आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kaumudi Paranjape Article About Old Marathi Serial Salsood

सकस कथा व दमदार अभिनयानं नटलेली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दूरचित्रवाणीचा शोध मागच्या शतकातील महत्त्वाचा शोध म्हणावा लागेल. या छोट्याशा टीव्हीने आपल्या आयुष्यात मोठी जागा व्यापली आहे. दूरचित्रवाणी सुरू झाली तसे त्यावरचे कार्यक्रम, जाहिराती यांचा एक वेगळाच प्रवास सुरू झाला. आता तर अगणित वाहिन्या व त्यांच्यावरच्या असंख्य मालिकांचा भडिमार आपल्यावर होत असतो.
पण आठवणींच्या एका कप्प्यात अजूनही काही जुन्या मालिका आहेत. त्यात सध्याच्या मालिकांप्रमाणे ‘ग्लॅमर’ नव्हतं. अगदी साधीसुधी तुमची-आमची कथा. आतासारखे ‘झूम’ इफेक्ट पण नाही बरं का. लग्न, वाढदिवस, मरण, सणवार या घटनाही आतासारख्या लांबलचक नाही. भारी साड्या, त्यावरचा नकोसा मेकअपपण नाही. कुपीतल्या अत्तरासारखा दरवळ मात्र नक्की आहे. कथानकं आणि त्यातील कलाकारांच्या दमदार अभिनयानं कायम स्मरणात राहिलेल्या.


जुन्या गाण्यांप्रमाणे या मलिकांची गोडी अजून टिकून आहे. मर्यादित एपिसोड्स पण अजूनही संवादासकट लक्षात राहिलेली पात्रं हे त्यांचं खास वैशिष्ट्य. अशाच काही खास मालिकांची मी अधूनमधून तुम्हाला आठवण करून देणार आहे. सुरुवात करूया साळसूद या मालिकेपासून.
काही माणसं चिरकाल स्मरणात राहतात, तशीच ही मालिका. तेव्हाच्या दूरदर्शन म्हणजे आताच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित झालेली ही मराठी मालिका. पात्रांची नावं काळानुरूप धूसर झाली आहेत पण कथानक पक्कं लक्षात राहणारं.
या मालिकेचं मोठं वैशिष्ट्य म्हणजे याचं शीर्षकगीत.
कोण कुणास्तव जगतो मरतो
कोण कुणास्तव सतत कष्टतो
माणुसकीचा गहिवर येतो
ज्याला जेव्हा जिथे सोईचे
जगात नसते कुणी कुणाचे
आताच्या मालिकांसारखी खूप वाद्यं घेऊन गाणं नव्हतं हे, पण शब्द, त्याहीपेक्षा चपखल चाल, त्यावर स्वरसाज हे सगळं इतकं छान जमून आलं होतं की शीर्षकगीतालाच प्रेक्षक खिळला पाहिजे. गाणं संपत नाही तो एका आरामखुर्चीवर बसलेली एका म्हाता-या माणसाची सावली आपल्याशी बोलते. दहा ठिकाणांहून कॅमेरे फिरवून कानठळ्या बसवणारं पार्श्वसंगीत न लावताही तितकाच परिणाम साधणारं हे छायाचित्रण.
खेडेगावातल्या एका वाड्याच्या पार्श्वभूमीवर कथानक सुरू होतं. वाड्यात राहणारे नवराबायको व त्यांची मुलं इतकीच मोजकी पात्रं. त्या नव-याला एक भाऊ असतो. सर्वसाधारण कुटुंबाप्रमाणे त्यांच्यातही भाऊबंदकी असते. वाडा आपल्या नावावर व्हावा या लालसेपोटी हा भार्गवकाका जमेल तेवढे प्रयत्न करतो. भावाचा वाईट हेतू दादाला कधीच कळत नाही. वहिनी हुशार असते. ती सतत दादाला सांगते पण दादाला ते खोटं वाटतं. काहीशी वाईट नजर असणारा हा दुष्ट काका स्वत:च्या बायकोला खूप त्रास देतो. बायको गरीब गाय असते. ती त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करते, पण भार्गव जुमानत नाही. वेळप्रसंगी बायकोला गुरासारखं मारणारा हा माणूस मुलीच्याही प्रेमातही खो घालतो. दर वेळी स्वत:च्या पोटाला चिमटा घेऊन आर्थिक मदत करणारा दादा भावनेच्या भरात वाडाही भार्गवच्या नावावर करतो. आर्थिक चणचणीमुळे काहीशी चिडलेली वहिनी खूप त्रागा करते; पण उपयोग होत नाही. स्वत:चा एक मुलगा गमावलेला दादा मात्र या सगळ्यात तग धरू शकत नाही.
यात एकच आशेचा किरण असतो तो म्हणजे कृष्णा, दादाचा धाकटा मुलगा. लहानपणापासून आपल्या वडिलांचा अनाठायी भोळेपणा, आईचा त्रागा, काकूचा असहायपणा आणि काकाचा नीचपणा बघत मोठा झालेला हा कृष्णा वकील बनतो. काका वाडा मिळवण्यासाठी किती खालच्या थरापर्यंत जातो हे जेव्हा त्याला समजतं तेव्हा तो खूप चिडतो, काकाला जाब विचारायचं ठरवतो. आपल्या पापाची फळं भोगणा-या काकाचे हाल होतात. बायको मरते. ज्या वाड्यासाठी आपण इतक्या खालच्या थराला गेलो त्याच वाड्यात एकाकी असहाय मरण त्याच्या नशिबी येतं. मग कृष्णा आणि आई तो वाडा सोडून जातात.
मोठा फापटपसारा न घेता मोजकी पात्रं, अप्रतिम अभिनय, उत्तम छायाचित्रण आणि या सगळ्यातला साधेपणा याच या मालिकेच्या जमेच्या बाजू. दिलीप कुलकर्णी, स्मिता तळवळकर यांनी रंगवलेले दादावहिनी. नीना कुलकर्णींनी रंगवलेली काकू.
तुषार दळवी्नी साकारलेला कृष्णा आणि सगळ्यात कडी म्हणजे दिलीप प्रभावळकरांचा भार्गवकाका. विसरू म्हणलं तरी न विसरता येणारा अभिनय. ‘अरे कृष्णा’ ही काहीशी थरथरती हाक जेव्हा पडद्यावर ऐकायला मिळते तेव्हा अंगावर काटा उभा राहतो. दात पुढे आलेले, कानांवर केसांचा पुंजका, जाड चष्मा, धोतर पांढरा शर्ट काळी टोपी आणि काहीशी वाकून बोलण्याची ढब यातून दिलीप प्रभावळकरांनी अप्रतिम खलनायक साकारला.
कुठेही भडक मेकअप, भडक कपड्यांचा आधार न घेता निव्वळ अभिनयाच्या जोरावर ही मालिका सुरू होती. मालिकेच्या प्रारंभी आणि शेवटी या भार्गवकाकाचं सावलीच्या रूपातील स्वगत खरच वेगळ्याच जगात नेऊन सोडणारं.
सकस कथा आणि दमदार अभिनयानं नटलेली ही आठवणीतील मालिका ‘साळसूद’.


kaugp@rediffmail.com