आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हितांचे मामंजी ठेवले घरी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
“त्या‘तसल्या’ सायटींना पोर्न कामून म्हणत आस्तीला गड्या?” गज्यानं न ऱ्हाववून विच्चारलं.
देविदास अमृततुल्य चहाभांडाराचे अमृतअण्णा जरा काचकुचले.

प्रभंजनकुमारबी आसा आईन येळंला गायब होत्तो. आसल्या गाबड्या प्रश्नांची उत्तरं त्याले ठाऊक आसत्यात पक्की. बरं गज्या म्हण्जे काई सादंसुदं प्रकर्ण नाहीय्ये. त्याच्या आंगाले किती कर्ण हयेत आणि किती नेत्र हयेत, ह्ये त्येच्या आईबापांनाई सांगता येयाचं नाही.

प्रभंजनकुमारच्या च्यानलचे सग्ळे रिपोर्टर-रिपोर्टरण्या आणि सग्ळे यांकर-यांकरण्या येकीकडं
आणि गज्याची येकली बॉडी येकीकडं.

“आसं आसंल वाट्टे मले... म्हण्जे बगा... पोर+न म्हण्जे पोर्न... ज्येंना पोरं व्हयायसाटी न्येमकं काय करावं लागत्ये त्ये म्हाईत नस्त्ये आणि म्हणूनशान त्यांना कोणीयबी ‘तुमाले ल्येकरं किती हईती?’ आसं विच्चारल्यावर ‘येकयबी पोर नय’ आसं पुनःपुन्हा सांगावं लागत्ये, त्यांना येज्युकेशन देणाऱ्या सायटींना पोर्न सायटी म्हणत आसत्याल,” पश्या जायभाडे म्हणला.
परस्पर चर्चा सुरू झाली, ह्ये पाहून अमृतरावांनी हुश्श क्येलं.
“पण आसं आसंल तर येज्युकेशनल सायटींवर बंदी कामून आण्ली बॉ?” गज्यानं फुडचा सवाल फेकला.
“बगवत नाई बग... बगवत नाई!”
“कम्मालंय राव... त्येंना बगवत नाई तर त्येंनी बगू नये ना. लोकांचं बगणं यांना का बगवत नाई म्हण्तो मी.”
“त्यो संसदेत मोबाइलवर ‘तसलं’ बगणारा येंच्याच पक्षाचा व्हता ना रे? ही तर ‘हांव जेवतां आनि तुका भुकेचें वकद देता’ आसल्यातली गत झाली... म्हणजे शिजवून ठेवलंय ते मी जेवतो आणि तुले भूक लागली आसल तर भुकेचं औषध देतो!”
“हां... म्हणूनच तर शिस्त लावून ऱ्हायले आस्तील त्ये.”
“मले काय वाट्टे सांगू का...” अमृतअण्णा न राहावून बोललेच, “मले वाट्टे का, लोकसंख्या लई वाढून ऱ्हायली ना भौ आपल्या देशात. मंग काई लोकं आनयेज्युकेटेड ऱ्हायले, तर तेवडीच लोकसंख्या कमी व्हईल ना बाप्पा. तर कुटुंबनियोजन खात्याचा प्ल्यान आस्णार बगा हा.”
“पण माझी येक शंका हये... ज्या काळात पोर्न नव्हतं, त्या काळातबी पोरं होतंच होती की. तवा कोण येज्युकेशन द्येत होतं?” गज्यानं पुढचा सवाल टाकला.
“हा पण पॉइंट हये. म्हण्जे पोर्नचा आणि पोरं न हुण्याचा काईयेक संबंध नाही!” अमृतअण्णा म्हणले. त्ये जरा अस्वस्थ झाले होते. कामून की, त्येंनी तर येकदापण पोर्न बगितलं नव्हतं... तरीपण त्येंना पोरगं झालं होतं. जर पोर्न बगण्यानं पोरं होत आस्तील आणि आपल्याले तर न बगता झालं, तर मग बायकूनं काय कुठं लफडंबिफडं क्येलं की काय आसा डाउट्ट त्येंच्या मनात येऊन ऱ्हायला होता. तरी बरं की, पोरगं डिट्टो अमृतअण्णाच्या तोंडवळ्याचं होतं.
“पण आपल्या-आपल्या घरात लोकं काई का करंनात... त्यावर बंदी आणायची कामून म्हण्तो मी. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर... सॉरी सॉरी... व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला हये,” श्रीदेवी हिजड्यानं दणदणीत एंट्री मारली, “प्रत्येक व्यक्तीचं स्वातंत्र्य हये का त्येनं काय बगावं आणि काय बगू नये. रामगोपाल वर्मा म्हण्तो का, पोर्न साइट बंद करण्याचा केंद्र शासनाचा निर्णय हा तालिबानी आणि इसिसच्या फर्मानासार्खाच हये.”
“रामगोपाल वर्मा कोण?” गज्यानं फुडचा सवाल टाकला.
“तो हॉरर सिनेमे बनवतो ना भौ... तुमी नाई बगत वाट्टे,” पश्या जायभाडे म्हण्ला.
“पण हॉररवर कुटं बंदी घातलीया? मंग तो कामून बोल्तो? का त्याले फील्ड चेंज करायचं हये?”
“त्याले वाटून ऱ्हायलं आसंल का आज येच्यावर बंदी, उद्या त्येच्यावर बंदी... आसं करत करत सरकारले बंदीची चटक लागंल... आणि येकदा का चटक लागली का बंदीच्या तडाख्यात काय काय येईल ह्ये काई सांगता येयाचं नाई,” जोशीबुवा ज्योतिषवाले म्हणले.
प्रभंजनकुमारचं आगमन झालं, तसं सगळे सावरून बसले. अमृतअण्णांनी चहाचा तिसरा राउंड पाठोला.
“काय झालं बंदीचं? झाल्या का ‘तसल्या’ सगळ्या सायटी बंद?’ गज्यानं फुडचा सवाल टाकला.
“नाई. बंद केलेल्यायबी सुरू व्हऊन ऱ्हायल्यात!” प्रभंजनकुमारनं बॉम्ब टाकला. “पॉर्न व्हिडिओ पाहण्यावर बंदी घालणं म्हण्जे राज्यघटनेच्या कलम २१ अंतर्गत स्पष्ट नमूद असलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी करणं हये, आसं मत सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांच्या अध्यक्षतेखालील न्यायासनाने देल्हं हये. त्ये म्हणत्येत का ‘या प्रकरणी आम्ही कोणताही अंतरिम आदेश देऊ शकत नाही. कारण अशा प्रकारची बंदी घालण्यात आल्यास, एखादी व्यक्ती न्यायालयात येईल आणि मी प्रौढ असताना, तुम्ही माझ्याच घरात मला पोर्न व्हिडिओ पाहण्यापासून का रोखत आहात, असा सवाल करेल. तं या प्रकरणी केंद्र सरकारनेच भूमिका स्पष्ट करायला होवी!”
“बंदी घात्ली काय, काढली काय... येवडी घाई तर बाकी कोण्चेपण डिशिजन घेयाले करत नाईती... पेंडिंग डिशिजन, पेंडिंग फायली, पेंडिंग केसेस... यांचा ढिगारा रचला ना भौ, तर एव्हरेस्टहून मोठं शिखर तय्यार व्हईल आपल्याकडं. कामधंदे सोडून द्येऊन ह्ये नस्ते विषय चर्चेला आणायचे आणि लोकायचं खऱ्या समस्यांपास्नं लक्ष विचलित करायचं... आस्ले उद्योग हयेत ह्ये. जावन्दे. चला आता. मत देऊन चुकलो. हिताचे मामंजी ठेवले घरी आणि चौघी सुना गरवार करी - आसली गत झाली झालं,” गज्यानं निकाल सुनावला.
(kavita.mahajan2008@gmail.com)