आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यवसाय आणि माणुसकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माझ्यासारख्या अनेकांना इच्छा असून शिक्षण घेता येत नसेल, बालवयात स्वत:साठी आणि कुटुंबासाठी नोकरी करावी लागत असेल, त्या वंचितांसाठी एखादी शिक्षण संस्था सुरू करण्याचा मानस आहे. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे यशाचा मार्ग फक्त शिक्षणातूनच मिळू शकतो, हे अनुभवातून शिकल्यामुळे, माझी दोन्ही मुले उत्तम शिकून आज स्वत:च्या पायावर उभी आहेत. शिक्षणाबरोबर संस्कारदेखील महत्त्वाचे असतात. त्यामुळे चांगले नागरिक घडू शकतात. यासाठी आमच्या संस्थेमार्फत आम्ही सातत्याने व्याख्यानमाला, चर्चासत्र आयोजित करतो. तरीदेखील पुरोगामी म्हणवणार्‍या महाराष्ट्रामध्ये अहमदनगर, अकोला, कोकण या ठिकाणी दलित हत्याकांड, वाळीत टाकण्याचे प्रकार घडतच आहेत. काही वर्षांपूर्वी भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी येथे दलित हत्याकांड झाले होते.

त्या घटनेने व्यथित झाल्याने आम्ही ‘खैरलांजीच्या माथ्यावर’ हा चित्रपट निर्माण केला. या चित्रपटाच्या माध्यमातून गौतम बुद्धांचे विचार पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न मी केला होता. परंतु काही कारणाने अजून तो चित्रपट आम्हाला प्रदर्शित करता आला नाही. असो. अलीकडेच भारतीय महिला बँकेच्या संचालक मंडळावर माझी नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीबरोबर माझ्यावर जबाबदारी आली असल्याची जाणीव मला आहे. या पदाचा अधिकाधिक उपयोग भारतातील असहाय महिलांना कसा करता येईल, याचा विचार करून नवशिक्या, गरजू महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी कर्ज देताना उद्योगाच्या ताळेबंदाची सक्ती काढून टाकली, तसेच कर्जाची परतफेड करण्यास पहिले सहा महिने सवलत जाहीर केली आहे. या स्तंभातून रामजीभाई कमानी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच, एक खास गोष्ट नमूद करावीशी वाटते.

एका ध्येयवादी उद्योगपतीला कौटुंबिक आणि काही हितशत्रू कामगार कलहामुळे, आपला उद्योग रसातळाला जाताना पाहावा लागला. हा उद्योग आमच्या ताब्यात देण्यात आला, तेव्हा कारखान्यासह त्यांची निवासस्थानेदेखील आमच्या मालकीची झाली होती. परंतु या अत्यंत सत्शील उद्योगपतीच्या आदरापोटी आम्ही त्यांची निवासस्थाने त्यांच्या वारसांना सुपूर्द केली. एकाच वेळी व्यवसाय आणि माणुसकी असे दोन्ही जपण्याचा हा माझा प्रामाणिक प्रयत्न होता. एवढे जरी भान मला तुमच्यापर्यंत पोहोचवता आले, तरीही हा संवाद यशस्वी होईल. धन्यवाद.

कल्पना सराेज, अतिथी संपादक
अध्यक्ष, कमानी उद्योग समूह
बातम्या आणखी आहेत...