आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kannad Marathi Dictionary Translation, Sharan Khand

कन्नड-मराठी शब्दकोश अनुवाद, शरण खंड, भीमेचे पाणी पुस्तके लवकरच

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर विद्यापीठाचे पहिले माजी कुलगुरू प्रा. डॉ. इरेश स्वामी यांचे शरण व बसवसाहित्य यासह हिंदी साहित्य, मराठीतील महत्त्वाची पुस्तके पाहता कन्नड व मराठी यांचे साहित्यिक अनुबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने त्यांचे चालू असलेले लेखन दखल घेण्याजोगे आहे.


सोलापूर विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू आणि मराठीसह हिंदी, कन्नड साहित्यातही मोठी साहित्यसेवा असलेले सोलापूरचे प्रा. डॉ. इरेश स्वामी कन्नड आणि मराठी साहित्याचा अनुबंध वाढला पाहिजे, असे जेव्हा म्हणतात तेव्हा त्यांच्या व्यापक आणि अभ्यासू दृष्टिकोनाचा प्रत्यय येतो. हिंदी व्याख्याता म्हणून त्यांचा सुमारे 35 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. हिंदी समीक्षात्मक ग्रंथ, डझनभर पुस्तकांचे संपादन, मराठीत पंधरावर पुस्तके, सिद्धरामेश्वर चरित्र, अनुवादित पुस्तके यासह पीएचडीसाठी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ते करत आहेत. डॉ. इरेश स्वामी यांचा आध्यात्मिक, कन्नडमधील शरण व दास साहित्याचा व्यासंग सर्वश्रुत आहे.


आता अक्कमहादेवींची वचने, हिंदीतील कवी बिहारी यांचे दोहे, धारवाड विद्यापीठाने कर्नाटकात होऊन गेलेल्या शरण साहित्याच्या आठ खंडांच्या अनुवादाची दिलेली जबाबदारी,‘भीमेचे पाणी’ हे आत्मचरित्र, पुण्याचे प्रा.अविनाश बिनीवाले यांच्या जर्मन-मराठी-कन्नड शब्दकोशासाठी योगदान असे लेखन पुढील काळात प्रसिद्ध होणार आहे. वरील पुस्तकांपैकी कवी बिहारी यांच्या दोह्यांमध्ये दोन ओळीतील दोहे हे त्याचे वैशिष्ट्य आहे. यात राधा-कृष्णावरील भक्तीचे तसेच नीतीवचनाचे दोहे असतील. कर्नाटकात आतापर्यंत जे शरण संत होऊन गेले त्यांच्या कन्नड साहित्याचे मराठीत भाषांतर ही नुसती मोठी जबाबदारीच नाही, तर कन्नड आणि मराठी साहित्याचा आध्यात्मिक अनुबंध वाढण्याच्या दृष्टीने मोलाचा ठरणार आहे.


डॉ. स्वामी म्हणाले, ‘माझे लहानपण पंढरपुरात गेले तसेच कॉलेजची दोन वर्षेही तेथेच गेली. त्या अनुषंगाने ‘भीमेचे पाणी’ हे पुस्तक असेल.’ जर्मन भाषेचे पुण्यातील अभ्यासक प्रा. अविनाश बिनीवाले यांच्या जर्मन-मराठी-हिंदी शब्दकोशासाठी डॉ. स्वामी यांचे महत्त्वाचे योगदान आहे. या शब्दकोशातील ए अल्फाबेटची अक्षरे आतापर्यंत झाली आहेत, असे ते म्हणाले. भाषा वेगळी असली तरी भाव व विचार एकच आहेत.


चर्चेच्या ओघात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे चालू असलेले प्रयत्न हा विषयही निघाला. ते म्हणाले, ‘कन्नड व तेलगूला अभिजात भाषेचा दर्जा पूर्वीच मिळाला आहे. मराठीत ज्ञानेश्वरांचे अमृतानुभव, वारकरी संप्रदाय, संत नामदेवांची वचने अगदी शिखांच्या गुरुग्रंथसाहिबातही पोहोचलेली आहेत. केंद्र सरकारने याचा सत्वर विचार करावा. अन्य भाषिक साहित्यिकांचा दुस्वास करू नये.


कन्नड-मराठी आध्यात्मिक अनुबंधही मोठे आहेत. भाऊसाहेब उमदीकर, जंगम महाराज हे गुरुदेव रानडे यांचे गुरू होते. गुरुदेव रानडे यांनी आपल्या ‘पाथवे टू गॉड इन कन्नड लिटरेचर’ या ग्रंथात बरेच महनीय विचार मांडले आहेत. असे ग्रंथ हे दोन्ही भाषांमधील साहित्यिक अनुबंध वाढण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे,’असे ते म्हणाले. मराठी-कन्नड-तेलगू-हिंदी-उर्दू असा एक शब्दकोश तयार करण्याचा त्यांचा विचार आहे. एका शब्दाला एकाच वेळी पाच भाषांमध्ये प्रतिशब्द मिळाला पाहिजे, असे या शब्दकोशाचे नियोजन आहे.