आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘अहं’ची बाधा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘देवा सरू दे माझे मीपण’ गाण्याच्या ओळी कानावर पडल्या आणि मला परवाच यांच्याशी झालेले भांडण आठवले. कशावरून तरी हे माझ्यावर चिडले आणि मी त्यांना म्हणाले, ‘मीच आहे म्हणून तुमचा संसार निभला.’ तेव्हा हसत हसत यांनी मला टोमणा मारला की, जगातल्या सर्वच स्त्रियांना वाटतं की, त्या आहेत म्हणून त्यांच्या नवऱ्यांचा संसार चाललाय. पण खरं म्हणजे, आम्ही पुरुष चालवून घेतो म्हणून चाललंय सगळं व्यवस्थित.
बरं बाबा, म्हणून मी माघार घेतली खरी; पण विचारांचं चक्र सुरू झालंय. खरंच आपण आहे म्हणून हे झाले, मी नसते तर हे झालं नसतं. किती भ्रमात असतो आपण. मला लहानपणी आजीने सांगितलेली एक गोष्ट आठवली. आटपाट नगरात एक राजा होता. तो फार व्यवहारी व थोडासा निर्मम होता. त्याच्या राज्यातली प्रजा त्याला वचकून असायची. त्याच्या ह्याच राजकारभाराला कंटाळून त्याचा पहिला प्रधान त्याला सोडून गेला, म्हणून दुसऱ्या प्रधानाची नियुक्ती राजाने केली. दुसरा प्रधान खूप हुशार होता. थोड्याच दिवसांत त्याने सर्व कारभार हाती घेतला. सुरुवातीला प्रजेच्या हिताची कामे त्याने केली, त्यामुळे त्याची लोकप्रियता खूप वाढली. राजाही त्याच्यावर आता खूप विश्वास टाकू लागला. प्रधानमंत्र्याला वाटले, ‘हे माझ्यामुळेच चालले आहे. अहंकाराची बाधा झालेला प्रधान मग सगळ्यांना तुच्छ लेखायला लागला. जुन्या ज्या सहकाऱ्यांनी त्याला मदत केली त्यांनाच तो घालूनपाडून बोलू लागला. नवीन खुशमस्करे त्याच्या अवतीभवती गोळा झाले. त्याची स्वार्थासाठी स्तुती करू लागले. राजा खूश प्रधान खूश. पण एक दिवस राज्यात एक संकट आलं. सगळी वाताहत सुरू झाली. आणि फुटक्या नावेतून उंदीर पाळावे तसे सगळे इकडे तिकडे पळू लागले. खुशमस्करे प्रधानाच्या विरोधात गेले, राजाचे कान भरू लागले. आता प्रधानाला जुन्या लोकांची आठवण झाली. पण वेळ निघून गेली होती. लवकरच राजा व प्रधान यांच्यात वितुष्ट आले व प्रधानाला राज्य सोडावे लागले.
विचार करताना मला अर्थ उमगला. जगात कोणावाचून कोणाचेच अडत नसते, त्यामुळे मी केले म्हणून झाले, ही भावनाच सोडून द्यावी व आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहावे. म्हणजे अपयश आलं तर आपले प्रयत्न कमी पडले म्हणून पुन्हा प्रयत्न करायचे व यश मिळाले तर सर्वांच्या सहकार्यामुळे मिळाले म्हणून लोकांना मोठेपणा द्यायचा. म्हणजे ‘अहं’ची बाधा नको व्हायला.
खरं आहे की नाही सख्यांनो?
बातम्या आणखी आहेत...