आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गो तारिणी गो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिडाच्या जहाजातून समुद्रमार्गे विश्वप्रदक्षिणेच्या ऐतिहासिक धाडसासाठी सज्ज असलेल्या भारतीय नौदलातल्या युवतींच्या परिक्रमेला लवकरच सुरुवात होते आहे. या साहसी प्रयोगामुळे महिलांच्या सक्षमीकरणास एक नवी दिशा मिळेल. शिवाय पर्यायी ऊर्जा, मेक इन इंडिया आणि समुद्री हवामानविषयक आणि सागरी लाटांची माहिती या सर्वांचा अभ्यास या उपक्रमाद्वारे करता येणार आहे.

महासागरावरील जहाजातून केलेला प्रवास आजसुद्धा अतिशय जोखमीचा मानला जातो. आणि त्यात जर जहाज शिडाचे असेल तर फारच कठीण आणि अवघड असणार यात शंकाच नाही. हवेच्या लहरीनुसार शिडाची दिशा बदलणे आवश्यक असते. पर्वतप्राय लाटांचा सामना करायला लागतो. क्षणोक्षणी बदलते हवामान आणि खाऱ्या पाण्याशी झुंज द्यायला लागते. समुद्रातील प्राणी-पक्ष्यांशी दोन हात करावे लागत असल्याने हा प्रवास जास्तच रोमांचकारी आणि धोक्याचा ठरू शकतो. परंतु या सर्वावर मात करण्यासाठी भारतीय नौदलातील सहा महिला अधिकारी समुद्राच्या लाटांशी झुंज द्यायची तयारी करत आहेत. समुद्रमार्गे विश्वप्रदक्षिणा करण्याचे ऐतिहासिक धाडस करण्यासाठी भारतीय नौदलातील युवती तयार झाल्या असून या जगप्रदक्षिणेचा शुभारंभ आज पाच सप्टेंबर रोजी होत आहे. या शिडाच्या बोटीच्या सफरीला ‘नाविका सागर परिक्रमा’ असे उचित नाव दिले गेले आहे. 

नाविका सागर परिक्रमा हा असा एक उपक्रम आहे ज्यात या महिला अधिकाऱ्यांचा चमू भारतातच तयार झालेल्या आयएनएसव्ही (इंडियन नेव्हल सेलिंग व्हेसल) तारिणीमधून ही प्रदक्षिणा करतील. स्त्रीशक्तीला विशेष महत्त्व देण्याच्या आपल्या धोरणानुसार भारत सरकार हा उपक्रम राबवत आहेच, शिवाय महासागरात भारताच्या शक्तिमान अस्तित्वाची चुणूक दाखवण्यासाठीसुद्धा हे एक माेठे पाऊल असणार आहे.

तारिणीची वैशिष्ट्ये
भारतीय नौदलाकडे असलेली तारिणी ही शिडाची नौका (सेल बोट) खोल समुद्रात दूरवर जाऊ शकते. हॉलंडच्या टोंगा-56 या डिझाइनवर आधारित गोव्याच्या अॅक्वेरियस शिपयार्डमध्ये तिची निर्मिती झाली आहे. यासाठी फायबर ग्लास, अॅल्युमिनियम आणि स्टील या धातूंचा वापर केला गेला आहे. आयएनएसव्ही तारिणी ५५ फूट लांबीची शिडाची नौका आहे आणि त्याचे वजन २३ टन आहे. यामध्ये एक छोटे इंजिनसुद्धा आहे. जेव्हा या नौकेला बंदरातून आत आणायचे असेल किंवा बाहेर काढायचे असेल आणि हवेची दिशा शिडाला मिळू शकत नसेल तेव्हा या इंजिनाचा वापर केला जातो. आतापर्यंत या बोटीने ८००० समुद्री मैलांचा जलप्रवास पूर्ण केला आहे. कठीण परिस्थितीतही मार्गक्रमणा करण्याची शक्ती मिळण्यासाठी तारिणीमध्ये एकंदर सहा शिडे लावली गेली आहेत. अत्याधुनिक सॅटेलाइट यंत्रणेद्वारा तारिणीवरील कर्मचारी जगाच्या कोणत्याही भागातून संपर्क करू शकतात. ३० जानेवारी २०१७ रोजी या जहाजाच्या सर्व चाचण्या पूर्ण केल्या गेल्या. अशीच दुसरी शिडाची नौका ‘म्हदेई’ चालवण्याचा अनुभव याच्या तंत्रज्ञानात खास कामी आला आहे. पंतप्रधानाचा मेक इन इंडिया कार्यक्रम आणि मागच्या वर्षी मार्चमध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे तारिणीच्या निर्मितीला चालना मिळून ही नौका ठरलेल्या कालावधीच्या आधीच पूर्ण झाली आहे. ओडिशातील सुप्रसिद्ध तारातारिणी मंदिराच्या नावावरून या नौकेचे नाव ठेवले गेले आहे. तारिणी या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये दुसऱ्या तीरावर नेऊन पोहोचवणारी नौका असा आहे. 

विश्वप्रदक्षिणेचे टप्पे
नाविका सागर परिक्रमा पाच टप्प्यांत पूर्ण केली जाईल. अन्न पुरवठा, कर्मचाऱ्यांची विश्रांती आणि जरुरी झाल्यास नौकेची दुरुस्ती, डागडुजी याकरता या जगप्रदक्षिणेच्या दरम्यान तारिणी चार बंदरांत थांबेल. या वेळापत्रकानुसार गोव्याहून ५ सप्टेंबर रोजी प्रस्थान, पहिल्या टप्प्यात ३७ दिवसांनंतर ऑस्ट्रेलियामधील फ्रीमँटल या बंदरात पोहोचून १२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबरपर्यंत विश्रांती. त्यानंतर २२ दिवसांच्या प्रवास करून १६ नोव्हेंबर रोजी तारिणी न्यूझीलंडमधील लिटलटन या बंदरात पोहोचेल. तिथून तारिणी फॉकलंड बेटांवर साधारणपणे ३५ दिवसांत पोहोचेल. या बेटांवर पोर्ट स्टॅन्ली येथे ९ जानेवारी २०१८पर्यंत मुक्काम होईल. त्यानंतर चौथ्या टप्प्यात पोर्ट स्टॅन्ली येथून दक्षिण आफ्रिकेतील केप टाउनपर्यंतचा प्रवास साधारण २८ दिवसांत पुरा केला जाईल आणि तेथे ८ फेब्रुवारी २०१८ रोजी तारिणी पोहोचेल. शेवटचा टप्पा केप टाउनपासून २१ फेब्रुवारी २०१८ रोजी सुरू होऊन ४ एप्रिल २०१८ रोजी गोव्यात तिचे पुनरागमन होईल, असा अंदाज आहे. या पूर्ण प्रवासात ही नौका एकंदर २२,३०० सागरी मैल इतका प्रवास २४६ दिवसांत पूर्ण करेल.

या साहसाकरता २० जणींचे अर्ज आले होते, त्यांतून सहा युवतींची निवड करण्यात आली. त्यांमध्ये दोन नौदलात आर्किटेक्ट, दोन हवाई वाहतूक नियंत्रण अधिकारी आहेत तर बाकी दोन नौदलाच्या शिक्षण विभागाशी संबंधित आहेत. नाविका सागर परिक्रमा उपक्रमाचे नेतृत्व उत्तराखंडच्या लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी करत आहेत. वर्तिका जोशी यांनी सर्वप्रथम २०१४मध्ये रियो डी जानीरो ते केप टाउन आणि आयएनएसवी  म्हदेईमधून पोर्ट ब्लेअर - विशाखापट्टण - चेन्नई - कोची असा प्रवास केला आहे. त्यांनी फेब्रुवारी २०१६मध्ये गोवा ते केप टाउन, मे ते जुलै २०१६मध्ये गोवा ते माॅरिशस आणि परत अशी यात्रा केली आहे. आत्ताच डिसेम्बर २०१६मध्ये केप टाउन ते गोवा अशा आयएनएसवी म्हदेईवरच्या प्रवासात त्यांच्याकडे नौकानयन कामाचे प्रमुखपद होते. जुलै २०१७मधील गोवा ते माॅरिशस आणि परत या आयएनएसवी  तारिणीच्या प्रवासाचे प्रमुखपद वर्तिका यांच्याकडेच होते. त्यामुळे त्यांना आता एक अनुभवी सागर नाविका म्हणून ओळखले जाते. याव्यतिरिक्त या परिक्रमेवर जाणाऱ्या पाच अधिकाऱ्यांनी आयएनएसवी म्हदेई आणि तारिणीवर वेगवेगळ्या उपक्रमात भाग घेतला आहे. लेफ्टनंट कमांडर जामवाल हिमाचल प्रदेशातील कुल्लूमधील आहेत. लेफ्टनंट कमांडर स्वाती पी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून आल्या आहेत. लेफ्टनंट ऐश्वर्या बोडापट्टी हैद्राबादच्या  आहेत. मोयरेंग क्वातका सॅथान्ग आणि लेफ्टनंट एस एच विजयादेवी मणिपूरच्या आहेत. लेफ्टनंट पायल गुप्ता ही नौदलातील सर्वात कमी सेवा असलेली नाविका उत्तराखंडमधील आहे.  या सर्व चालक गटाला या समुद्री यात्रेकरता व्यापक प्रशिक्षण दिले गेले आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून या सर्वांनी आयएनएसवी तारिणी आणि म्हदेईवर जवळजवळ २०,००० समुद्री मैल सफर केली आहे, ज्यामध्ये मॉरिशसच्या दोन सफरी (२०१६ आणि २०१७) आणि डिसेम्बर २०१६मध्ये गोवा ते केप टाउन जलप्रवास समाविष्ट आहे. 
 
या नौकेवर सुरुवातीला ६०० लिटर गोडे पाणी नेले जाईल. आणि त्या व्यतिरिक्त खाऱ्या पाण्यापासून पिण्याचे पाणी तयार करण्यासाठी आरओ तंत्रज्ञान असलेले एक यंत्र असेल. सुरक्षा आणि दळणवळणाची विविध साधने आणि उपकरणे या नौकेवर असतील. त्यामुळे जगातील कोणत्याही कोपऱ्यातून संपर्क शक्य होणार आहे. भारतीय नौदल आपल्या विमानातून या नौकेवरून दर दोन आठवड्यांनी हवाई चक्कर मारणार आहे ज्यामुळे भर समुद्रात नौकेवरील सदस्यांचे मनोबल वाढणार आहे.  भारतीय नौदलाच्या अशा साहसी प्रयोगांमुळे महिलांच्या सक्षमीकरणास निश्चितच एक नवी दिशा मिळेल. नारीशक्तीचा एक नवीन झेंडा समुद्रावर फडकणार आहे. या बरोबरच पर्यायी ऊर्जा, मेक इन इंडिया आणि समुद्री हवामान विषयक आणि सागरी लाटांची माहिती या सर्वांचा अभ्यास या उपक्रमाद्वारे होणार आहे. या प्रवासातील चारही ठिकाणे, जेथे ही नौका थांबणार आहे या सर्व गटाला येथील भारतीय वंशाचे लोक, त्या देशांचे नौदल आणि इतर लोकांना भेटण्याची संधी मिळणार आहे. संपूर्ण देश या उपक्रमाला शुभेच्छा देत आहे - गो तारिणी गो!
(अनुवाद : वंदना कुलकर्णी)
 
- कर्नल सारंग थत्ते (सेवानिवृत्त), नवी दिल्ली
sarang.thatte@gmail.com 
बातम्या आणखी आहेत...