आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकासाठी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अतिशिस्त आणि अवाजवी स्वातंत्र्य या दोन्ही टोकाच्या गोष्टींमुळे किशोरवयीन मुलं-मुली बिघडण्याचीच शक्यता अधिक. अशा वेळी काय करायचं? सुजाण पालकत्वाचा सुवर्णमध्य कसा साधायचा? यासारख्या इतर अनेक प्रश्नांची उत्तरं देणारं पुस्तक म्हणजे ‘विधायक शिस्त.’
 
ज्याने  त्याने आपापलं  मूल आपापल्या पद्धतीने वाढवावं म्हणत, समाजाला बेदखल करत आणि बेदम मारून मुलांचे भावशून्य यंत्रमानव बनवण्याच्या काळातून आपण पुढे आलोय हे जरी खरं असलं, तरी विधायक शिस्त मुलांना लागणं गरजेचं आहे, हेही नाकारता येत नाही. कडक शिस्त आणि अति स्वातंत्र्य या दोन्ही गोष्टी मूल वाढवताना हानिकारक ठरतात. मग हा समतोल साधायचा कसा? यासाठीचा उत्तम पर्याय म्हणजे हेमा होनवाड आणि शिरीषा साठे या लेखिकाद्वयींचे ज्योत्स्ना प्रकाशनाचे ‘विधायक शिस्त’ हे पुस्तक वाचणे.
 
पुस्तकाचे मुखपृष्ठच खूप बोलके आहे. अत्यंत सकारात्मक व आनंदी देहबोलीचे मूल खूप साऱ्या संवाद खुणांवर ठामपणे उभे आहे. विधायक शिस्तीचा पाया परिणामकारक संवादात आहे, हा पुस्तकाचा गाभाच आपल्याला मुखपृष्ठ सांगते. डॉ. ऑडलर, डॉ. रुडॉल्फ आणि डॉ. जिन नेल्सन यांच्या थियरीवर पहिले प्रकरण बेतलेले असले तरी प्रत्यक्ष अनुभव, प्रात्याक्षिकांचे आराखडे आणि संभाव्य संवादांमुळे त्या थिअरीज बोजड न रहाता वाचकस्नेही झाल्या आहेत.  मुलांबद्दल वाटणारे प्रेम, आत्मीयता, कौतुक परिणामकारकपणे आपल्या शब्दांतून किंवा कृतीतून मुलांपर्यंत पोहोचतं का, यावर वाचकाला विचार करायला हे पुस्तक सतत भाग पाडतं.
 
पुस्तकांमध्ये आलेले संवाद वाचतानाच वाचकाला आपलाही दृष्टिकोन बदलायला हवाय हे जाणवत राहातं, कारण लेखनात सरळसरळ हे करा व हे करू नका असे दिलेले नसले तरी तटस्थपणे घटना मांडलेल्या आहेत. थोडक्यात वाचकाला हे पुस्तक आरसा दाखविणारे आहे. चुकण्यातच शिकण्याची संधी आहे, हा विचारही या पुस्तकात ठामपणे आला आहे. यासाठी आत्मसन्मान न दुखावता संवादातून मुलांनाच जाणीव कशी होईल, यावर भर दिला गेला आहे. 
 
विधायक शिस्तीत ठामपणालाही महत्त्व आहे यासाठी सुस्पष्ट संवादाचं महत्त्वच अधोरेखित केलं आहे. हे माझ्या हिताचं आहे म्हणून अंतर्गत प्रेरणेने आणि स्वयंशिस्तीत मुलं जर स्वातंत्र्य सक्षमपणे सांभाळायला लागली तरच ती समर्थ होतील.  मुलांना सदैव सुरक्षित ठेवण्याची धडपड, त्यांना सतत मदत करणे, या गोष्टींची मुलांना मदत होत नाही तर याचे दूरगामी परिणाम होऊन मुलं सक्षम बनत नाहीत. त्यापेक्षा स्वतःच्या क्षमता पारखण्याची आणि चुकण्याची संधी मुलांना मिळावी यामुळे आपण केलेल्या कृतीची जबाबदारी स्वीकारायला मुलं शिकतील.
 
हे करताना शिक्षक - पालकांनी मुलांच्या वागण्यामागील कार्यकारणभाव समजून घेणं फारच महत्त्वाचं आहे. चूक-बरोबर असं लेबलिंग न करता परिणामांचा विचार व विश्लेषण करायची सवय मुलांना लागते. आपल्याला समोरच्याने स्वीकारले आहे ही भावना मुलांना प्रोत्साहन देणारी असते, त्यातूनच त्यांचे सामाजिक भानही वाढते. आपल्याला समोरचा महत्त्व देतो आहे म्हटल्यावर मुलांकडूनही प्रेम, आदर, विश्वास मोठ्यांना मिळतो. प्रोत्साहन देतानाही त्याचे शब्दांमुळे स्तुतीत रूपांतर होणार नाही व मुलांचा अहंगंड बळावणार नाही याची काळजी घेताना ‘तू हुशार आहेस’ न म्हणता ‘तू निबंध मुद्देसूद लिहिला आहेस’ म्हटलं तर मुलांच्या कृतीचं कौतुक होईल. यांसारख्या उदाहरणांमुळे वाचकांच्या संकल्पना स्पष्ट होत जातात. 
 
विधायक शिस्तीमुळे घर - शाळा येथील वाद टळतील, त्याची जागा सुसंवाद घेईल. मुलांची स्वप्रतिमा उजळल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढेल, ती जबाबदारी स्वीकारतील, सहकार्य व स्वयंशिस्त त्यांच्या अंगी बाणेल. धीर धरण्याची सवय लागेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या ठायी समस्या सोडवण्याचे कौशल्य विकसित होईल. डॉ. द्रायकुर्सच्या सिद्धांतानुसार  आपण कोणाचे तरी असावे व आपल्या समाजात आपल्याला महत्त्वाचे स्थान असावे या दोन्ही गरजा या सुसंवादाने पूर्ण होतील. सुसंवादाचा पाया म्हणता येईल असं एक तंत्र म्हणजे विधायक अवकाश (Positive Timeout) मूल संवादाच्या पातळीवर नसेल तर काही काळ जाऊ द्यावा, पण स्नेहार्द्र वागणूक तशीच सुरू ठेवावी. हळूहळू मुलालाच संवादाच्या मानसिकतेत नसताना स्वतःला कसं शांत करायचं, याबाबत सक्षम करावं. संवाद जिवंत ठेवणं मात्र अत्यंत महत्त्वाचं आहे. 
 
विधायक शिस्त हे पुस्तक वरकरणी बालमानसशास्त्र, संगोपनशास्त्र किंवा शैक्षणिक समुपदेशनाचे वाटले तरी या पुस्तकात वर्तनाचे नियम व स्वयंसक्षमीकरणाचे फार उत्तम व आत्मसात करायला सोपे उपाय सुचविले आहेत. श्यामला वनारसे या अनेक दशकं मुलांमध्ये रमणाऱ्या, वत्सल आणि शिक्षण तज्ज्ञ व्यक्तीची प्रस्तावनाही पुस्तकाएवढीच वाचनीय आहे हे विशेष नमूद करावंसं वाटतं. शिक्षक आणि पालकच नव्हे तर कोणत्याही कारणामुळे मुलांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीने वाचावं, असं हे पुस्तक आहे. 
 
 
पुस्तकाचे नाव : विधायक शिस्त 
लेखिका : हेमा होनवाड / शिरीषा साठे
प्रकाशक : ज्योत्स्ना प्रकाशन
पृष्ठ संख्या : १००
मूल्य : शंभर रुपये 
 
- कांचन जोशी, मुंबई
kanchanpjoshi@yahoo.com 
बातम्या आणखी आहेत...