आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वयंरोजगार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टेशन परिसरात असलेल्या कपड्यांच्या कारखान्यात दोन रुपये रोजंदारीवर कामास सुरुवात केली. काकांच्या सोबत जवळच पत्र्याच्या चाळीत राहत होते. ज्या मुंबईतून निराश होऊन काही वर्षांपूर्वी गावाला परतले होते त्याच मुंबईत मला स्वत:ला सिद्ध करायचे होते. हळूहळू कारखान्यात माझा जम बसू लागला. महिन्याला दोनशे-अडीचशे रुपये मिळू लागले. कल्याणला छोटंसं घर भाड्याने घेऊन आईवडील आणि भावंडांसोबत राहू लागले. आयुष्यात शिक्षणाचे महत्त्व कळले होते परंतु वेळ निघून गेली होती. पैशाचे महत्त्व कळण्यासाठी मला माझी १६-१७ वर्षांची बहीण गमवावी लागली होती. उपचाराविना अकाली गेलेली बहीण हीच माझ्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना असेच म्हणावे लागेल.

कष्ट उपसण्याची तयारी होती, मात्र आर्थिक पाठबळ मिळत नव्हते. बँकांच्या दारात अनेकदा खेटे घातले; परंतु उपयोग झाला नाही. शासनाच्या विविध संस्थांकडे गेले. परंतु माझ्यावर कुणीही विश्वास दाखवायला तयार नव्हता. शेवटी महात्मा फुले विकास महामंडळाअंतर्गत असलेल्या उपक्रमांमार्फत मला पन्नास हजार रुपयांचे कर्ज मिळाले. या कर्जाच्या माध्यमातून मी फर्निचर विक्रीचा व्यवसाय सुरू केला.

या काळात मला बऱ्याच शासकीय योजनांची माहिती मिळाली. आम्ही स्थापन केलेल्या सुशिक्षित बेरोजगार युवक संघटनेच्या माध्यमातून या सर्व शासकीय योजनांची माहिती परिसरातील होतकरू, गरजू युवक-युवतींना देण्यास सुरुवात केली. यातूनच बऱ्याच युवक-युवती माझ्या संपर्कात आल्या. आजपर्यंत सुमारे तीन कोटी रुपयांहून अधिक कर्ज मिळवून देण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.
गरीब, होतकरू युवक-युवती स्वत:चे व्यवसाय करीत आहेत. काही यशस्वी उद्योजक म्हणून समाजात मानाने वावरत आहेत. नोकरी करण्यापेक्षा स्वयंरोजगार सुरू केल्यास स्वत:बरोबर इतरांना रोजगार मिळतो म्हणून अजूनही आम्ही युवकांना स्वयंरोजगाराची ओळख करून देत आहोत. बेरोजगार युवक-युवतींच्या मेळाव्यांच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातून अक्षरश: लाखो तरुणांच्या संपर्कात आलो. त्यांच्याशी मानसिकरीत्या जोडले गेलो. त्यांच्या सुख-दु:खाशी समरस होऊन काम करीत राहिलो.
(क्रमश:)


लेखिका दादर येथील कमानी उद्योग समूहाच्या अध्यक्ष आहेत.