आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kavita Mahajan Article About Women Nature And Election

तोंडाला पदर, गावाला गजर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निवडणुकांची भानगड दुनियेतल्या बाकी सगळ्या भानगडींहून भारी असते. त्यात निवडणूक म्हणजे डॉलर आणि बाकी गोष्टी इतक्या चिल्लरचाल्लर ठरतात की जणू जुना तो भोकाचा ढब्बू पैसाच. त्याची किंमत कवडीहूनही कमी. पण निवडणुका संपल्या, तशी मग हळूहळू बदलापुरातलं वातावरण नॉर्मलवर यायला लागलं. बाप्ये पारापारांवर पत्त्यांचे अड्डे टाकू लागले. बायाबापड्यांच्या कुचुंद्या सुरू झाल्या. फाइव ष्टार बारमधली गर्दी निवडणुकांच्या तुलनेत जरा ओसरली होती. कुंथलगिरीकर महाराजही आता सखुबाई निवडून आल्यानं जरा निचिंतीनं आराम करत होते. निवडणुकीत त्यांचीपण लई पळापळ झालेली. प्रचारप्रमुख असल्यावाणी त्यांनी गावोगाव भाषणं ठोकली की सखुबाईसाठी.

भाषणांच्या या गदारोळात आधीचं एक मोठ्ठं भाषण बदलापुरातले लोक विसरूनच गेले होते. विनयाताई गालगुंडे यांचं घणाघाती भाषण. आपला सुप्रसिद्ध अँकर प्रभंजनकुमार रणनवरेचं आणि सीताबायच्या सायलीचं लफडं आहे, हे गुपित अख्ख्या बदलापुराला माहीत झालं. जातीपाती न मानता पोरं लफडी करताहेत म्हटल्यावर गावातल्या बाप्येलोकांचं टकुरं फिरलं. त्यांनी खाप पंचायत स्थापन करायची ठरवली. खाप पंचायतीच्या स्थापनेची प्रोशिजर सुरू असतानाच, ही बातमी बायकांना लागली आणि त्यांनी समांतर विद्रोही साहित्य संमेलन व्हयाचं पूर्वी तसं समांतर विद्रोही काप पंचायत स्थापन करून टाकली बायकांना जमवून. खाप पंचायतीपेक्षा जास्ती धास्ती काप पंचायतीची वाटू लागली आणि पुरुषांनी कापल्या जाण्याच्या भयानं खापलणं रद्द करून टाकलं मनातल्या मनात. अशा गोष्टी काही जाहीर थोडीच बोलायच्या असतात? मग आपली काय इज्जत राहते? त्यामुळं आळीमिळी गुपचिळी होती, पण आतल्या आत धुमसत होते सगळे. धुमसून करणार काय? जेवायला तर घरीच जावं लागते आणि बायको जे काही ताटात वाढंल ते गुमानं खावं लागते.

आता पुरुष अशा कारणानं गप बसले, तसा बायकांना जास्तीच चेव चढला. त्यांनी येक मेळावा आयोजित करायचं ठरवून टाकलं. सुप्रसिद्ध स्त्रीवादी अभ्यासक विनयाताई गालगुंडे यांना अध्यक्ष म्हणून बोलावलं. मंडपगिंडप घालायच्या कामाला पुरुषमंडळींना जुंपून टाकलं. सीताबाई सायलीला घराबाहेर पडू देत नव्हत्या. सायलीला कुठं जायचंच आसंल, तर स्वत: सोबत जायच्या जिथंतिथं. आता मेळाव्याला तर त्यांना स्वत:लाच जायचंच होतं. एक विचार केला की, सायलीला हिंदी सिनेमातल्यासारखं घरात कोंडावं. घराला बाहेरून कुलूप घालावं. मग आपण मेळाव्याला जावं. पण मग सगळं लक्ष घराकडे लागून र्‍हायलं असतं. आणि या प्रभ्याचा आणि त्याच्या दोस्तांचा काही भरवसा नाही. कुलूप तोडून सायलीला पळवून नेतील. लेक तर हातची जायचीच, वरतून नव्या कुलपाचा आणि दरवाजाचा खर्च करावा लागायचा. त्यापेक्षा सायलीलाही मेळाव्याला घेऊन जावं ह्येच बरं. त्या दोघी मेळाव्याच्या मंडपाजवळ आला, तर दाराशीच हातात माइक घितलेला प्रभंजनकुमार, त्याच्यासोबत क्यामेरामन आसे उभे होते. प्रभंजनकुमारनं सायलीकडे पाहिलंही नाही. तो बोलत होता, नमस्कार. मी प्रभंजनकुमार रणनवरे. सादर करतो आहे बदलापूर इथं सुरू असलेल्या महिलांच्या पहिल्या जागतिक काप पंचायतीच्या पहिल्या अखिल भारतीय संमेलनातून थेट प्रक्षेपण.

सायली गपगुमान खाली मान घालून आईसोबत मंडपात जाऊन बसली. कार्यक्रम सुरू झाला. पाहुण्यांचा परिचय करून देण्यात आला. मग सखुबाईचं प्रास्ताविक झालं.
सखुबाई म्हणाली, बायायच्या मनात लई घोळ हईत. आता पोरासोरांवर संस्कार करण्याची जबाबदारी आईची आसं सम्दे म्हणत्येय. पण कोण्ते पोरं कोण्त्या वयात आयांचं आईकत्येत? त्यांनी तरी कामून आयकावं? आप्ले बाप, मामा, काका कसे रोज गुटखे खाऊन पारावर जुगार खेळत बसत्येत, हे काई त्यांना दिसता नाई का? बारमधून आपले बाप कसे पिचकलेल्या हात्तीवानी झुलतझुलत बाह्येर पडत्येत, ह्ये काई पोरं बगत नाईत का? तर या संस्कारांचं काय करायचं? पोरांना वळण लावायचा जिम्मा फक्त बायांचाच कामून?

सखुबाईचं प्रास्ताविक संपल्यावर विनयाताई गालगुंडे यांच्या अध्यक्षिणीय भाषण सुरू झालं. त्या म्हणाल्या, मुलगे मुळात सरळ रेषांचे असतात. त्यांना वळण लावून शेप कशाला बिघडवायचा? आणि मुली तर आधीपासूनच वळणावळणांनीच बनलेल्या असतात, त्यांना वळण लावायला जागाच कुठे शिल्लक असते? त्यामुळे या पारंपरिक, जुनाट प्रथा सोडून दिल्या पाहिजेत. आधुनिक विचारांकडे वळलं पाहिजे.

सीताबाई कन्फ्युजल्या होत्या. भाषण संपल्यावर गावातल्या कर्तृत्ववान बायकांचे सत्कार झाले. त्यात बचत गटाचं प्रभावी काम करणार्‍या म्हणून सीताबार्इंचाही नंबर होताच. सत्कार घ्यायला सीताबाई स्टेजवर गेल्या. स्टेजवरची गर्दी, पाठीवर अध्यक्षिणीन बार्इंनी पांघरलेली शाल, गळ्यात घातलेला हार, त्यांनी कौतुकानं म्हटलेलं अभिनंदन, अभिनंदन! आणि क्यामेर्‍यांचे चकाकलेले फ्लॅश या सगळ्या खुशीच्या गलक्यात आपण सायलीला खाली प्रेक्षकांमध्येच बसवून ठेवून आलोत याचा सीताबार्इंना क्षणभर विसर पडला.

मेळाव्यातूनच सीताबाईच्या सायलीला उचलून प्रभंजनकुमार पळून जाणार होता, ही प्लॅनची योजना त्यांना ठाऊकच नव्हती. त्या सत्कार स्वीकारून खाली आल्या, तेव्हा सायली गायब झाली होती.
पुढील स्लाइड्‍सवर वाचा, उभयतांचा जाहीर सत्कार...
(क्रमश:)
(kavita.mahajan2008@gmail.com)