आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kaumud Paranjape Article About Women Story Bandini

स्त्रीची आत्मकथा:बंदिनी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालिकांच्या विश्वात आपण अनेक मालिका बघितल्या. कधी प्रेमकथा, काही कौटुंबिक, काही गमतीशीर. अशा मालिकांमधून आपले मनोरंजन होते. पण काही मालिका आपल्याला खूप काही शिकवून जातात. नुसतेच मनोरंजन न करता प्रबोधनही करतात. अशीच एक मालिका आज आपण बघणार आहोत. मालिका अर्थातच जुनी आहे. पण त्यातले विषय आजही आपल्या अवतीभवती घडतात. ती आहे बंदिनी.
बंदिनी, स्त्री ही बंदिनी
हृदयी पान्हा नयनी पाणी
जन्मोजन्मीची कहाणी...
शांताराम नांदगावकरांनी लिहिलेल्या या गाण्याला स्वरसाज दिला होता अनुराधा पौडवाल यांनी. एका बाईचा चेहरा आणि त्यासमोर कारागृहातील गज असं समर्पक छायाचित्रण. सामान्य स्त्रीचा जीवनपट शीर्षकगीतातून दाखविला होता. या मालिकेचं वैशिष्ट्य म्हणजे याला एक असं कथानक नव्हतं. छोट्या छोट्या कथा गुंफून ही मालिका तयार केली होती. पण प्रत्येक कथानक मनाचा ठाव घेणारं. बहीण, बायको, आई या प्रत्येक भूमिकेतून जाताना स्त्रीची होणारी धांदल. तिच्या संयमाची, स्त्रीत्वाची लागणारी कसोटी. तिला आपण माता का म्हणतो याची प्रत्येक कथानकातून पटणारी खात्री. या सगळ्या नात्यातला प्रवास दाखवताना कुठेही अतिरंजितपणा नाही, भडकपणा नाही. पण ही सर्व नाती प्रेक्षकांसमोर योग्यरीत्या येतात. आपण स्त्रीला बंदिनी का म्हणायचं, हे प्रत्येक कथानकातून समजतं. छोट्या कथानकातून या स्त्रीचं भावविश्व आपल्यासमोर येतं. स्त्रीवर अत्याचार/मारहाण एवढंच होत नाही तर अनेक कुटुंबांतून स्त्रीची कशी मानसिक कुचंबणा होते, हेही मालिकेतून कळतं. बहीण, आई, बायको ही नाती पार पाडताना तिला स्वत:मधे डोकावायला वेळच मिळत नाही.
कधी सीता कधी होई कुंती, सावित्रीची
दिव्य शक्ती
शकुंतला तूचि होशी, मीरा ही प्रभूची दिवाणी
किती चपखल शब्द आहेत ना. आजही कुंती, सीता, सावित्री ही सगळी रूपं आपल्या या बंदिनीत पाहायला मिळतात. कुंतीला आईपणाची ओळखही दाखविता आली नाही. सीतेला आपलं पावित्र्य सिद्ध करावं लागलं समाजामुळे. सावित्रीला तिची तपश्चर्या पणाला लावावी लागली. शकुंतलेला प्रेमविरह सहन करावा लागला. मीरेलाही देवाची भक्ती केली म्हणून समाजाचा रोष पत्करावा लागला. आज अशा कितीतरी सीता, कुंती, शकुंतला, सावित्री, मीरा आपण अवतीभवती बघतो. तुम्ही म्हणाल, आज कथानक न सांगता हे का बरं. पण आपल्या या मालिकेत हेच होतं. स्त्रीची ही सगळी रूपं छोट्या कथांत दाखवली होती. एक किंवा दोन भागांची कथा. भव्यदिव्य सेट नाहीत, फार पात्रं नाहीत. मोजकाच कपडेपट, तरीही प्रत्येक गोष्ट डोळ्यांत पाणी आणणारी. आशा काळे, अलका कुबल यांसारख्या मातब्बर नायिकांनी आपले अभिनयकौशल्य या मालिकेतून दाखवले. सुरुवात जितकी चांगली तितकाच शेवट परिणामकारक. प्रत्येक भाग प्रेक्षकाला अंतर्मुख करणारा. आपल्यासारख्या अशा अनेक स्त्रिया म्हणजे बंदिनी आहेत याची जाणीव करून देणारा. आजच्या मालिकेतून जरी स्त्रीवर होणार्‍या अन्यायाचं चित्र दाखवत असले तरी खर्‍या बंदिनीच्या जवळ जाणारं वास्तववादी चित्रण म्हणजे बंदिनी मालिका. शेवटी काय,
युगे युगे भावनांचे धागे, जपावया मन तुझे जागे
बंधने ही रेशमाची, सांभाळली स्त्रीच मानिनी
(kaugp@rediffmail.com)