‘जर म्हाराजाचं नाव साक्षी आसू शकतं, तर पूज्य माताजींचं नाव नक्कीच पुरावा आसंन,’ ड्रिंकर टेलर म्हणला. त्याला लकवा मारून तीन महिने झाले होते. तब्येतीत काही फरक पडत नव्हता. डोकं मात्र जसंच्या तसं शाबूत होतं. त्याचा जिवश्चकंठश्च मित्र म्हणजे श्रीदेवी हिजडा. बदलापूरच्या फायू ष्टार बारमध्ये वेटर म्हणून काम करून आता त्याला कंटाळा
आला होता. पण हे काम तरी नशिबानं मिळालं. टाळ्या वाजवत भिका मागण्यापरीस ह्ये बरं. त्याच्या डोक्यात हे सगळं सुरू आस्ताना ही साक्षी म्हाराजाची बातमी घरंगळली.
तो ड्रिंकर टेलरला म्हणला, ‘साक्षी म्हाराज म्हणत्येत का प्रत्येक हिंदूला चार पोरं होयाला होवीत. त्यातल्या पोरी किती? आणि येकांदं हिजडा झालं तर त्येचा धर्म कोण्चा?’
‘तुजा धर्म कोण्चा हये?’ ड्रिंकर टेलरनं विचारलं.
‘हिजड्याचा,’ तो त्रासून म्हण्ला.
‘पण चार हा आकडा कोणत्या पायावर काढला त्यांनी,’ जोशीबुवा भविष्यवाले म्हणले. ते आजकाल संख्याशास्त्राचा
आभ्यास करत होते. संख्याशास्त्रानं भविष्य सांगलं का गि-हाइकाकडं पत्रिका नसली तरी चालती आणि हिंदू नसलं तरी
चालतं, ह्ये त्यांना उल्गडलं होतं. ‘म्हणजे पाच हा आकडा शुभ आहे, सातपण शुभ आहे, अकरा आणि एकवीस तर उत्तम!’
‘एक्कावन्न, एकशे एक नकोत का? ते एक कार्टं जन्माला घालण्यासाठी काय-काय करावं लागलं ते मलाच माहीत मेलं...
आणि हे चाल्लेत कल्पनेत आकडे वाढवत,’ जोशीकाकू करवादल्या. त्या जोशीबुवांना शोधत आल्या होत्या. जोशीबुवा हमखास श्रीदेवीच्या मागे सापडणार याची त्यांना खात्रीच होती आणि बारमधली गि-हाइकं सुरू होण्याच्या आधी श्रीदेवी ड्रिंकर टेलरकडेच हमखास सापडणार हे तर अख्ख्या बदलापुरात माहीत होतं. आईचा जीव बाईपाशी आणि बाईचा जीव गुरवापाशी!
‘पण चार्चार पोरं पायजेत कशाला?’ संत्या कुळकर्ण्यानं विचारलं.
संत्या आणि त्याच्याच सोबत प्रभंजनकुमार ऊर्फ प्रभ्या आता मैफिलीत हजर झाला होता. ते निघाले होते अमृतअण्णा देविदासराव राजमालेंच्या हॉटेलातला अमृततुल्य चहा प्यायला. पण व्हरांड्यात बाजेवर पहुडलेला ड्रिंकर टेलर, त्याच्या बाजूला श्रीदेवी हिजडा, त्याच्या मागे दडलेले जोशीबुवा, समोर करवादणा-या जोशीकाकू अशी खास माण्सं दिसल्यावर त्यांच्या पायांना
आपोआप ब्रेक लागला. चहा काय केव्हाही पिता येतो. अमृततुल्य चहा तर सकाळपासून आतापस्तोर वीस वेळा उकळून कडू झालेला असणार. पण आता कुणी ताजा चहा बनवून दिला तर कोणत्याही बदलापूरकराला तो सोसायचा नाही, अशी या अमृततुल्य चहानं सगळ्यांच्या जिभेची चव बदलवून टाकलेली होती.
‘चार पोरं अशासाठी, की त्यातला येक म्हणे साधूंना देयाचा आध्यात्माच्या रक्षणासाठी. दुसरा म्हणे सैन्यात धाडायचा देशाच्या सीमेच्या रक्षणासाठी. आणि दोन आप्ले आपण ठिवून घेयाचे.’
‘मले तर वाट्लं का, चारी पोरं साक्षी म्हाराजाकडे धाडायचे खांदा दियाला. चवघांचं काम ह्येच आस्तंय ना?’ श्रीदेवी खिंकाळून हसत म्हणला.
‘पण मग त्यांनी ह्ये हिंदूंना कामून सांगलं? बायांना सांगायला पायजेल ना? कोण्ची बाई आजकाल नव-याचं आयकते?
होय हो जोशीकाकू, तुम्ही आयकता का जोशीबुवांचं? त्ये दुनियेचं भविष्य पाहत्येत, पण तुम्ही त्यांना वेगळाच हात
दाखवता म्हणे,’ संत्यानं इनोसंट चेहरा करून सुरुवात केली.
‘चला आता घरी,’ जोशीकाकू जोशीबुवांकडे पाहून गर्जल्या, ‘त्या म्हाराजाला एक उद्योग नाही. स्वतः साधूपण आहे आणि खासदारपण झालाय. त्याला ना गरोदर राहायची वेळ येणार ना बाळंत होताना कळा देण्याची. आयजीच्या जिवावर बायजी उदार. आहे ती लोकसंख्या आधी सांभाळा आणि आहेत त्यांना आधी नीट सोयीसुविधा द्या म्हणावं.’ संत्यानं लगेच अनुमोदन दिलं, ‘हो हो. हॉस्पिटलची बिलं कोण देणार? शाळाकॉलेजचं डोनेशन आणि फी कोण भरणार?
रोज दोन वेळ जेवायला कोण घालणार? असे प्रश्नही त्यांना विचारले पाहिजेतच.’
प्रभंजन नि:श्वास टाकत म्हणाला, ‘आमच्या चॅनलवर आता ‘आजचा सवाल’ नसतो. आता आम्ही ‘बेधडक’ उत्तरं देतो. सवाल असता, तर चर्चेला तुम्हांला बोलावलं असतं. आता उत्तरांसाठी माणसं शोधायची म्हणजे अवघडच.’ श्रीदेवी म्हणला,
‘काळजीच करू नको. दोनेक घंट्यांनी फायू ष्टार बारला भेट दिली की, माण्संच माण्सं सापडतील. सोमरस पोटात ग्येला, की सगळे प्रश्न विरतात आणि उत्तरंच शिल्लक राहतात.’