आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलीवूडचा महिमा...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन राज्ये. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू. दोन्हीकडे महिला मुख्यमंत्री. एक ममता बॅनर्जी; ज्यांनी सलमान रश्दी यांना कोलकात्यात येऊच दिले नाही. दुस-या जयललिता; ज्यांनी कमल हासनचा ‘विश्वरूपम’ प्रदर्शित करायला परवानगी दिली नाही. आता खूप खटाटोप करून ती मिळाली असली तरी कमल हासनचे जे नुकसान व्हायचे ते झालेच. पण, या रागात तो देश सोडून गेला तर? खरे तर असे काही होत नाही. टीव्हीवर दाक्षिणात्य स्टार धनुषला पत्रकाराने प्रश्न विचारला की, खरेच कमल हासन देश सोडून गेला तर देशाचे नुकसान होईल का? धनुषला क्षणभर काहीच सुचले नाही. कुणालाच सुचणार नाही. एक कलावंत देश सोडून गेल्याने काय नुकसान होते? म्हणजे काही वर्षांपूर्वी एम. एफ. हुसेन देश सोडून गेले, भारताबाहेर त्यांनी जगाचा निरोप घेतला; पण त्याने आपले काय नुकसान झाले? हे आपल्याला अजून नीटसे कळलेले नाही किंवा माध्यमांनीही ते नीट मांडलेले नाही. त्यामुळे एखादा कलाकार देश सोडून जाणार असेल तर आपण फार घाबरत नाही किंवा चिंताही करत नाही. आशा भोसले यांनी घरासमोर उड्डाणपूल झाल्यास देश सोडायची धमकी दिली, तेव्हा तो विनोदाचा विषय झाला होता. कुणीही आता आशातार्इंची मैफल ऐकता येणार नाही, म्हणून अश्रू ढाळत असल्याचे दिसले नाही आणि योगायोग बघा, तो शेखर कपूर कधीच देश सोडून गेलाय तिकडे लंडनला रागावून; ‘बँडिट क्वीन’ प्रकरणावरून.

त्याने तिकडे सिनेमे केले दोन आणि आता नेमका तोच ‘विश्वरूपम’मध्ये आहे. आता ‘विश्वरूपम’चा दिग्दर्शक कमल हासनवरही तीच वेळ आलीय. पण कमल हासन असे करणार नाही. कारण तो ज्या कॉलीवूडमध्ये (हिंदीला जसे बॉलीवूड म्हणतात तसे तामिळ चित्रपटसृष्टीला कॉलीवूड असे संबोधण्याचा प्रघात आहे.) आहे तिथे लोक नटावर देवासारखे प्रेम करतात. ते त्याला दुस-या देशात जाण्याची वेळ येऊ देणार नाहीत. जरी कमल हासन रजनीकांतएवढा लोकप्रिय नसला तरीही!

याचे मुख्य कारण आहे, दक्षिणेतील सिनेप्रेमींचे आपल्या अभिनेत्यांवर, नेत्यांवर आणि आपल्या भाषेवर असलेले निरतिशय प्रेम. तामिळनाडूतल्या काही भाषाप्रेमींनी एकेकाळी केंद्र सरकारने हिंदी भाषा आपल्यावर लादू नये, म्हणून जाळून घेतले होते. त्यानंतर 1987मध्ये एम. जी. रामचंद्रन यांचे दीर्घ आजाराने निधन झाले, तेव्हा कमीत कमी 25 ते 30 लोकांनी शोक अनावर होऊन आत्महत्या केली होती. त्याच आसपास एम. करुणानिधी यांना केवळ अटक झाली म्हणून जवळपास तेवढ्याच लोकांनी स्वत:ला जाळून घेतले होते.

हे सगळे अजब आहे; पण खरे आहे. म्हणून कमल हासनसारखा कलावंत कोट्यवधींचा प्रयोग करण्याचे धाडस करू शकतो. काहीशे कोटी खर्चून ‘रोबो’सारखा सिनेमा रजनीकांतला घेऊन बनवला जातो...

‘साउथ’ची चित्रपटसृष्टी ज्यात कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश आणि केरळ येतात; यातील कलावंत एकमेकांच्या भाषेत, पण सहज काम करत असतात. तामीळ सिनेमा हा तेलुगुमध्ये डब होतोच. कर्नाटकमध्ये पाहिला जातो. केरळमध्येही प्रदर्शित होतो. लोकप्रियता आणि दाक्षिणात्य सभ्यता म्हणजे नेमके काय याचा अंदाज महाराष्ट्रात बसून सहजी येत नाही. मागे चेन्नईला अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासोबत विजय (हाच धोनीच्या चेन्नई सुपरकिंगचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडरही होता.) नावाच्या तामीळ सुपरस्टारला भेटण्याचा योग आला. दिवसभर मी या नटाला निरखत होतो. पूर्ण दिवसात त्याने कधी स्पॉटबॉयकडे खुर्ची मागितली नाही बसायला की कुणावर खेकसला नाही. तसा तो फारसा कुणाशी अघळपघळ गप्पाही मारत नव्हता. जो त्याला भेटेल त्याला विनयाने भेटून पुन्हा आपल्या कामात मग्न होत होता. त्या भेटीत या माणसाबद्दल आदर वाटू नये, असे एकही कारण मला दिसले नाही. मग त्याच्याशी बोलायला लागलो तेव्हा लक्षात आले की दक्षिणेतल्या स्टार मंडळींचे शेकडो फॅन क्लब आहेत. हे क्लब आपापल्या स्टारचा सिनेमा पहिल्या दिवशी भक्तिभावाने बघतात. स्टारही आपले चाहते नाराज होणार नाहीत, याचाच नेहमी विचार करत असतात. अगदी रोज सकाळी ठरल्या वेळेत घराबाहेर येऊन चाहत्यांना दर्शन देणे वगैरे. विजयलासुद्धा रोज सकाळी सहा-साडेसहाला दर्शनाची वेळ पाळावीच लागते. प्रत्येकाचा कटाक्ष आपली प्रतिमा जपण्यावर असतो. म्हणूनच कुणी स्टार पार्टीत खुलेआम दारू पीत आहे, हे दृश्य येथे दिसत नाही. विजयप्रमाणेच तामीळमध्ये सूर्या आणि धनुष हे दोघे तुफान लोकप्रिय नट आहेत. आणखी बरेच आहेत; पण या लोकांना तुम्ही कधीही बघा, यांचा साधेपणा तुम्हाला यांच्या प्रेमात पाडतो.

यातील लोकप्रियतेच्या कळसावर असलेला एकमेव नट म्हणजे रजनीकांत. त्याचा एक किस्सा सांगितला जातो. रजनीकांतची कार रस्त्याने जात असताना पोलिसांनी अडवून धरली. कारण समोरून मुख्यमंत्री जयललिता यांची गाडी जाणार होती. रीतसर गाडी थांबवली गेली; पण एका क्षणी कंटाळून रजनीकांत गाडीबाहेर आला तर क्षणात चाहत्यांची एवढी गर्दी जमली की संपूर्ण रस्ते जाम झाले तिथले. जयललितांची गाडी त्यांच्या घराबाहेर एक इंचही निघू शकली नाही. पोलिसांना रजनीकांत यांची माफी मागून आधी त्यांना जाऊ द्यावे लागले. हा रजनीकांतचा विनोद नाही; ही रजनीकांतची नट म्हणून ताकद आहे.

नागार्जुन नावाचा अभिनेता. आताच्या तरुण अभिनेत्यांच्या लहानपणापासून तो तेलुगु चित्रपटांचा हीरो आहे. कर्नाटकातील बदामी येथे एकाच वेळी अक्षय कुमारच्या ‘राऊडी राठोड’ आणि नागार्जुनच्या ‘साई बाबा’ चित्रपटाचे शूटिंग चालू होते. साउथचे अभिनेते आणि हिंदी अभिनेते एकाच हॉटेलमध्ये उतरले होते. योगायोगाने त्या वेळी मीही तिथे होतो. अक्षयकुमार सकाळपासून स्वीमिंग पूलमध्ये दिसत होता. तो स्वीमिंग पूलमध्ये पोहत नव्हता, चालत होता आणि कुणाशी तरी फोन वर बोलत होता की पाण्यात चालल्याने पाठीचा पण कसा व्यायाम होतो वगैरे. बराच वेळ त्याचे हे चालले होते. कुतूहल म्हणून चौकशी केली, नागार्जुन कुठे दिसत नाही. कळले, नागार्जुन काही अंतरावर असलेल्या एका रिसॉर्टमध्ये उतरला आहे. कारण काय तर, त्याच्याभोवती खूप गर्दी होऊन परिस्थिती हाताबाहेर जाईल. थोडक्यात, दाक्षिणात्य प्रेक्षक ज्या नटाला वा नटीला आपला मानतात त्यांच्या ‘ऑफ स्क्रिन’ प्रतिमेचे अनावश्यक अवडंबर न माजवता डोक्यावरच घेतात. देव करून टाकतात त्यांचा. तो पडद्यावर कसा दिसतो, प्रत्यक्षात कसा दिसतो याच्याशी त्यांना जराही कर्तव्य नसते.

रजनीकांत महाराष्ट्रात राहिला असता आणि हिंदी सिनेमात काम करत राहिला असता तर आज जसा साधा राहतो, विग न घालता लोकांमध्ये फिरतो, तसा फिरू शकला असता का? शक्यच नाही. आणि रजनीकांत मराठी चित्रपटात काम करत राहिला असता तर? असो.

आपण हा विचार करून पाहू या, की मराठी चित्रपटसृष्टीतला कुणी का मुख्यमंत्री होऊ शकला नाही? मराठी नट नेहमी राजकारणात प्रचाराला वापरले जातात; पण एखादी मराठी अभिनेत्री जयललिता होण्याचे चान्सेस दूर-दूरपर्यंत दिसत नाहीत. याचे काय कारण असेल? रमेश देव, आदेश बांदेकर यांच्यासारख्या अभिनेत्यांनी प्रयत्न केले होते, पण ते अपयशी ठरले. कदाचित नगरसेवकाच्या प्रचारसभेतही पाच-पन्नास हजारांसाठी हात हलवायला उभे राहणारे मराठी कलावंत मंत्री कसे होतील, हे जनतेला आधीच कळत असेल.

कॉलीवूडच्या महिम्याबद्दल आणि कलावंतांच्या साध्या जीवनशैलीबद्दल बोलताना सयाजी शिंदे यांनी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, रजनीकांतची सुरुवात तेलुगु सिनेमातून झाली. आणि तामीळमध्ये जाऊन तो सुपरस्टार झाला. चिरंजीवीची सुरुवात तामीळमधून झाली आणि तो तेलुगुमध्ये सुपरस्टार झाला. हे दोघे जवळचे मित्र. एकदा स्वित्झर्लंडला शूटिंग चालू होते, रजनीकांतच्या सिनेमाचे. डोंगरावर. तिथे युनिटमधले लोक छोटीशी वाट खोदत होते, शूटिंगसाठी. नेमका चिरंजीवी कुटुंबांसह तिथे फिरायला आला होता. तो सहज म्हणून रजनीकांतला भेटायला आला. रजनीकांत त्याला गमतीत म्हणाला, नुसता बसू नको, थोडे कामही कर आमच्यासोबत. आणि चिरंजीवी नावाचा सुपरस्टार चक्क तिथे हातात कुदळ घेऊन रस्ता खोदायला लागलासुद्धा. अशी ही उत्तुंग प्रतिमेची, पण साध्यासुध्या जीवनशैलीचे अनुकरण करणारी कलावंत मंडळी. सामान्य प्रेक्षकांच्या भावविश्वाचा सहज ताबा घेणारी. त्यांना बॉक्स ऑफिसचे आकडे पाठ नसतात. त्यांच्या दृष्टीने पडद्याबाहेच्या नटांमधली माणुसकी महत्त्वाची असते. त्यामुळे कमल हासनच्या मेकअपमधल्या प्रयोगापेक्षा रजनीकांतने किती जणांना मुलीच्या लग्नासाठी मदत केली, याची दक्षिणेत जास्त चर्चा असते. आणि आपला सिनेमा पडला म्हणून वितरकांचे पैसे परत करणा-या, कायम जमिनीवर राहणा-या रजनीमुळेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी स्वत:चे वेगळेपण राखून असते आणि हाच कॉलीवूडचा खराखुरा महिमा असतो...