आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kaumudi Paranjape Article About ‘Shodhu Kuthe Kinara’ Serial

शोधू कुठे किनारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही व्यक्ती फक्त अभिनयासाठीच जन्माला येतात. सौंदर्याची मोजमापं त्यांना फारशी लागू नसली तरी उत्तम अभिनयापुढे या सर्व गोष्टी फिक्या पडतात. अशीच एक व्यक्ती म्हणजे भक्ती बर्वे. सामान्य चेहरा पण कॅमेर्‍यासमोर उभं राहिलं की अभिनयाची प्रत्येक छटा दिसणार. अभिनय म्हणजे ओक्साबोक्शी रडणं किंवा उगाचच हसणं नाही तर फक्त डोळ्यांमधून तो भाव व्यक्त करता येणं. डोळे बोलणं म्हणजे काय हे त्यांच्या अभिनयातून समजतं. ‘घरकुल’ मालिकेतील त्यांची कर्तव्यदक्ष आजी, ‘ती फुलराणी’मधील अभिनय किंवा ‘जाने भी दो यारो’ या सिनेमातील अभिनय. अप्रतिम अभिनयाची झलक नक्कीच बघायला मिळते.
शोधू कुठे किनारा
व्याकुळ मन हे दाही दिशांनी
करीते तुझा पुकारा
उत्तम शीर्षकगीताने या मालिकेची सुरुवात होते. एका तरुणीची कथा अतिशय चपखलपणे यात मांडली आहे. मोजके पण आशयघन शब्द, सुंदर चाल आणि मोहक आवाज हेच गाण्याचं वैशिष्ट्य. मालिकेत सुरुवातीला एका छोट्याशा खेड्याचं वातावरण दाखवलं आहे. तिथली छोटी घरं, माडबन, स्वच्छ निसर्ग असं उत्तम छायाचित्रण. खेडेगाव म्हटलं की साधी माणसं पाहिजेत. पण भडक मेकअप आणि अंगभर दागिने, कपाळभर कुंकू हवंच असं नाही.

त्या छोट्याशा खेड्यात राहते एक स्वप्नवेडी मुलगी. आपल्याच विश्वात रमणारी. मुक्त बागडणारी, काहीशी खट्याळ अशी ही तरुणी. गावभर भटकणं हा तिचा आवडता छंद. झाडांशी, पानांशी, फुलांशी मनमोकळ्या गप्पा मारणारी एक गोंडस मुलगी. सामान्य मुलींसारखी तिलाही ओढ असते आपल्या स्वप्नातल्या राजकुमाराची. तिला तो मिळतोही. प्रेमाच्या आणाभाका घेत हे जोडपं रमतं. त्यांचे रुसवेफुगवेही सगळ्यांसारखेच. आपण आता एकमेकांशिवाय जगू शकत नाही असं यांना कायम वाटतं. दिवस सरत असतात.हळूहळू या गोंडस मुलीत फरक पडतो. तिचं मानसिक संतुलन बिघडतं. ती स्वत:शीच बडबडायला लागते. असंबद्ध बोलायला लागते. घरचे खूप काळजी करतात. खूप समजवण्याचा, सावरण्याचा प्रयत्न करतात पण परिस्थिती बिघडतच जाते. ती स्वत:चा मानसिक तोल सांभाळू शकत नाही. तिला शेवटी दवाखान्यात ठेवावे लागते. एक निरागस मुलगी नियतीमुळे वेडी म्हणवली जाते.

तिच्यावर उपचार सुरू होतात. मुळातच जिद्दी असल्यामुळे ती पूर्ण बरी होते. पुन्हा आपल्या गावी परत येते. मधल्या वर्षांमधे गावात खूप फरक पडलेला असतो. गाव तसं सुधारलेलं असतं. काळानुरूप बर्‍याच नवीन गोष्टी दिसतात. पण या आपल्या नायिकेला मात्र घर खुणावत असतं. आपल्याइतकीच घरची माणसंही आपल्याला भेटायला आतुर असतील या विचारानं ती घर उघडते. घरची माणसं तिच्याकडे बघून हसतातही. पण त्यांच्या हसण्यातलं अवघडलेपण तिला लक्षात येतं. आपला भूतकाळ वेगळा होता हे तिला विसरता येत नाही. ही पुन्हा तसंच वागेल या भीतीने घरचेही तिच्याशी तुटक वागतात. आपल्याशी बोलताना हे सगळे अंतर राखतात हे तिला कळून चुकतं. सगळ्यांचं ठीक आहे, पण आपल्यावर एकेकाळी जिवापाड प्रेम करणारा आपला प्रियकरही आपल्याला टाळतो हे तिला खूप खटकते. ती खूप समजावते, की मी आता सुधारलेय, नॉर्मल आहे. पण कोणी ऐकत नाही. ज्या कारणामुळे आपण एकटे पडलो ते कारण अजूनही आपली पाठ सोडत नाही हे तिला समजून जाते. तिला किनारा सापडत नाही.

ती खूप रडते, पण समाज तिला स्वीकारत नाही. आपण पुन्हा एकदा वेडे होऊ की काय असे तिला वाटते. पण या वेळी ती सावरते. ठरवते, आपण कोलमडायचं नाही. ही शहाणी माणसं आपल्याला वेडी म्हणून स्वीकारत नाहीत; पण खर्‍या ‘वेड्यांना’ मात्र आपली गरज आहे. तिथली माणसं पण अशीच एकटी, असहाय आहेत. त्यांना आधाराची गरज आहे. त्यांचं दु:ख आपण अनुभवलंय, त्यांना आधार द्यायचा, सावरायचं. तिच्या आयुष्याचं ध्येय तिला मिळतं. या शहाण्या माणसांना कायमची सोडून ती वेड्यांच्या जगात रममाण होते. त्यांचा आधारस्तंभ होते. पुढे हीच शहाणी माणसं तिला सामाजिक कार्यकर्ती म्हणून मिरवतात. पण आता ती या सगळ्याच्या पल्याड गेलेली असते. अनेक निराधार माणसांची आई बनलेली असते. मालिकेच्या शेवटी शीर्षकगीत येतं ‘मिळाला तिला किनारा.’

साधी सोपी गोष्ट. पण उत्तमरीत्या गुंफलेली. प्रत्येक भाग आपल्याला कुठल्या तरी वेगळ्याच विश्वात नेणारा. अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा. ती वेडी होते तेव्हा तिच्या डोळ्यातील भाव आणि मोठी समाजसेविका झाल्यावर डोळ्यातील करारी भाव उत्तम साकारले होते. डोळ्यांचा अभिनय म्हणजे काय हे यातून समजते. कुठेही जड संवाद नाहीत, वेडी दाखवली तरी भडक मेकअप नाही. उगाचच ताणलेले भाग नाहीत. तरीही आठवणींच्या कप्प्यात सहज सामावणारी ‘शोधू कुठे किनारा.’


kaugp@rediffmail.com