आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्राचा कानडी आयाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटक हे आपले शेजारी राज्य. सतत वादग्रस्त ठरलेले. साहित्य, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात उभय राज्यांची देवाणघेवाण अगदी पूर्वापार काळापासून चालत आलेली. त्यातही महाराष्ट्र आणि मुंबईत सर्व देशातून सतत लोक येत असतात. ही प्रथा थेट स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आली आहे. याची कारणेदेखील तशीच आहेत. आज मोठ्या अभिमानाने सांगण्यात येते, ‘महाराष्ट्र राज्य पुरोगामी आहे.’ हे पुरोगामित्व ब्रिटिश काळापासून चालत आले आहे. इतिहासाच्या तपशिलात फारसे न अडकता असे म्हणता येईल की, याचमुळे सर्व देशातून माणसे इथे येत राहिली आहेत. अगदी राज्य निर्मितीच्या पूर्वीपासून!


ब्रिटिशांनी त्यांच्या प्रशासकीय सोयीसाठी देशाची विभागणी केली होती. त्यातील एक ‘मुंबई प्रांत’. या मुंबई प्रांतामध्ये आजचा कर्नाटक, गुजरात व मध्य प्रदेशचा काही भाग होता. कर्नाटकच्या सागरी किनारपट्टीचा भाग म्हणजे आज कोकण रेल्वे ज्या मार्गाने प्रवास करते, तो मंगलोरपर्यंतचा भाग. मुंबईशी संलग्न असल्यामुळे या पट्ट्यातील लोक अधिक प्रमाणात मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात दिसतात. कालांतराने भाषिक प्रांतवार रचनेनंतर हीच गोष्ट काहींना खटकली. पण या नंतरच्या घडामोडी आहेत. मुंबईबद्दल आज आहे तसेच आकर्षण त्याही वेळी सर्वांना वाटत होते. आज फक्त कमाईचा विचार असतो, पण त्या काळी म्हणजे 1940च्या दशकात वेगळेच आकर्षण होते. जबरदस्त ओढ होती. दांडगी इच्छाशक्ती होती. आणि ते आकर्षण होते ‘स्वातंत्र्य चळवळीचे!’ मुंबईतील तप्त राजकीय वातावरणात आपला सहभाग असावा, असे देशभरच्या तरुणांना वाटत होते. मुंबईत तमाम राष्ट्रीय नेत्यांची सतत जा-ये चालत असे. महात्मा गांधी, पं. नेहरूंपासून सर्वच नेते चौपाटीच्या सभेत हजेरी लावत. लोकमान्य टिळकांची सिंहगर्जना भारून टाकणारी होती. मुंबईतील या घडामोडी यथावकाश देशाच्या कानाकोप-यात पोहोचत आणि धगधगत्या तरुण रक्ताला आव्हान देत. कर्नाटक याला अपवाद नव्हता. पण सर्वांनाच असे स्थलांतराचे धाडस परवडणारे नव्हते.


मुंबई प्रांत मोठा होता. आजच्या महाराष्ट्राचे अनेक जिल्हे त्या वेळी मुंबई प्रांतात मोडत होते. कर्नाटकच्याही भाषिक सीमारेषा स्पष्ट नसल्याने निव्वळ शेतीच्या आधारे हा भाग अधोरेखित करण्यात आला होता. त्यामुळे प्रत्यक्ष मुंबई प्रांतात आसपासच्या प्रदेशातून मोठी ये-जा होती.
निमित्त होते शेतमालाची व्यापारपेठ. आजच्या महाराष्ट्रातील ठिकठिकाणी अशी व्यापारी केंद्रे होती. एक कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात व्यापाराच्या निमित्ताने कन्नड भाषिक, तेलुगू भाषिक येऊन स्थायिक झाले होते आणि इतिहास तर असे सांगतो की, महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील अनेक शहरांचा उदय याच भाषिकांमुळे झाला आहे.


यात प्रामुख्याने नाव घ्यावेसे वाटते ते सोलापूरचे! मुंबई-सोलापूर असा प्रवास करणारी सिद्धेश्वर एक्स्प्रेस ज्याच्या नावाने चालवण्यात येते ते सिद्धेश्वर म्हणजे कानडी दैवत. पंढरीचा विठोबा हादेखील कानडी अवतार मानला जातो. त्यामुळे निव्वळ व्यापाराच्याच हेतूने स्थलांतर होते, असेही नाही. ही भारतीयत्वाची सांस्कृतिक परंपरादेखील आहे. सोलापूरची निर्मिती 12व्या शतकातील. आजच्या कर्नाटकातील वीरशैव लिंगायतांनी वसवलेले हे एक व्यापारी केंद्र. व्यापारी केंद्राची भरभराट सुरू झाली की सांस्कृतिक अंगानेदेखील शहरे विकसित होतात आणि कलांचा विस्तार होतो.
सोलापुरात केवळ कर्नाटकी किंवा कानडीनेच आपला प्रभाव दाखवला असे नाही, तर तेलुगू भाषिक पद्मशाली समाजदेखील तेथे स्थिरावला. मूळचा हा समाज विणकरांचा. सोलापूरमध्ये हातमाग उद्योग बहरला तो याच्याचमुळे, असेही म्हणायला हरकत नाही. काँग्रेसचे येथील पहिले खासदार धर्माण्णा शार्दूल हेदेखील याच समाजाचे. आज सोलापूर दप्तरात याचे सगळे दाखले सापडतात.


त्यामुळे सोलापूर परिसरातील अनेक गावांत लिंगायत समाज स्थिरावलेला दिसतो. अगदी अक्कलकोट मंगळवेढ्यापर्यंत! हीच मंडळी पुढे महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पसरली. काहींनी तर थेट पश्चिम महाराष्ट्र गाठला. या सगळ्या धाग्यादो-याचा नीट तपशीलवार अभ्यास करायचा म्हटले तर एक मोठा ग्रंथराज तयार होऊ शकतो.
उडुपीजवळच्या एका छोट्याशा गावातील एक्कार नायकने जशी थेट मुंबई गाठली, तसेच इतरही अनेक ठिकाणच्या मंडळींनी मुंबई प्रांत गाठला. त्या वेळी आजच्यासारखी दळणवळणाची साधने नव्हती. त्यामुळे मजल दरमजल करीत माणसे मुक्कामी जात असत. कामानिमित्त बेळगावमध्ये चार वर्षे घालवताना कानडीच्या प्रसाराचा थोडासा अंदाज आला. बेळगावजवळील सौधत्ती हेही तसे प्रसिद्ध स्थान. यल्लम्मा देवीमुळे याला अतोनात प्रसिद्धी मिळाली. देवीला मुली वाहण्याच्या प्रथेमुळे खरे तर हे स्थान प्रसिद्ध पावले. पण हा भाग क्षणभर बाजूला सारला तर एक गोष्ट स्पष्ट होते की, सांस्कृतिक पगडा भारतीय समाजावर कसा नि किती आहे.


यल्लम्मा हे रेणुकेचे स्थान. परशुराम कथा ज्यांना ठाऊक आहे, त्यांना नव्याने ही कथा सांगण्याची गरज नाही. पण याचे महत्त्व एवढे आहे की संपूर्ण महाराष्ट्रातून आणि कर्नाटक व आंध्र प्रदेशातून यल्लम्माच्या जत्रेला माणसे येतात. प्राचीन काळी जत्रेला आलेली सगळीच माणसे परत जात नसत. अटकेपार झेंडा लावणा-या पेशव्यांच्या सैन्यातील अनेक सेनानी ठिकठिकाणी स्थायिक झालेले दिसतात. त्याचप्रमाणे मुंबई प्रांतात सतत माणसांचे स्थलांतर होत असे. त्याला कोणत्याही भाषिक सीमा नव्हत्या!


भाषावार प्रांतरचनेनंतरच्या महाराष्ट्राच्या सीमारेषा तपासल्या, तर शेजारी राज्यातील भाषिकांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून येते. आज महाराष्ट्रातील अनेक मोठे उद्योजकदेखील ब्रिटिशांच्या ‘मुंबई प्रांता’मधील आहेत, असे लक्षात येते. समाजदान हे अशा पद्धतीने होत असते. ज्याला आधुनिक मराठीमध्ये सामाजिक अभिसरण असेही म्हणतात.
कला, संस्कृती आणि व्यापार यांच्या साहाय्याने माणसा-माणसातील दैनंदिन व्यवहार वाढतात. संपन्न होतात आणि हा एकसंध समाज विविध पातळ्यांवर विकासाच्या गुढ्या-तोरणे उभारतो. मंगळुरूजवळील एका छोट्याशा गावातून आलेल्या एक्कार नायकची कथा यापेक्षा वेगळी नाही. त्याने आपल्याबरोबर शिदोरी म्हणून त्याच्या पूर्वजांनी दिलेले रीतीरिवाजाचे संस्कार आणले होते. हीच गोष्ट आज थेट युरोप आणि अमेरिका गाठणारा भारतीय समाज करीत आहे आणि त्याच्याच जोरावर महाराष्ट्र फुलला, बहरला...


(क्रमश:)