आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वर वादळून गेला...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आदरांजली - Divya Marathi
आदरांजली
नादब्रह्माची ती उपासक होती. त्यात तिची अपरंपार मेहनत होती. स्वरसाध्य एक करणं म्हणजे केवळ उत्तम गळा वा तात्पुरती हौस नव्हती. "जीव पिंजून पिंजून टाकला तरी तो स्वर बाहेर येत नाही', असं जेव्हा ती म्हणायची, तेव्हा नक्की तिला काय म्हणायचं आहे, हे मला 
ध्यानात यायचं नाही...
 
साल १९६९. मुंबईत मी लेखनासाठी जात असे. किशोरीताईचं त्यापूर्वीचंही गाणं संधी मिळेल तसं एेकलं होतं. तिचं एक भावगीत ‘उघड उर्मिले कवाड... उजळतसे प्राची’ हे गाणं मैफलीत एेकलं होतं. माझी आणि किशोरीताईची ओळख पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी करून दिली. त्या वेळी ती पार्ल्याच्या जयविजय सोसायटीत राहात होती. हृदयनाथ आणि तिचं सुरीलं नातं होतं. तिने माझं फार प्रेमाने स्वागत केलं. ती त्या क्षणी कोणत्या तरी धुंदीत होती, आनंदात होती. स्वरानं झिंगलेली होती. तिनं मला ब्लॅकरोझ परफ्युम भेट दिला होता...

भूप रागामध्ये तिनं बांधलेली ‘सहेला रे आ मिल गाये’ ही चीज त्यांच्या मैत्रीवरच आधारलेली आहे. तेव्हा तिनं मला कविता म्हणायला सांगितली. ती तिला खूप आवडली. म्हणाली, ‘बाळ, ही आपल्या स्वरकुळातली आहे...’ काही भेटी नियोजित असतात. तेथे दीर्घ परिचय, उपचार असं काही असत नाही. तेथे विचार आणि काळ नसल्यामुळे ती नाती रुजतात, फुलतात आणि वाढतात...
 
ताईचा सहवास म्हणजे स्वरमंत्र. त्या दर्शनासाठी ती झपाटलेली असायची. हृदयनाथजींशी ती
स्वरभरून बोलायची. ती एकदा म्हणाली, ‘रागिणीने तेच स्वरूप दाखवून, माझ्या गळ्याचं माध्यम करून अवतरित व्हावं...’ कारण परंपरेचा वारसा आपण जपतो, चालवतो. पण ते तेवढंच सीमित नाही. बागेश्रीत मधूनच लागणाऱ्या पंचमाचं दर्शन तिने वर्णिलंं होतं. म्हणाली होती, ‘मला ते दिसतं. याला लोक संभ्रम, नादिष्टपणा म्हणतात. पण मी काही क्रांती करत नाही - त्या दर्शनाच्या आड येणारी परंपरा, संस्कार व संस्कृती मी काढून टाकते.’
किती व्याकूळ होऊन सांगते आहेस तुझ्या सखीला
बागेश्री बनातून... ‘संऽखिऽमऽन लाऽगे ना’
अगं! तुझ्या त्या ओझरत्या पंचमातून
येऊ लागलेत ना, आता आकाशपुष्पाचे दरवळ...
तळमळ निवेलच त्यांनी.. त्या दारुण वियोगाची
पार्थिवाला अपार्थिव करणाऱ्या स्वराचं दान
तुझ्या कंठाच्या पदरात घातलंय ना ईश्वरानं?
एकदा का ती ओटी स्वीकारली, की
व्रतस्थच राहावं लागतं गं श्रमणासारखं
म्हणूनच श्रावणासारख्या बरसतात धारा
तुझ्या अद््भुत बागेश्री बनात...
तिची ही मनस्विता, त्याच उत्कटतेनं मी ऐकायची. त्यामुळेच आमची मैत्री वाढली, फुलली आणि फोफावली...
 
किशोरीताईचे वडील माधव भाटिया तिच्या लहानपणीच गेले. उदरनिर्वाहाची जबाबदारी माईंवर आली. त्या ट्युशन्स घेत, ताईला स्वतंत्रपणे शिकविण्यासाठी त्यांना वेळ नव्हता. ती ऐकायची. कान आणि मन देऊन. धांदल उडायची तिची.  जे. कृष्णमूर्ती म्हणत, उत्तम श्रवण करणे ही फार मोठी कला आहे. किशोरीताईचा कान नादश्रवण अत्यंत सूक्ष्मपणे  करण्यास तयार झाला होता. तिला कोणताही संगीतप्रकार वर्ज्य नव्हता. अलीकडेच तिला एक पंजाबी कव्वाली खूप आवडली होती. ‘गीत गाया पत्थरोंने’ हे तिचं सिनेगीत प्रचंड लोकप्रिय झालं होतं. पण अशा प्रत्येक मोहाच्या क्षणी तिला पाठ फिरवावी लागली होती. स्वरदेवतेनं अवतरावं, अशी कंठाची मशागत केली नाही तर त्याचं दिव्य स्वरूप कळत नाही, हे तिला ठाऊक होतं. तिच्यासारखा स्वरध्यास मी खरंच पाहिला नव्हता.
 
अर्थातच त्या प्रकांड विद्वत्तेला प्रतिभेची जोड होती.त्यामुळे तिच्या अंतरंगीच्या स्वराभ्यासासंबंधी ती फार स्पष्ट व सुंदर बोलू शकायची. आश्चर्य वाटेल, पण किशोरीताईने विमानतळांवर बसून ज्ञानेश्वरी लिहून काढली होती. अभ्यासाशिवाय पर्याय नाही, याची खात्री पटल्यामुळे भरत नाट्यशास्त्र तिने तासन् तास वाचून त्याच्या नोट्स काढल्या होत्या. ती एलफिन्स्टन कॉलेजमध्ये जात होती. व्यवसायानं डॉक्टर व्हायचं डोक्यात होतं. ती बुद्धिमान असल्यामुळे अवघडही नव्हतं; पण काय निवडायचं, यासाठी घालमेल झाली. माईंना ती केवळ आई आणि गुरूच मानत नव्हती, तर त्यांच्यातील सहनशीलतेला, प्रज्ञेलाही ती फार मानत होती. जे घरी आहे तेच प्रयत्नपूर्वक घ्यावं, माई म्हणजे स्वर आहेच. तोच शिकायचा प्रयत्न करावा, असं तिने ठरवलं होतं. अंजनीबाई मालपेकर यांच्याकडे काही काळ ती शिकली. स्वरलिपी घेऊनच ती जन्माला आली होती. ‘अंतरीचे धांंवे स्वभावे बाहेरी’ कधीही तिने स्वरोपासना, रियाज जुजबी केला नाही. तेथे पावित्र्य असायचं. विद्यार्थ्यांना शिकवताना गहनगंभीर भाव असायचा. रघुनंदन पणशीकर, आरती अकंलीकर, देवकी पंडीत, विजया धुमाळ यांच्या तिने शिकवितानाच्या तालमी मी बघितल्या आहेत. त्या प्रत्येकातील बलस्थान व स्वरवृत्ती तिला कळायची.
 
मी मुंबईला किशोरीताईच्या घरी खूप राहिले, यामुळे तिच्यातील विलक्षण संवेदनशीलता, तरलता व प्रेम मला अनुभवायला मिळालं. किशोरीताईच्या जवळिकीमुळे संगीताच्या विविध क्षेत्रातील कलावंतांचे जीवन जवळून बघायची संधी मिळाली. 
“स्वर वादळून गेला, नाही किनारा मिळाला...” संगीत क्षेत्राचे बॉलीवूडच्या तालावर नाचणे, पैसे मिळवणे, सुंदर घर घेणे, गाड्यांचे प्रदर्शन मिरविणे हे तिनेही पाहिले, तेव्हा स्वत:चे जीवन नादब्रह्माच्या उपासनेसाठी आहे, याचा निश्चय करून ती तरारली. निर्भय झाली. अनुचित वाटले तेव्हा आक्रमक होऊ लागली. लोकांच्यात गैरसमज होऊ लागले, तिच्यावर विचित्रपणाचे आरोप करू लागले. मी स्वत: हजर असलेला एक किस्सा जरूर सांगण्याजोगा आहे.
 इचलकरंजीला तिची सकाळची मैफल होती. ती आमच्या घरी मिरजेलाच उतरली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना मी किशोरीताईची सांगीतिक ओळख करून देत होते. मध्येच किशोरीताईने मला थांबवलं.  म्हणाली, ‘कल्याणी गर्दी खूप आहे. काही श्रोते झाडामागेही बसले आहेत. त्यांना झाडापुढे येऊन बसण्याची विनंती कर...’ त्याप्रमाणे मी नम्रपणे विनंती केली. परंतु पुढे त्याची कथा अशी झाली की, “किशोरीताईंचा विचित्रपणा असा की, त्यांनी सांगितलं, ते झाड कापल्याशिवाय मी गाण्यास सुरुवातच करणार नाही...’ या दंतकथेला कसा आवर घालणार? त्या वेळी हातातल्या मोबाइलवर आवाज रेकॉर्ड करण्याचा, फोटो काढण्याचा आधार नव्हता. किशोरीताईवर दोषारोपण खूप झाले. पण ते दु:ख किंवा सल स्वरांना तिने लागू दिले नाहीत.
 
गांधर्व महाविद्यालयाने तिच्या गौरवास्तव अंक काढण्याचे ठरविले. मला त्याचे मुख्य संपादक बनवले. त्यासाठी मी दिल्लीपासून दक्षिणेपर्यंत पं. रवि शंकर, कुमार गंधर्वजी, भीमसेन जोशी, शफाअत खान आदी अनेक ज्येष्ठ-श्रेष्ठांच्या मुलाखती घेतल्या. तेव्हा तिच्या संगीतासंबंधी या चार कलाकारांकडून एेकताना पावनगंगा आपल्याला स्पर्श करून गेल्याची माझी भावना झाली. 
माईंचं म्हणजे मोगूबाई कुर्डीकरांचं चरित्र लिहिणं, हाही दैवी योजनेचाच भाग होता. त्या वेळी मी माईंसमवेत गोव्याला जाऊन राहिले होते. तो अत्यंत सुरेल काळ आजही काळीजकाठ फुलवत राहतो. किशोरीताईचं माई हे दैवत होतं. त्या दोघींचाही स्वर-संग त्या वेळी मला मिळाला होता. ज्या नादब्रह्माची ती उपासक होती, त्यात तिची अपरंपार मेहनत होती. स्वरसाध्य एक करणं म्हणजे उत्तम गळा वा तात्पुरती हौस नव्हती... ‘जीव पिंजून पिंजून टाकला तरी तो स्वर बाहेर येत नाही’, असं जेव्हा ती म्हणायची, तेव्हा नक्की तिला काय म्हणायचं आहे, हे मला ध्यानात यायचं नाही.
 
काही दिवसांपूर्वी ती आमच्या मैत्रिणीला म्हणाली, ‘भूपातला गांधार कसा शुद्ध लागेल, तसा मरणाचा स्वर लागला पाहिजे.’ 
...आणि आठवड्यापूर्वी दिल्लीला दोन तास गाणारी ताई - रात्री फक्त सूप पिऊन अंथरुणावर पडली - तिला डॉक्टर नको होते, हॉस्पिटल नको होते. हवे होते, अनाहत! अनाहत!!
 
kkalyani1508@gmail.com
बातम्या आणखी आहेत...