आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पावशेर कोंडा घ्‍या हो विहिणी, बरव्‍या लेकी द्या हो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय स्त्रीजीवनाचा इतिहास, विज्ञानाने सुसह्य केलेला स्त्रीचा वर्तमान आणि आशादायी भविष्यकाळ यांच्याकडे नीट निरखून पाहिलं तर आपले बरेचसे प्रश्न सुटू शकतात आणि सुखं वाट्याला येऊ शकतात. त्रिकालातील स्त्रीजीवनाचा वेध घेणाऱ्या सदरातला हा लेख.


असे मानले जाते की, वैदिक काळात स्त्रियांची स्थिती तुलनेत चांगली होती. त्यानंतरच्या स्मृतिकाळात स्त्रियांचे स्वातंत्र्य संकुचित होत गेले, त्यांचे अनेकविध क्षेत्रांमधले हक्क मर्यादित झाले; त्यापुढील टीका-निबंधांच्या काळात ही बंधनं घट्ट होऊन बसली. अर्थात हे विचार स्त्री म्हणजे केवळ ‘उच्चवर्णीय स्त्री’ असं गृहीत धरून केले गेले, हे स्पष्ट आहे. कारण गागी-मैत्रेयीच्या उदाहरणाखेरीज बाकी जातीजमातींच्या स्त्रियांबाबत अशा अभ्यासांमध्ये काहीच उल्लेख नाहीत.


पत्नीचा या त्याग करणे, घरातून बाहेर काढणे, तिला पणाला लावणे, दान करणे असे अधिकारही धर्मशास्त्राने पतीला दिले आणि तिथून स्त्रियांचे जगणे पूर्णतः परावलंबी बनले. जरी बेजबाबदार वागणाऱ्या, रक्षण करू न शकणाऱ्या, पत्नीच्या जिवावर जगणाऱ्या पुरुषांची धर्मशास्त्रांत, स्मृतींत केली गेली असली आणि त्यांनी पत्नीशी कसे वागावे याचे नियम सांगितले असले, तरीही पुरुषाची शक्ती, सत्ता यांमुळे या गोष्टी दुय्यम ठरत गेल्या. त्यातून उद्भवलेल्या बालविवाह, हुंडाबळी, बलात्कार, मारहाण, लैंगिक छळ, विधवांचे प्रश्न, परित्यक्तांचे प्रश्न, घटस्फोटितांचे प्रश्न, सती, कुमारी माता, निर्णयाचे अधिकार नसणे, मालमत्तेचे हक्क नसणे, अनेक कार्यक्षेत्रांमध्ये काम करण्यास मनाई, योनिशुचितेच्या कल्पनांचा जाच, अनारोग्य, गर्भपाताचा हक्क नसणे, कुटुंबांतर्गत हिंसाचार इत्यादी असे अनेक प्रश्न पुढील काळात निर्माण होत गेले. याज्ञवल्क्य स्मृतीत स्त्रियांच्या वर्तनाबाबतचे नियम सांगितले आहे. उदाहरणार्थ पतीच्या आज्ञेवाचून घराबाहेर जाणे; अवगुंठन न घेता बाहेर पडणे; जलद चालणे; व्यापारी, संन्यासी, वृद्ध आणि वैद्य यांच्या व्यतिरिक्त अन्य पुरुषाशी बोलणे; मांड्या, पोटऱ्या व स्तन उघडे ठेवणे; जोराने हसणे; धूर्त, चेटकिणी व दुःशील अशा स्त्रियांशी संबंध ठेवणे - या गोष्टी गृहिणीने वर्ज्य मानाव्यात. 


स्कंदपुराणात म्हटले आहे की, पत्नीने पतीचे नाव घेऊ नये, तसे केल्यास त्याचे आयुष्य कमी होते; पतीने निर्भर्त्सना केली तरी उलटून बोलू नये आणि मारलेझोडले तरी हसतमुख राहावे. (ब्रह्मखंड ७.१८-१९) बृहस्पतीने पत्नीची कर्तव्ये सांगताना म्हटले आहे की, पत्नीने पती व वडीलधारी माणसे यांच्या आधी उठावे; भोजन, उपाहार त्यांचे करून झाल्यानंतर करावे; त्यांच्यापेक्षा कमी उंचीच्या आसनावर बसावे व कमी उंचीच्या शय्येवर निजावे. 


पत्नीने फार दिवस पितृगृही राहू नये; तसे केल्यास कीर्ती, चरित्र आणि धर्म यांची हानी होते, असे महाभारतात सांगितलेले आहे. 
मुलीचे लग्न करण्याच्या अधिकाराच्या बाबतीत तिच्या मातेला फार गौण स्थान देण्याचे कारण बहुधा असे असावे की, स्त्रियांना समाजात स्वातंत्र्य असत नसे आणि कन्यादानाचा विधी मातेला स्वतः करता येत नसे, तो कोणा तरी पुरुष नातलगाच्या हातून करून घ्यावा लागे. अलीकडील काळात न्यायालयांनी असे ठरवले आहे की, मुलीचा पितामह जिवंत असला तरीही तिच्या मातेला वरयोजना करण्याचा अधिकार असतो, मात्र प्रत्यक्ष कन्यादान कोणा तरी पुरुषाने केले पाहिजे. धर्मसिंधू (३. पूर्वार्ध पा. २५१) या ग्रंथाने असा नियम सांगितला आहे की, जेव्हा एखादी मुलगी स्वयंवर करते अथवा तिची माता तिचे कन्यादान करते त्या वेळी विवाहातील मुख्य संकल्प त्या मुलीने अथवा तिच्या मातेने स्वतः उच्चारावा आणि बाकीचा सर्व विधी एखाद्या ब्राह्मणाच्या द्वारे करावा. एखाद्या मुलीचा विवाह एखाद्या अनधिकारी व्यक्तीने ठरवला असला तर असा नियम सांगितला आहे की, सप्तपदी होऊन विवाह पूर्णपणे झाला असला तर कन्यादान करणाऱ्याला तसे करण्याचा अधिकार नव्हता, या कारणास्तव तो विवाह रद्द मानता येत नाही. परंतु विवाह होण्यापूर्वी अधिक अधिकार असलेल्या व्यक्ती अस्तित्वात असूनदेखील जर एखाददुसरा कोणी मनुष्य मुलीचे कन्यादान करू इच्छित असला तर त्याला तसे करण्यास प्रतिबंध करता येते. (उद्वाहतत्त्व पा. १२७; निर्णयसिंधु. ३ पूर्वार्ध ३०७). विवाहात मुलीचा विक्रय करण्यात येतो काय या विषयावर धर्मग्रंथात जे उल्लेख आले आहेत त्यांवरून असे अनुमान काढता येते की, इतर पुष्कळ देशांतल्याप्रमाणे प्राचीन काळी या देशातही कधीकधी लग्नाकरिता मुली विकत घेत असत. परंतु हळूहळू लोकमत सर्वस्वी बदलले आणि बापाने अथवा भावाने मुलीचा विक्रय करणे ही गोष्ट निंद्य मानण्यात येऊ लागली, इतकेच नव्हे तर त्यांनी मुलीच्या मोबदला काही नजराणा घेणे ही गोष्टही कमीपणाची समजू लागले (बौ. ध. सू. १.११.२०।२२). वराने मुलीच्या नातलगांना दिलेल्या देणग्या त्यांनी आपल्या स्वतःकरता राखून न ठेवता त्या मुलीला दिल्या तर त्यामुळे त्या मुलीचा विक्रय केला असे होत नाही असे मनूने (३.५१,३. ५४। ५५) म्हटले आहे. काही काही जातींत आणि शूद्रांमध्ये सध्यादेखील जेव्हा मुलीचा विवाह होतो तेव्हा द्रव्य अथवा द्रव्याच्या ऐवजी त्या किंमतीचा काही माल पुष्कळदा घेतला जातो. परंतु सामान्यतः असे द्रव्य त्या मुलीची काही तरी तरतूद करण्याकरिता आणि मुलीच्या बापाला होणारा खर्च भागवण्यासाठी घेतलेले असते. (धर्मशास्त्राचा इतिहास; पूर्वार्ध; पृ. २१०)
शूद्रादिक या स्थानात आधुनिक काळातही काही विशेष फरक पडलेला दिसत नाही; तथापि स्त्रियांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात मात्र आता हळूहळू बदल होत चालला आहे, असे जाणवते. कन्यादान, हुंडा / वरमूल्य, वधूमूल्य या सर्वच मुद्द्यांबाबत १९७५पासून भरपूर चर्चा सुरू झाल्या... त्यांची फळं चाळीसेक वर्षांनी आता कुठे दिसू लागली आहेत.


- कविता महाजन, वसई 

kavita.mahajan2008@gmail.com

बातम्या आणखी आहेत...