आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांदिचे दात!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुकारामनं आखरीले गाय विकायचं ठरवलं. ते सोपं नसतंय, पण अवघडही नसतंय. म्हण्जे घरची गाय विकणं सोपं नसतंय, पण तुकारामासाठी काईच अवघड नसतंय. तरीही या खेपेला तुकारामावर घरच्या कोणाचाच विश्वास नव्हता. बाजारात गाय नेऊन विकणार म्हणजे त्यातून दुसरं काय होणार? बरं, चांदी काई मारकुटी गाय नाई. ती गरीब गाय हये. ज्याच्या हाती दावं दिलं, गुमान त्येच्या मागं मागं जाणार आणि त्याच्या गोठ्यात त्याच्या खुट्ट्याले बांधली जाऊन गप ऱ्हाणार. ती काई दाव्याला हिसका द्येऊन माघारी पळत आपल्या घरी यिणार नाई. परत यिऊन तरी काय व्हणार म्हणा... चारा कुठून घालणार? चमत्कार व्हणार तरी काय आणि कसा? मरण काई कोणाला टळलं नाई, पण निदान आपल्या डोळ्याफुडं तरी व्हणार नाई.

तुकारामाची आई म्हण्ली का, “आशा गायीला बाजारात तरी घिणार कोण? तिचं पयसे तरी कितीक मिळणार? ऱ्हाऊ देयाची ना घरलाच?”
तुकाराम म्हण्ला, “गायीनं आजवर आपल्याला दिलंय ना, आता जातानाबी दिऊनच जाईल. माज्यावर विश्वास ठिवा.”
बोलणंच खुंटलं मग.

बरं तुकारामाची सवय म्हणजे बोलायचं नाई, करूनच दाखवायचं! तुकारामाच्या घरातली लोकंच नाई, अख्खं बदलापूर हैराण झालं होतं. पण दुष्काळच आसा आला, आभाळही रिकामं आणि मातीही कोरडी.
गाय बदलापुरात विकायची नाही, ह्ये पक्कं होतं. जरा चार गावं ओलांडून पाचव्या गावात जाणं सुरक्षित ऱ्हातंय. तसं तुकारामानं बोरगाव गाठलं. बाजारात बाकी लोक हाळ्या घालत होते, पण तुकाराम शांत. तो उलट येणाऱ्याजाणाऱ्यावर खेकसत होता... गायीले हात लावू नका! दुरून बगा! किती येळ बगताय? नजर लावणार का काय? तुम्हांले नाई पर्वडायची भाऊ, जावा तुमी! - असं चाल्लं होतं.
अधिकरावाले वाट्लं का येवढं काय पेशल हये या गायीत? यिऊन किंमत विच्चारली, तर दोन मिन्टं बोलतीच बंद झाली.
“गायीची किंमत काय इत्की आस्तीय का?” अधिकरावांनी विच्चारलं.

तुकाराम म्हण्ला, “ह्ये हिकडं म्हण्ताव त्ये ठीक हये. बदलापुरात म्हणताल तर प्रॉब्लेम व्हईल.”
“का? हिला काय सोनं लागून ग्येलंय का काय?”
“चांदी...!”
“सांगिटलंस ना बाबा का गायीचं नाव चांदी हये... म्हून काय इत्की किंमत?”
“तुमी विच्चारून तर बगा का चांदीचं नाव चांदी का हये?”
“बरं... सांग मला. चांदीचं नाव चांदी का हये?”
“चांदीच्या दाढा कधी बगितल्यात का?”
“आँ... सोन्याचा दात म्हाइताय मले. म्हण्जे माज्या दुसऱ्या बायकोच्या पह्यल्या वडलांचा व्हता तसा. येकदा कोणतरी, आता कोणतरी म्हणजे काय त्येंच्या बायकोनंच, दाताचा कोथळा भायेर काडलेला त्येयच्या.”
“दाताचा कोथळा आस्तोय?”
“आस्तोय आमच्यात! तुला काय करायचीय नस्ती म्हाईती? तर तवा त्यांनी येक दात सोन्याचा बसवला व्हता. चकचक चमकायचा हासले की. पण हासायची येळच यायची नाई म्हणा. बायकोच्या माघारी हसायचे कधी तरी. आणि हासले की गुन्हा केल्यासारखं तोंड पुसायचे घाईघाईने. चांगले व्हते बिच्चारे. मयताच्या येळी तोंडात तुळशीचं पान ठिवायचं निमित्य क्येलं आणि काडून घिटला दात...”
“कोणी?”
“कोणी काय... त्येंच्या बायकोनंच! नाई तरी तोंडात मंगळसूत्रातले दोन काळे मणी दोन सोन्याचे मणी ठिवावे लागणारच हुते. सोन्याच्या तारेचा इलुसा तुकडाबी ग्येलाच आस्ता. त्ये वाया जाणारच, पन ह्ये कायला वाया जाऊ देयाचं ना? लै प्य्राक्टिकल, लै प्य्राक्टिकल...”
“कोण?”
“त्येंची बायको. म्हण्जे आमची सासू! ...तर चांदीच्या दाढा हईती... म्हणून महाग हये होय गाय इत्की. बगू का?”
“काय बगायचंय?”
“दाढा रे!”
“हां बगा की, आता गाय घिणार म्हणताय तर बगणारच की तुमी’
“जबडा उघड की... मला कशी हात लावू देईल ती?”
“हां... बगा आता.” तुकारामानं गायीचा जबडा उघडून दाखवलं.
“सग्ळा आंधारच दिसून ऱ्हायलाय गड्या. चांदी काळी पडली की काय रं?”
“नाई ओ... येकदम पवित्र गाय हये. हिचे डोळेपण बगा, काळे नाईत, भुरे हयेत. दूधपण पांडरंच देती बगा... येकदम शुभ्र... बाकीच्या गायींवानी पिवळसर दूध नस्तंय चांदीचं.”
“आसं म्हणतोस? चल, करून टाक मग व्येव्हार...”
अधिकराव गाय घिऊन ग्येले. नोटांचं पुट्टल घिऊन तुकाराम शांतपणे घरला निगाला. डोक्यात सवाल खच्चून भरलेल्या संकऱ्या वायरमननं विच्चारलं, “काय बॉ तुकाराम, खरंच का चांदीचे दात चांदीचे हयेत?”
तुकाराम हासून म्हणला, “तुझे दात तुझेच हैत आणि माझे दात माझेच हैत ना? तस्संच चांदीचे दात चांदीचेच असणार ना गड्या! आता तो आधिकराव गायीच्या जबड्यात हात घालून काई दात काडून घिऊ शकणार नाई. ती मरायची वाटही पाहू शकणार नाई... कारण की आसं क्येलं तर पाप लागंल ना त्याले.”
संकऱ्या अवाक होऊन तुकारामाकडं पाहातच ऱ्हायला.
तुकाराम म्हणला, “बैलाचं नाव सोन्या ठिवायला पाह्यजे बॉ आता.”

kavita.mahajan2008@gmail.com