आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुष सबलीकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रभंजनकुमार रणनवरे ऊर्फ प्रभ्या म्हणाला, ‘सखुबाई, तुम्ही काई फिकीरच करू नका. निचितीनं -हावा. मी तुमाले यादी करून द्येतो का बाया पुरुषांहून कशाकशात फुडे हईत. समदी आकडेवारी हये माझ्याकडे.’

‘ह्येतर मलापण ठाऊक हये.’ ड्रिंकर टेलर म्हणला, ‘पहिलंछुट उदाहरण देयाचं तर डास!’
‘आता डासांचं काय काढलंत दिनकरराव? म्हण्जे मला म्हाईतीये की बदलापुरात डास फार झालेत. गटारं उघडी हयेत. उकिरडे कचराकुंड्या सोडून सगळीकडे वाहून राहिलेत. डास, ढेकणं, झुरळं, उंदीर, चिचुंद्र्या सगळं वाढलंय. प्लास्टिकचा कचरा भरून भरून नाले बंद झालेत. जोशीबुवांची पाचलक्षणी गाय पोट फुगून आजारी पडली, तिचं ऑपरेशन केलं तर तिच्या पोटात संत्र्याएवढा प्लास्टिकच्या पिशव्यांचा गोळा निघाला.’

‘फुटबॉलएवढा...’ प्रभ्यानं दुरुस्ती केली.
‘हे टीव्हीचॅनल नाहीये प्रभ्या, इतकं अति करून सांगायला. मी म्हणते डास हा काई मुद्दा हये का निवडणुकीत सांगायचा? लोक येड्यात काढतील आपल्याला. लोकांना काय आसं सांगायचं की निवडून आले की मी डासांचा नायनाट करणार.’
‘निर्दालन... निर्दालन म्हणा सखुबाई. भाषा अजून सुधरत नाहीये तुमची,’ प्रभ्या पुन्हा पचकला.

‘तेच ते... मी काय आसं आश्वासन द्येणार का मी खुर्चीवर हये तवरोक बदलापुरात येकपण ढेकूण, झुरळ, उंदीर, पाल दिसणार नाही! आपल्याला काय पेस्ट कंट्रोलचा साइड बिझन्येस टाकायचाय का?’
‘तसं नाई सखुबाई... मी सांगत हुतो का ते बायायचं कत्रुत्व... करुत्वत्र... नाई ते काय आस्तंय ते...’
‘कर्तुत्व...!’
‘हां... तेच ते. तर बायायचं ते पुरुषांहून मोठं... स्वारी... भारी... स्वारी... जास्तीचं कस्काय हये त्ये. म्हण्जे आता बगा... आपण म्हण्तो का डास चावला! तर आपण चूक बोल्तो. आपण म्हण्लं पायजे डास चावली! कामुन की नर डास चावत नस्तोय. माणसायले चावते, रगत पिते ती डासायची मादी. मलेरिया तीच पस्रवते, ड्येंग्यु तिच्याचमुळं हुतो. नाना पाटेकरला आदी म्हाईत आस्तं तर म्हणाला अस्ता की साली एक मच्छर आदमी को हिजडा बना देती हय! तर बाईची नारीशक्ती अस्ली ºहाते. ती मर्दायले हिजडा बी बनवू शकते चावून. मी कर्तो ना सखुबाई तुमचा प्रसार... नाई प्रचार...’ ड्रिंकर टेलर झुलत झुलत म्हण्ला.

‘प्रभ्या...’ सखुबाई म्हण्ली, ‘या ड्रिंकरला आदी उचला आणि बारमदी न्येऊन बसवा.’
‘इलेक्शन हुईतो हा बारमधून भायेर येणार नाई याचा बंदोबस्त करा. इरोधी पक्षाच्या कुणाकडं आसं बोल्ला तर मला रक्तपिपासू म्हणायचे लोक याचं आयकून. उगा न मगा बगा माजा झगा.’

मंग संभ्या ड्रिंकरला ढोर हाकलावं तसं हाकलत बारकडं घ्येऊन ग्येला. सखुबाई इचार करत ºहाईली का आपल्या भाषणाचा मुद्दा काय बै आसावा? ह्ये महिला सबलीकरण जुनं झालं. तीन निवडणुकांपासून पुरुष उमेदवार सांगून ºहायलेत त्ये. त्यायचं आनुकरण आपुन कायला करावं? तेवड्यात सोमवार्‍या चाय घिऊन आला. त्यानं पाह्यलं का त्याची बायकोबी मीटिंगीत बस्लीय. त्याचं टाळकंच सरकलं का आता बायकोच्या हातात चाय द्यायचा म्हणजे जास्तीच झालं तिच्या बायली.

तो आरबाळल्याचं सखुबाईच्या ध्यानात आलं आणि तिला मुद्दाच गवसला.
सखुबाई म्हण्ली, ‘सापल्डा मुद्दा. बायायचं सबलीकरण झालंय कदीचंच. त्ये जुनंबी झालं. आता माझा मुद्दा हये का या बदलापुरात पुरुष सबलीकरण होयाला होवं.’
सोमाच्या हातातला ट्रे भूकंप आल्यावानी थडाथडा उडू लागला.

kavita.mahajan2008@gmail.com