आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हती चूक माण्‍साकडनं

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकल राज ठाकरे बनणं काही आपल्याले वाटतं त्येवढं सोप्पं नस्तं. कित्ती कामं करावी लागत्येत बाप्पा! आमच्या सुरेशभावजींचा संघर्ष तर घरापास्रंच सुरू झाला. काई गोष्टींची डिट्टो कॉपी करायची म्हणली तरी करता येत नाई. म्हणजे राज ठाकरेंसारखं काका कुठून आणणार? काका नाई तर चुलतभाऊपण नाई. आता दर क्येशीत काई तरी वायलं आसतंयच. चुलतभाऊ नस्ला तरी सुरेशभावजींले सख्खा भाऊ हये. त्यो काई उद्धो ठाकरेपेक्षा कमी नाई का जास्ती नाई. आता त्याची आजूक यांजिओप्लाश्टी झाली नाईये; पण हुईल की, कोणायचीबी हुती आजकाल.
तर गोची आशी हुती का सुरेशभावजीयले मनसेचं बदलापूर शाखेचं विभागप्रमुख बनायचं मनात हुतं आणि त्येंच्या भावाले म्हणजे सतीशदादूयलेपण मनसेचं बदलापूर शाखेचं विभागप्रमुख बनायचं मनात हुतं. सतीशदादूले खरं तर निवडणुकीत उतरायचं हुतं; पण पर्सोनेल डिशिजन नडले. त्येंना लागोपाठ दोन पोरी झाल्या. पोर्गा हुवा होता. वंशाले दिवा पायजेच, दिवट्या काय कामाच्या? त्या लोकायच्या अंगणात उज्येड पाडणार आणि आपल्या घरादाराला हुंड्यापायी धुवून न्येऊन अंधार करणार. या नादात सतीशदादूले आजूक दोन पोरी झाल्या.
तवरोक त्यांना नियमगियम कायदेगियदे काई म्हाईतीच नव्हते. पोरं हुणं ही आपल्या ब्येडरूमीतली खासगी गोष्ट हये आसं वाटत हुतं. फार्म भरायच्या येळंला, म्हणजे फार्म भरून झाल्यावर निवडणूक अधिका-यानं सांगलं. इत्क्या येळंवर काय कर्णार? नंतर त्येयनी लई उचापती क्येल्या. जसं की चारापैकी दोन पोरी दत्तक घियाची आफर म्येव्हण्याले देल्ही. पर सतीशदादूंचा म्येव्हणा लई पापभीरू, कायदे पाळणारा, नियमांले भिणारा, इमानदारांचा इमानदार हये. त्यो म्हण्ला का, ‘मग पोरी माझ्या घरी नियाले लागतीला. त्येंचं सग्ळं करण्याची जिम्मेदारी कायद्यानं माझी -हाईल. उद्याले त्या माझ्या प्रापर्टीत हिस्साबी मागतील. आता बहिणीनं मागितला हयेच; उद्याच्याले या पोरी मांगणार नाईती कशावरनं? तुम्ही हात झटकून मोकळे हुवाल पोरी तर दत्तक देल्ह्या म्हणून. चार्चार पोरी होवू दियाच्याच कशाले आदी?’
येकुणात निवडणुकीला हुबं -हाण्याचा मार्ग बंद झाला. सतीशदादूनं तवाधरणोक फ्यामिली प्लानिंगच्या प्रचाराचं लई मनावर घिटलं. सोताचं उदाहरण धेत निचंतीनं सगळं विस्कटून विस्कटून सांगाईचे लोकायले. कोण आयकायचे, कोण म्हणायचे का आम्हांले काई निवडणुकीला हुबं -हायाचं नाई. येक ना दोन.
आखरीले सतीशदादूच्या प्रेत्नाले यश लाभलं. त्ये बदलापुरातले मनसे विभागप्रमुख झाले. सुरेशभाईले उपविभागप्रमुखपदावर समाधान मानाव लाग्लं. त्ये त्यायनी लईच मनावर घिटलं. आपली फ्यामिली घिऊन येगळं -हायला ग्येले. आता सोताले सिद्ध करण्यात काई अडसर नव्हता. त्याची सुर्वात म्हणून त्येंनी येक फोटोसेशन क्येलं. मग र्होडिंगी लावल्या. आशी कोशिस तर सुरू क्येली. सासूनं आशीर्वाद म्हणून आयफोनबी घिऊन देल्हा. यात काई पॉलीटिक्ष व्हऊन सासूले धोबीपछाड मिळंल असं त्येंच्या मनातबी आलं नाई.
आता सुरेशभाईची सासू तिच माझीबी सासू आस्ली तरी त्यात लई फरक हये. बायकोची सख्खी आई सासू असणं आणि नव-याची सावत्र आई, तीही दुसरेपणाची, सासू असणं यात जमीनआस्मानाचा फरक असत्ये. त्येयच्या घरात जी सासू जावयाले डोक्यावर घिऊन नाचायची, तीच सासू आमच्या घरात सुनेच्या निस्तं डोक्यावर जाऊन नाई बसणार तर पार सुनेच्या कवटीतल्या लबडब मेंदूतला ट्यूमर व्हऊन -हाणार.
मी आरुणआप्पाले म्हणलं का, ‘आप्पा, आयफोन देयाले हर्कत नाई. तुमची येकच ल्येक, तिचा येकच नवरा... जावयाचं मानपान नाई कराचं तर कोणाचं कराचं? पण त्ये सांगून करावं म्हण्ते मी. आम्हांला नाई हो... तुम्हांला सांगून. तुम्ही काई नाई म्हणले आस्ता का? देल्हाच आस्ता ना आयफोन. आजतवरोक देल्हं नाई का तुम्ही काई?
हुंडा देल्हा, होंडा देल्ही, गेल्या आधिक महिन्यात धोंडा म्हूण स्यामसंगचा फ्ल्याट टीव्ही देल्हा. कधी हिश्येब काढला का कोणी का विच्चारलं काऊन देल्हं म्हणून? मंग तुम्हाले न सांग्तासवर्ता अकाउंटणकडून परभारे पयसे घिऊन आसं करायची काई गरज हुती का म्हणते मी!’
आरुणआप्पांचा चेहरा आता आडवाणींसार्खा दिसू लाग्ला. बघवना.
आखरीले मीच म्हणलं, ‘जावंदे आता. ताटातलं वाटीतच ग्येलंय नाई का. त्येंना काई बोलू नुका. व्हती चूक माण्साकडनं येखांदे टायमाला. बाई, तुमी आराम करा आता. सयपाकाचं काय त्ये मी बगत्ये. उगं सयपाकघरात हुबं -हऊ -हऊ पाय सुजायलेत तुमचे. शांत पडा आता जरा.’
सासू नं. दोननं काही न सुचून मान डोलावली.
(क्रमश:)