही बोलण्याच्या आधी गणेश देवींनी गौरीचा फोटो समोर धरला आणि त्या फोटोतील डोळ्यांमध्ये बघून दोन मिनिटे श्रद्धांजली वाहा, असे आवाहन केले. या मूक मोर्च्यात केले गेलेले ते आवाहन खूप बोलके होते. त्या वेळी गौरीच्या डोळ्यात एकटक पाहत असताना एक वेगळीच चमक जाणवली. आतापर्यंत पुस्तकात शिकलेली पत्रकारितेची तत्त्वे, माध्यमांचे स्वातंत्र्य, पत्रकारांची तटस्थता असे अनेक मुद्दे त्या दोन मिनिटांत डोळ्यासमोर तरळून गेले. ते डोळे आपल्या निर्भयतेची गोष्ट सांगत आहेत, असे वाटले. ही नि:शब्द गोष्ट कान देऊन ऐकावी इतकी श्रवणीय होती. आणि प्रेक्षणीयसुद्धा. गौरीच्या हत्येची बातमी माध्यमांमधून वारंवार ब्रेकिंग न्यूज म्हणून झळकत होती. सतत कानावर पडत होती. जागोजागी या विषयावर बोलले जात होते. ही हत्या कुणी केली असेल याचे निरनिराळे तर्कवितर्क बांधले जात होते. पण त्या दिवशी गौरीच्या डोळ्यात बघताना ही सारी कोरडी चर्चा विसरून अंगावर शहारा आला. एक पत्रकार म्हणून तिच्याशी  हृदयसंवाद घडून येतो आहे असे वाटले. गौरीच्या घुसमटीला बंदुकीने पूर्णविराम दिला असला तरी या हत्येने गौरीच्या कुळातील, म्हणजे पत्रकारितेचा धर्म पाळण्यासाठी इतर कुठलेही धार्मिक वर्चस्व झुगारून बेधडक लिहिणाऱ्या असंख्य पत्रकारांच्या मनातील, घुसमटीला जन्म दिला आहे. एक पत्रकार म्हणून गौरीने पत्रकारितेतला एक वेगळाच अध्याय रचला आहे.  हा अध्याय पुस्तकात शिकवला जात नाही किंवा कुठल्याच वर्तमानपत्रात वार्ताहर म्हणून काम करतानाही कुणी शिकवत नाही. तो कार्यकर्त्याच्या भूमिकेत जाऊन स्वत:च रचायचा असतो. गौरीने तो रचला होता. 
आतापर्यंत अनेक विचारांना बंदुकीच्या गोळीने संपवण्यात आलंय. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि यांच्यानंतर आता गौरीचे नावसुद्धा जोडले जाईल. या लेखकांच्या, विचारवंतांच्या शारीरिक हत्या होणे आणि पेरूमल मुरुगनच्या या लेखकाने ‘माझ्यातील लेखक मेला आहे हे’ घोषित करणे हे सहिष्णुतेची परंपरा असलेल्या देशात पेरली जाणारी असहिष्णुता अधोरेखित करते. फोरेन्सिक सायन्सच्या एका प्राथमिक अहवालानुसार कलबुर्गी आणि गौरी लंकेश या दोघांच्या हत्येसाठी ७.६५ मिमीचे एकाच प्रकारचे पिस्तुल वापरले गेल्याचे समोर आले. ज्याप्रमाणे या हत्यारांचा कारखाना सारखा आहे त्याचप्रमाणे या हत्यारांमागील डोक्याचा वैचारिक कारखानासुद्धा सारखाच असावा. पूर्वीच्या तीन हत्यांच्या तपासात काहीच भरीव माहिती हाती लागलेली नसताना हा चौथा हल्ला होणे फारच भयावह आहे. अशा प्रकारच्या हत्यांमधून हल्लेखोरांना भीतीयुक्त वातावरण निर्माण करायचे होते; तुम्ही वेगळा विचार मांडत असाल, एखाद्या गोष्टीची चिकित्सा करत असाल तर छातीवर गोळी झेलायला तयार व्हा असा संदेश लोकांपर्यंत पोचवायचा होता आणि या हत्यांच्या मालिकेतून असे भीतीयुक्त वातावरण तयार करण्यात ते यशस्वी ठरले .

पत्रकाराने कुठल्याही बाजूला न झुकता तटस्थपणे घटनांची, विचारसरणीची, वेगवेगळ्या मतांची चिकित्सा करावी, बातमीमागील बातमी पत्रकाराला शोधता आली पाहिजे हे पत्रकारितेचे शिक्षण घेताना वर्गात कानीकपाळी ओरडून सांगितले जाते. आणि प्रत्यक्षात मात्र तुम्ही वेगळा विचार मांडत असाल, एखाद्या विचारसरणीला ज्ञानेंद्रिये बंद करून स्वीकारत नसाल तर गोळी झाडून संपवले जाते. पत्रकारितेचा प्रवास सुरू कुठून होतो, या प्रवासातील महत्त्वाची तत्त्वे, मूल्ये काय आहेत हे वारंवार सांगितले जाते पण या साऱ्याचा शेवट बंदुकीने होऊ शकतो हे मात्र जाणूनबुजून लपवले जाते. हे विरोधाभासाचे वातावरण भयंकर अस्वस्थ करणारे आहे. कागदोपत्री तर आपला देश विविधतेचा सन्मान करणारा लोकशाही देश आहे पण अप्रत्यक्षपणे एकाच साच्यातली डोकी तयार करणारी व्यवस्था इथे फोफावते आहे. तुमचे मत मांडण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य घटनेने दिले खरे, पण ते मत आम्हाला पटले नाही तर तुम्हाला जीवे मारण्याचा अधिकारही आम्ही सत्तेतून मिळवला आहे. गौरीवर झालेला हल्ला हा याच मानसिकतेतून झाला. गौरी लंकेश ही फक्त एक व्यक्ती नव्हती तर देशातील माध्यमांची, लोकशाहीची प्रतिनिधी होती. स्वातंत्र्याची सत्तरी पार करत असताना देशाच्या आधारस्तंभांवर असे हल्ले होणे, ही चिंतेची बाब आहे. पण लक्षात कोण घेतो?

ज्या ताकदींनी दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांना संपवले, पेरूमल मुरुगन यांच्यामधील लेखक मारला त्याच ताकदी कदाचित उद्या तुम्हाला किंवा मलाही संपवतील. हे वादळ आपल्या डोक्यावर कायमच घोंगावते आहे. कलबुर्गींच्या हत्येचा लवकरात लवकर तपास करा, ही मागणी घेऊन गौरी मुख्यमंत्र्यांकडे जाते आणि ज्या हत्यारांनी कलबुर्गींना मारलं त्याच हत्यारांनी गौरीचाही खून केला जातो. हे एखाद्या देमार चित्रपटात शोभावे असेच आहे. कदाचित गौरीच्या हत्येच्या तपासासाठी मागणी करणाऱ्या आणखी कुणाला संपवले जाईल. ही हत्यांची मालिका अशीच वाढत जाईल, अशी भीती वाटते. आम्ही फक्त श्रद्धांजली सभा घेऊनच आमचा निषेध व्यक्त करू. या क्रूरकर्माबाबतची आपली प्रतिक्रिया विकसित करायला हवी. या प्रतिगामी शक्तींना टोलवण्याचे काम लोकांनी लोकांमध्ये येऊन करायला हवे. 

गौरीची हत्या हा एक भाग झाला पण या हत्येनंतर तयार झालेले किंवा तयार करून घेतलेले वातावरण ही अस्वस्थता आणखी वाढवणारे आहे. गौरीच्या हत्येबद्दल आनंद व्यक्त करणारी, तिचे देशद्रोह्यांशी संबंध होते म्हणून हत्या झाली हे बरेच झाले, असे म्हणणारे किंवा घाणेरड्या शब्दांत या हत्येला समर्थन देणारे पेड ट्रोल हे वातावरण आणखी भडकवत आहेत. सध्याचे सरकार वातावरणातील बदलापेक्षा वातावरणनिर्मितीला जास्त महत्त्व देणारे आहे, हे आतापर्यंच्या अनेक उदाहरणांमधून दिसून येते. स्वत:च्या बाजूने अनुकूल वातावरणनिर्मिती किंवा स्वत:ला वगळून इतर सर्वच मतांसाठी प्रतिकूल वातावरणनिर्मिती करण्यासाठी सरकारमध्ये एखादी विशेष समिती असली पाहिजे, असे वाटते. पेड ट्रोल हे त्याचेच अपत्य. गौरी लंकेशचा शेवटचा लेख हा सोशल मीडियाद्वारे पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीसंदर्भात होता. यात तिने भाजप नेत्यांची उदाहरणे देऊन खोटी माहिती वापरून कशा प्रकारे जनतेला संमोहित केले जाते, हे उघड केले होते. आणि गौरीच्या हत्येनंतर पुन्हा एकदा गौरीविरोधात जनमत भडकवण्यासाठी याच खोट्या माहितीचा आधार घेतला जातो हे खेदजनक आहे. 

वेगवेगळ्या मतांमधून विकासाचे चित्र स्पष्ट होते. पण फक्त भौतिक विकासाला चालना देणाऱ्या आणि वैचारिक विकासाला विरोध करणाऱ्या लोकांना हे पटणारे नाही. एकेक करून समाजातील सर्वच घटकांवर हल्ले होत आहेत आणि दुर्दैव म्हणजे या हल्ल्यांना प्रतिक्रिया देण्याची क्षमताही आपल्याकडे नाही. गौरीच्या रूपाने माध्यमांवर झालेला हा हल्ला माध्यमस्वातंत्र्यावर भलेमोठे प्रश्नचिन्ह उभे करणारा आहे. एकीकडे जगण्याच्या, खाण्याच्या हक्कावर बंधनं तर दुसरीकडे विचार करण्याच्या हक्कावरही बंदुकीचा अंकुश अशा वातावरणात राहून आपण यालाच ‘अच्छे दिन’ मानायचे हे बाळकडू पाजण्यासाठी जागोजागी बूथ उभे राहिले आहेत.

पण विचार संपवण्यासाठी लेखणीवर हल्ले करून काही होणार नाही. लेखणी साधन आहे, साध्य नाही. एक लेखणी संपवाल तर हजारो लेखण्या लिहित्या होतील. बंदुकीला उत्तर लेखणीनेच दिले जाईल. लेखणी संयम शिकवते तर बंदुक हिंसा. 
हिंसेतून युद्ध होतात. आम्हाला संयमातून क्रांती घडवायची आहे.
 
- काजल बोरस्ते, नाशिक
kjlbrst165@gmail.com
बातम्या आणखी आहेत...