आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Kaumudi Paranjape Article About Marathi Serial Bokya Satbande

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खट्याळ बोक्या सातबंडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आतापर्यंत आपण ज्या ज्या आठवणीतल्या मालिकांबद्दल वाचले, त्या सगळ्या गंभीर विषयांवरच्या होत्या. एखाद्याच्या वाट्याला आलेलं दु:ख वा अपमान, त्यातून सावरून उभं केलेलं विश्व, असं साधारण मालिकांचं स्वरूप. पण तुम्ही म्हणाल, तेव्हा फक्त गंभीर विषयांवरच्याच मालिका होत्या की काय? पण तसं नाही. मुलांच्या विश्वात नेणार्‍या मालिकाही होत्या बरं का. मुलांना आवडणारे विषय, त्यांच्या समस्या, त्यांच्यावर त्यांनीच काढलेले उपाय आणि या सर्वातून मोठ्यांना मिळालेली शिकवण अशाही मालिका होत्या. त्या मालिकांची हाताळणीही सुंदर होती. मालिका लहान मुलांची असली तरी उगाचच केलेले विनोद, शिक्षकांची किंवा एखाद्या व्यक्तिरेखेची टिंगल असे नव्हते. लहान मुलांना शोभतील असे संवाद. आईबाबा खरंच आईबाबा वाटतील अशी वेशभूषा. मध्यमवर्गीय वातावरणाला शोभेल अशी रंगभूषा, हे सगळं होतं बरं का आपल्या आठवणीतल्या या मालिकेत.
‘बोक्या सातबंडे.’ अभिनेता व लेखक दिलीप प्रभावळकरांचा हा मानसपुत्र. अगदी शीर्षकगीतापासून बोक्या किती खट्याळ असेल याची कल्पना येते. मांजरीसारखे कान नाक डोळे मिशा असं सुरुवातीला येणारं कार्टून त्यातूनच सोप्या व चपखल पद्धतीने दाखवलेले ‘अ‍ॅनिमेशन.’ या मालिकेचं वैशिष्ट्य म्हणजे हे अ‍ॅनिमेशन. ते इतकं कलात्मक पद्धतीने दाखवलं होतं की प्रेक्षक गुंतून जायचे. शीर्षकगीताच्या शेवटी आईने ‘बोक्याऽ’ अशी मारलेली हाक मजेशीर होती.
या आपल्या बोक्याचं म्हणजेच चिन्मयानंदचं छान सुखी कुटुंब असतं. आई, बाबा, तो आणि आजी इतकं छोटं. तीन पिढ्या एका छताखाली आल्यावर जी काही धमाल उडते ती यांच्याही घरी उडते. त्याला ‘बोक्या’ अशी हाक मारलेली आजीला चालत नाही. चिन्मयानंद इतकं छान नाव असताना ‘बोक्या’ अशी हाक का, हा तिचा प्रश्न. आई गृहिणी असते. बाबा नोकरी करतात. अपार्टमेंटमधलं घर असलं तरी वातावरण चाळीसारखं. घरच्या बाल्कनीतून रस्त्यावरच्या काकूंना हाक मारावी इतकं मोकळं. आई सर्वांची काळजी घेणारी. तुमच्याआमच्या आईसारखी, साधी साडी, अंबाडा घालणारी. माझ्या बोक्याचं कसं होणार, ही चिंता तिला सतत भेडसावत असते.

आणि आपला हीरो म्हणजे बोक्या, एकदम मस्त कलंदर. शाळा व घर हे बंदिस्त जगणं त्याला पटत नाही. शिकायला शाळेतच का जायचं, असा अतिशय ‘गंभीर’ प्रश्न त्याला पडतो. म्हणून तर शाळेची वेळ होऊनही मुंग्या साखर कशी नेतात हे तो बघत असतो. आजी म्हणते, अंघोळ झाल्यावर देवाला नमस्कार करावा. मग आमचा बोक्या हुशार. अंघोळ करताना साबण लावल्यावर अनायासे डोळे मिटतोच तर तेव्हाच नमस्कार करावा. वेळही वाया जात नाही आणि अगदी मनापासून नमस्कारही केला जातो. बोक्या म्हणजे सोसायटीतला ‘लीडर.’ आपल्या सर्व मित्रांच्या समस्या आपल्या मानणारा, आईची बोलणी आणि बाबांचा मार खाणारा. खरं तर या मालिकेला शेवट असा नव्हताच. प्रत्येक भाग पालकांना अंतर्मुख करायला लावणारा. आपण मुलांकडून इतक्या अपेक्षा ठेवतो पण त्यांच्या मनाचा विचार करतो का, असं वाटायला लावणारा. दिलीप प्रभावळकरांची सुंदर कथा. काहीही आडवळणं न घेता सरळ आपल्या मनाला भिडणारी. विनय आपटे यांचं दिग्दर्शन. फ्लॅटसारख्या छोट्याशा घरातून त्यांनी आपल्यासमोर मोठं विश्व निर्माण केलं. अभिनेत्यांकडून उत्तम काम कसं करून घ्यावं, हे त्यांच्या दिग्दर्शनातून समजतं. सतीश पुळेकरांचे बाबा आणि वंदना गुप्तेंची आई खूपच उत्तम. बाई हो, या त्यांच्या वाक्यात इतका मस्त ठसका होता की ऐकणार्‍याला आपल्या आईचीच आठवण व्हावी. मुलांची मालिका असली तरी खूप छान हाताळणी. सर्वोत्कृष्ट अभिनय, अस्सल संवाद यांमुळे आठवणींच्या कप्प्यात बागडणारी मालिका ‘बोक्या सातबंडे.’

kaugp@rediffmail.com