आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कथांमुळे संवाद वाढला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सतीश तांबे याला अलीकडेच कथाकार म्हणून बरेच यश मिळाले आहे. आम्ही सर्व मित्र त्याला ‘बाबा’ म्हणतो. समीक्षक विश्राम गुप्ते म्हणतात, त्याच्या कथा जागतिक स्तरावरील अनन्यसाधारण आहेत. सतीश तांबे याच्या लेखनात वाचनाचा कुठलाही परिणाम नाही. तो मोजके पण वेचक वाचतो. त्याने वाचनातून कथेसाठी कोणतीही शैली मिळवलेली किंवा कमावलेली नाही. पण कथालेखन एवढेच त्याचे योगदान नाही. ‘आजचा चार्वाक’ सारखा सर्वांगसुंदर दिवाळी अंक त्याने संपादित केला. यात अरुण खोपकरांपासून ते खुशवंत सिंगापर्यंत अनेक वेगळ्या आणि मराठीत सहजासहजी न लिहिणा लेखकांचे साहित्य प्रसिद्ध केले.
‘चार्वाक’मध्येच सर्वप्रथम प्रभाकर बर्वे यांच्या डायरीतील पाने प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्याचे ‘कोरा कॅन्व्हास’ हे पुस्तक मराठीत आले आणि गाजले. हे संपादन करण्यात हेमंत कर्णिक, गोपाळ आजगावकर हेही सहभागी होते. या सर्व मित्रांनी मिळून ‘अबब हत्ती’सारखा मुलांचा अंक बरीच वर्षे काढला. वेगळी कोडी, वेगळ्या कथा मिळवल्या आणि छापल्या. परळमधल्या एका चाळीतून आणि फोर्टमधल्या छोट्याशा कार्यालयातून त्यांनी हे काम केले.
बाबाचा स्वत:चा लोकसंग्रह उत्तम आहे. श्याम मनोहरपासून सुजित फाटकसारख्या नव्या कवीपर्यंत अनेकांशी त्याची मैत्री आहे. त्याचे समीक्षणस्पष्ट आणि सरळ असते. त्याने अरुण कोलटकरांवर आणि भालचंद्र नेमाडेंवर लिहिलेले लेख याची साक्ष देतात. गट तयार करणे आणि कंपूबाजी करणे यात फरक आहे. अनेक वर्षे चार्वाक गट आदरणीय राहिला, पण त्याचे कंपूत रूपांतर झाले नाही. निवडक लेखक आणि कार्यकर्ते यांच्याबरोबर संवाद करण्याच्या उपक्रमातही त्याचा पुढाकार आहे, ज्यातील 23 जणांच्या चर्चेचा कार्यक्रम मागच्या वर्षी सातातील वेर्णे येथे पार पडला.
बाबामुळेच त्याअगोदरच्या अशा छोट्या गप्पांमध्ये एका वर्षी कमल देसाई आणि अशोक शहाणे सहभागी झाले. गंभीर लेखन लिहायला लावणे, संपादित करणे, त्यासाठी माणसे मिळवणे हे कठीण काम. याचा नेमका परिणाम साहित्य व्यवहारावर काय होतो? चार्वाकने वसंत पळशीकर, मे. पुं. रेगे, नंदा खरे अशा अनेकांचे साहित्य प्रसिद्ध केले. रिचर्ड फेनमिनपासून सेक्सपर्यंत कुठलाही विषय त्यात वर्ज्य नव्हता. पुलंच्या विनोदाची परखड तपासणी करणारा त्यातील लेख कोण विसरेल बरे!
चरितार्थासाठी तो कॉपी रायटिंग करतो. पण ती अभिमानाची गोष्ट आहे असे त्याला वाटत नाही. मी अनेक वर्षांपूर्वी त्याला दाते शब्दकोशाचे आठही खंड मिळवून दिले. गेल्या काही वर्षांत मराठी काही वाचायचे असले तर ते हमखास त्याच्याकडे सापडते. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचा मोठा मित्रपरिवार आणि नेमकेपणे प्रत्येकाचे गुणदोष टिपणे.
त्याच्या कथांना फँटसी, चमत्कृती, स्पिरिच्युअ‍ॅलिटी असे बरेच पैलू आहेत. मुख्य म्हणजे त्या सामाजिक भाष्य करतात, पण श्याम मनोहर पद्धतीने नव्हे. करुणा आणि आस्था हे बाबाच्या व्यक्तिमत्त्वातले दोन्ही गुण त्यात प्रतिबिंबित होतात. घडवणे वगैरे शब्द मोठे झाले, पण आजूबाजूचे अनेक लेखक, कवी कार्यकर्ते यांना त्याच्याशी संवाद करणे आवडते. त्याच्या कथांनी तो संवाद वाढवला आहे.