Home »Magazine »Rasik» Kamlesh Walavalkar Writes About Arun Sadhu

कलात्‍मक कथायात्रा

दिवंगत अरुण साधू यांचे साहित्य प्रांतात कादंबरीकार म्हणून जितके हिरिरीने मूल्यमापन झाले, तितकी सर्वंकष त्यांच्या कथालेख

कमलेश वालावलकर | Oct 01, 2017, 00:14 AM IST

दिवंगत अरुण साधू यांचे साहित्य प्रांतात कादंबरीकार म्हणून जितके हिरिरीने मूल्यमापन झाले, तितकी सर्वंकष त्यांच्या कथालेखनाची दखल घेतली गेली नाही. वास्तविक पाहता साधूंनी ज्या दर्जाचे कथालेखन केले, तो दर्जा आणि ती उंची मराठीत फार कमी लेखकांना गाठता आली...
का दंबरीकार म्हणून प्रामुख्याने सर्वांना माहीत असणाऱ्या अरुण साधूंनी केवळ कथा लिहिल्या असत्या, तरीही मराठी साहित्यावर त्यांचा तेवढाच ठसा उमटला असता. मराठीमध्ये एवढ्या उंचीचे कथालेखन फार कमी लेखकांनी केले असावे. मात्र, त्यांच्या कथांविषयी फारशी चर्चा-चिकित्सा झालेली नाही. साधूंचं ‘लो-प्रोफाइल’ व्यक्तिमत्त्व, अतिनम्र स्वभाव आणि ‘कादंबरीकार’ म्हणून झालेली ख्याती यामुळे कदाचित ‘कथाकार’ साधू झाकोळले गेले असावेत.
एक मात्र खरे, आयुष्याला भिडणे हे साहित्याचे प्रयोजन असेल, तर साधूंच्या कथांनी ते नक्कीच केले आहे. आपल्याला जगण्याचा अर्थ लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे, किंवा आपण समृद्ध होत आहोत, असे वाचकाला वाटणे हे कोणत्याही श्रेष्ठ साहित्यकृतीचे निदर्शन असते. अर्थात ते केवळ लेखकावर अवलंबून नसते. वाचक हा साहित्यव्यवहारात महत्त्वाचा घटक असतो. अशा वाचकांवरही ते अवलंबून असते. साधूंच्या कथा वाचताना, आपण समृद्ध होत आहोत, असे या वाचकाला वाटत असते.
साधूंच्या कथाविषयांची विविधता अचंबित करणारी आहे. समाजकारण, राजकारण, विविध रूढी-परंपरा, स्त्री-पुरुष संबंध, मूल्यव्यवस्था या आणि मानवी जीवनाशी संबंधित अशा कित्येक (बहुतेक सर्वच) मूलभूत गोष्टींचा वेध त्यांनी कथांमधून घेतलेला दिसतो. ‘बिनपावसाचा दिवस’ या संग्रहातील ‘दंगा’ या कथेतली दंगल चार वर्षांचा हर्षद आणि पाच वर्षांची झुबेदा यांच्या मोटार-मोटार खेळण्याचं निमित्त होऊन पेटते. ही कथा दंगलीतलं वैयर्थ दर्शवतानाच कोणत्याही समाजात हरघडी, हरक्षण अस्तित्वात असणाऱ्या विविध प्रवाह-अंत:प्रवाहांचा, सुप्तावस्थेत कारण-विनाकारण खदखदणाऱ्या असंतोषाचा आणि तर्कातील समूहमनाचा वेध घेते. तर ‘पराभव’, ‘गहन’, ‘गोष्ट नसलेली गोष्ट’ या कथा स्त्री-पुरुषांमधील आदिम प्रेमभावना आणि लैंगिक संबंध यांचं चित्रण करतात. स्त्री-पुरुष संबंधाविषयी कोणत्याही प्रकारचे ठाम तार्किक निष्कर्ष काढता येणं शक्य नाही, हे या कथांमधील समान सूत्र. ‘पराभव’ या कथेला अजून एक तार्किक-आध्यात्मिक परिमाण आहे. तर ‘गोष्ट नसलेली गोष्ट’ या कथेला अंत:प्रेरणा आणि आत्मनिष्ठा यांचे पदर आहेत.
साधूंच्या ‘बेचका’सारख्या कथेतून आयुष्याच्या स्थितिगतीचे जे दर्शन घडते, त्यातील विराटतेने वाचक चकित होतो. मानवी संस्कृतीच्या प्रारंभापासून ते आजपर्यंत आणि कदाचित अंतापर्यंत अशा प्रवासाची दिशा त्यातून सूचित होते. ‘बेचका’मधील बहुतांश कथा कष्टकरी माणसांच्या जीवनाभोवती केंद्रित झाल्या आहेत. तर ‘मुक्ती’मधील कथांच्या केंद्रस्थानी आहे जीवनाला ताठ कण्याने, जिद्दीने सामोरी जाणारी आधुनिक स्त्री. साधूंच्या कथांना वेगवेगळे विषय मिळतात. याचे कारण असे विविधांगी जग त्यांनी पाहिले आहे. त्यामुळे त्यांच्या कथांमधून समाजाच्या अंत:प्रवाहांचे दर्शन घडते. माणसाचा शोध घेत ते मुळापर्यंत जाऊन पोहोचतात. किंबहुना साधूंच्या लेखनाचे तेच प्रयोजन असावे. ‘बिनपावसाचा दिवस’ ही त्यांची पायरिक्षा चालवणाऱ्यांवरची कथा. यामध्ये साधूंची कष्टकरी वर्गाबद्दलची आस्था प्रकट होते. याचबरोबर जीवनाविषयी सकारात्मक दृष्टिकोन, मानवी मूल्यात्मकतेवर प्रखर श्रद्धा, माणसाच्या चांगुलपणावर विश्वास, तर्ककठोर आशावाद हा साधूंच्या एकूणच लिखाणाच्या केंद्रस्थानी आहे. याच कथासंग्रहातील ‘भान’ ही कथा तर अफलातून आहे. आपल्या कुटुंबाच्या सुरक्षित कोशातून नोकरीसाठी बाहेर पडलेल्या, मध्यमवर्गीय ब्राह्मण संस्कृतीत वाढलेल्या भाबड्या शरदचे परिवर्तन हा या कथेचा जर्म. या छोट्या कथेतून दुनियादारीचा जो आलेख व्यक्त होतो, तो केवळ अप्रतिम आहे. जगप्रसिद्ध इंग्रजी साहित्यिक कोलरीज यांनी उत्तम साहित्यकृती निर्माण करण्यासाठी लेखकाला कोणकोणते विषय अवगत असावयास हवेत यांची एक भलीमोठी सर्वसमावेशक यादी दिली आहे. या यादीतून एकही विषय सुटलेला नाही. काही विषय तर कोलरीजनं आपली तरल कल्पनाशक्ती वापरून निर्माण केले आहेत की काय, असं वाटावं असे आहेत. ‘भान’ ही कथा वाचताना साधूंनी हे सर्व विषय खरोखरच आत्मसात केले आहेत की काय, अशी कौतुकभरली शंका येत राहते.
राजकारण आणि राजकारणातल्या विविध पातळ्यांवर सक्रिय असणाऱ्या व्यक्ती हा साधूंच्या विशेष जिव्हाळ्याचा विषय. हे जग त्यांनी जवळून पाहिल्यामुळे असेल कदाचित, पण राजकीय विश्वाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन मूलभूतपणे निराळा आहे. राजकारण, त्यातले छोटे-मोठे नेते, पुढारी, मध्यस्थ, जॉकी, पंटर्स यांचं विलक्षण प्रभावी आणि चित्रमय वर्णन ते त्यांच्या कथांमधून करतात. सर्वसामान्य पांढरपेशा मध्यमवर्गीयांमध्ये राजकारण आणि राजकीय नेत्यांविषयी असणाऱ्या तुच्छतेचा लवलेशही त्यांच्या कथांत उमटत नाही. उलट राजकीय नेत्यांचे कर्तृत्व, कर्तबगारी; त्यांचे विधायक कार्य आणि दूरदृष्टी याविषयी डोळस आदर त्यांच्या लिखाणातून व्यक्त होतो. या जगाशी संबंधित ‘उभा’, ‘निर्णय’, ‘संभ्रम’ अशा कथा म्हणूनच अत्यंत प्रत्ययकारी झाल्या आहेत. ‘जादूच्या कांडीची कहाणी’, ही साधारण याच पठडीतली, पण थोडी निराळी परिमाणं असलेली कथा आहे.
साधूंनी लिहिलेल्या ‘आपल्यापेक्षा खूप खूप...’ या कथेत समकालीन भारताचे चित्रण येते. ‘वर्क-कल्चर’चा अभाव असलेल्या देशात कार्यक्षम व्यक्तीची होणारी कुचंबणा, तिला येणारे वैफल्य हा या कथेचा विषय. ‘आत्मवंदना’, ‘फसवणूक’, ‘वेदनेची दलाली’ या कथांत मानवी प्रवृत्तींचे चित्रण आहे, तर ‘सनसनाटी’ मधून लेखकाचा दृष्टिकोन प्रतीत होतो, भारतातील कार्यालयीन संस्कृतीचे चित्र ‘क्रिकेट’सारख्या कथांतून उमटले आहे. हितसंबंधांच्या जपणुकीसाठी सुरू असलेले अखंड वादविवाद आणि नोकरशाहीची विविध संकुचित रूपे त्यातून स्पष्ट होतात. घरकाम करणारी मोलकरीण हे आता प्रत्येक मध्यमवर्गीय घरातील दैनंदिन वास्तव आहे. ‘लक्ष्मीची निष्ठाविहीन सून’ या कथेमधून या विषयाचे जे कंगोरे दिसतात, त्यातून महानगरी वास्तवापासून ते दोन पिढ्यांमधील बदलणाऱ्या मूल्यांपर्यंतचे अनेककेंद्री अनुभव एका केंद्राच्या माध्यमातून समोर येतात. मुख्य म्हणजे, व्यक्तिरेखांना काळ्या किंवा पांढऱ्या रंगात साधू रंगवत नाहीत. ‘मुक्ती’सारख्या कथेमधून आयुष्याला सामोऱ्या जाणाऱ्या, अपार मानसिक क्षमता असणाऱ्या जिद्दी बायका दिसतात. पारंपरिक पुरुषप्रधान व्यवस्थेमुळे सत्ता गाजविण्याचा प्रयत्न करू पाहणारे पुरुष प्रत्यक्षात स्त्रीवरच कसे अवलंबून असतात हेही यात समजते.
शैलीचा विचार करायचा, तर साधूंच्या कथा त्या अंगानेही वाचनीय आहेत. प्रारंभापासून ते समारोपापर्यंत या कथा तेवढ्याच उत्कटपणे आपल्यासमोर येतात. बांधेसूद कथा हा तंत्राचाही भाग असला, तरी त्या दृष्टीनेही त्या यशस्वी ठरतात. वाचकाची ओढ संपू नये अशा पद्धतीने त्या प्रवाहीपणे फुलत राहतात. अर्थात, हे यश प्रामुख्याने आशयाचेच आहे आणि भाषेचेही. साधूंच्या कथांमधील बीज जेवढे ताकदीचे असते, तेवढीच समर्थ भाषा ते वापरतात. मुख्य म्हणजे ती भाषा पुस्तकातील नव्हे तर माणसांची भाषा असते. ‘माणूस उडतो त्याची गोष्ट’, ‘बिनपावसाचा दिवस’, ‘मुक्ती’, ‘मंत्रजागर’, ‘बेचका’, ‘ग्लानिर्भवति भारत...’ हे साधूंचे कथासंग्रह. या संग्रहांच्या आणि कथांच्या शीर्षकांपासूनच त्यातील वेगळेपण लक्षात येत जाते. साधूंनी जेवढे ‘जग’ पाहिले आहे, तेवढे फार कमी मराठी लेखकांनी पाहिले असावे. साधूंएवढ्या स्वच्छ नजरेने तर फारच कमी लेखकांनी. त्यामुळे साधू मानवी आयुष्याला आपल्या कवेत घेऊ शकतात. मुख्य म्हणजे, अगोदर म्हटल्याप्रमाणे साधू कोणासोबतही नसतात. ते असतात फक्त काळाबरोबर. त्यामुळे त्यांचे लेखन जुने वा कालबाह्य होत नाही. वर्तमानाच्या संदर्भात सनातन प्रश्नांचा वेध घेणाऱ्या साधूंच्या कथा म्हणूनच अशी उंची गाठू शकतात.
("ललित' फेब्रुवारी २००७ मधील लेखाचा संपादित अंश)
- कमलेश वालावलकर, kamleshw70@gmail.com

Next Article

Recommended