आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिरव्या मिरचीचा ठसका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिरव्यागार मिरच्या आल्यात बाजारात. लहान, मोठ्या, बुटक्या, लांबड्या, तिखट, कमी तिखट. त्याचे हे झटपट होणारे पदार्थ. साध्या स्वयंपाकाला चटपटीत करणारे.
ठेचा :

साहित्य : मिरची ५० ग्रॅम, लसूण १ गड्डा, तेल व मीठ.

कृती : प्रथम मिरच्यांची देठे काढावीत. त्या तव्यावर चांगल्या भाजून घ्याव्यात. नंतर तेल ओतून भाजाव्यात. सोललेला लसूण टाकून गॅस बंद करावा. मिक्सरमध्ये, मिरची, लसूण, मीठ टाकून बारीक करावे. मिक्सरपेक्षा खलबत्त्यात चविष्ट होते. जेवताना आवश्यक वाटल्यास वरून थोडे तेल घ्यावे. शेंगादाणा कूटही टाकता येतो.

डाळ मिरची :

साहित्य : भिजवलेली हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी, मिरची ५० ग्रॅम, लसूण, हळद, मीठ, तेल १ चमचा, शेंगाकूट.

कृती : प्रथम प्रत्येक मिरच्यांचे तीन-चार तुकडे करावेत. कढई वा तव्यात ते भाजून, तेल, लसूण पेस्ट व नंतर हळद व भिजवलेली डाळ टाकावी. परतल्यावर अर्धा कप पाणी, मीठ, शेंगाकूट टाकावे व झाकून शिजू द्यावे. पाणी अंगापुरते राहील एवढे शिजवावे. डाळीपेक्षा मिरचीचे प्रमाण जास्त असावे.
तळीव मिरची :
साहित्य : बेसन १ चमचा, हि. मिरची ५० ग्रॅम, मीठ, ओवा, जिरे, तळण्यासाठी तेल, हळद.
कृती : कोरड्या बेसनामध्ये जिरे, ओवा, पूड, हळद, थोडे मीठ टाकून चांगले मिसळावे. मिठाचे दाट पाणी करावे. त्यात मिरच्या उभ्या चिरून भिजवाव्यात व कोरड्या पिठात घोळसून, तळाव्यात.
कोरडी मिरची :
साहित्य : मिरची २५ ग्रॅम, मीठ.
कृती : मिरच्या उभ्या चिराव्यात, आत मीठ भरावे व सरळ गॅसवर वा विस्तवावर, कुठलेही भांडे न ठेवता, सरळ भाजून घ्याव्यात. ज्यांना तेलकट खायचे नाही, अशांनाही या मिरच्या चविष्ट लागतात.

शिजविलेली मिरची :

साहित्य : मिरची ५० ग्रॅम, हळद, मीठ, अर्धे लिंबू.

कृती : मिरच्यांचे प्रत्येक दोन-तीन तुकडे करावेत. उकळत्या पाण्यात हळद-मीठ टाकावे व अर्धे लिंबू पिळावे व त्यात मिरच्यांचे तुकडे शिजवावेत. पाणी पूर्ण आटवावे. वरून तेल, हिंग, मोहरीची फोडणी टाकावी.

मसाला मिरची :

साहित्य : जाड मिरची ५० ग्रॅम, हळद, मीठ, शेंगदाणा कूट २ चमचे, लसूण, हिंग, तेल.
कृती : मिरच्या उभ्या चिराव्यात, शेंगाकूट, मीठ, लसणाची पेस्ट एकत्र करून थोडे ओले करून, मिरच्यांत भरावे. तेल गरम करून, त्यात, हळद, हिंग टाकावे व त्यात मिरच्या परतून घ्याव्यात.

तुकडा मिरची :

साहित्य : हिरवी मिरची ५० ग्रॅम, लसूण १ गड्डा, शेंगाकूट १ चमचा, मीठ, तेल, हळद.
कृती : मिरच्यांचे तुकडे करून घ्यावेत. तव्यावर चांगले भाजल्यावर, तेल व हळद टाकावी. लसणाची पेस्ट टाकावी, नंतर पाणी, मीठ व कूट टाकावा व झाकावे. अंगापुरतेच पाणी राहू द्यावे.

लिंबू- मिरची लोणचे :

साहित्य : मिरची ५० ग्रॅम, लिंबे ६, मोहरी फोडून, मीठ, लोणचे मसाला, तेल.
कृती : प्रथम प्रत्येक मिरचीचे दोन-तीन तुकडे करून घ्यावेत. तीन लिंबे पिळून त्यात मिरच्यांचे तुकडे व मीठ चांगले मिसळावे. तीन लिंबांच्या प्रत्येकी आठ फोडी करून, त्याही मिसळाव्यात. गरम तेलात मोहरी व लोणचे मसाला यांची फोडणी करून, ती थंड झाल्यावर मिसळावी व बरणीत भरावे. आठवड्यानंतर फक्त मिरच्या काढून वापराव्यात व वरचेवर नवीन मिरच्यांचे तुकडे टाकावेत.