आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापूरचा 163 वर्षांचा सांस्कृतिक मानबिंदू... कनवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रंथालय हे त्या त्या गावातील, शहरातील सांस्कृतिक केंद्र असते. एक ग्रंथालय आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर त्या शहराच्या सांस्कृतिक संपन्नतेत आणखी भर घालत असते. केवळ पुस्तके देणे आणि घेणे यापलीकडे जाऊन जेव्हा ग्रंथालये काम करू लागतात तेव्हा ती त्या त्या शहराची प्रमुख ओळख होतात. कोल्हापूरमधील करवीर वाचन मंदिर ऊर्फ कनवा हे त्यापैकीच एक.


ब्रिटिशांकडून प्रारंभ, देखणी ऐतिहासिक इमारत :
15 जून 1850 तत्कालीन पॉलिटिकल सुपरिटेंडेंट कर्नल एच. एल. अ‍ॅडरसन यांनी येथील रविवार वाड्यात सार्वजनिक सभा बोलावली आणि वाचनालय सुरू करण्याचा मानस व्यक्त केला. सरदार आणि श्रीमंत नागरिकांनी जागीच 5000 रुपये जमा केले आणि 17 सभासदांच्या पाठबळावर 442 ग्रंथ असलेली कोल्हापूर नेटिव्ह लायब्ररी सुरू झाली. 1867 मध्ये युरोपियन लोकांनी आपली स्वतंत्र लायब्ररी काढल्यानंतर स्थानिकांनी या वाचनालयाचा कारभार पाहण्यास सुरुवात केली. 1881 मध्ये 27 हजार रुपये खर्चून बांधलेल्या नव्या इमारतीत स्थलांतर झाले आणि 1934 पासून या ग्रंथालयाचे नामकरण करवीर नगर वाचन मंदिर असे झाले.


ऐतिहासिक अशा देखण्या इमारतीत असलेले हे वाचनालय गेल्या दहा वर्षांपासून आधुनिकतेची कास धरत आपली प्रगती करत आहे. दहा वर्षांपासून ओपॅक म्हणजेच ऑनलाइन पब्लिक अ‍ॅक्सेस कॅटॅगिरी सिस्टिमद्वारे वाचक येथे पुस्तके शोधतात. ग्रंथांची देवघेवही संपूर्णपणे संगणकाच्या माध्यमातून होते. 1867 पासूनचे मराठी, इंग्रजी व मोडी
अहवाल व दस्तऐवज येथे स्कॅनिग करून ठेवण्यात आले आहेत. 1892 मध्ये याच वास्तूत स्वामी विवेकानंदांचे व्याख्यान झाले होते.


व्याख्याने आणि नियमित उपक्रम:
कोल्हापुरातील अनेक व्याख्याने येथे नियमितपणे होत असली तरी वाचनालयाचे स्वत:ची वि. स. खांडेकर व्याख्यानमाला 1981 पासून सुरू केली आहे. केवळ 50 रुपये महिन्याला भरून विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची सोय करण्यात आली आहे. आतापर्यंत येथे अभ्यास करणा-या 12 जणांनी एमपीएससीच्या परीक्षेत यश मिळवले आहे. विविध ग्रंथप्रदर्शने, लेखकांच्या जयंत्या, स्मृतिदिन यासारखे नियमित उपक्रमही संस्थेच्या वतीने राबवण्यात येतात. महाराष्‍ट्रातील बहुतांशी दैनिके वाचनालयाच्या मुक्तद्वार विभागामध्ये ठेवण्यात आली असतात. रोज सरासरी 900 वाचक या दैनिकांचे वाचन करतात. डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात कनवाने विविध पातळ्यांवर प्रगती साधली आहे. सध्या राजाभाऊ जोशी अध्यक्ष, प्रा. मंदा कदम उपाध्यक्षा म्हणून काम पाहत आहेत.
4143 एकूण सभासद
01 लाख 14 हजार 92 ग्रंथसंख्या


अंधासाठीही वाचन सुविधा
अंधासाठीही वाचन सुविधा करणारे करवीर नगर वाचनालय हे एक आगळे आणि वेगळे ठरले आहे. केवळ मासिक 5 रुपयांमध्ये अंधांसाठी येथे बे्रल लिपीतील पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यासाठी स्वतंत्र कक्ष व तशी यंत्रणाही उपलब्ध करून देण्यात आली आहे